गझल मंथनचा गझलक्रांती पुरस्कार
गझलकारा सुनीता रामचंद्र यांना प्रदान
मुंबई, दि. १९ गझल मंथन साहित्य संस्थेच्या वतीने महिला गझलकारांना दिला जाणारा प्रतिष्ठेचा 'गझलक्रांती' पुरस्कार प्रतिथयश गझलकारा सुनीता रामचंद्र यांना सन्मानपूर्वक देण्यात आला. नवी मुंबई येथे आज संपन्न झालेल्या दुसऱ्या अखिल भारतीय महिला गझल संमेलनात त्यांना हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान आला.
याप्रसंगी डॉ. सुनंदा शेळके, ममता सपकाळ, हेमलता पाटील, डॉ. स्नेहल कुलकर्णी, प्रमोद खराडे, डॉ. कैलास गायकवाड, प्रणाली म्हात्रे, मनोज वराडे, प्रदीप तळेकर आदी उपस्थित होते.
गझल मंथन साहित्य संस्थेने गेल्या वर्षापासून महिला गझलकारांसाठी 'गझलक्रांती' हा मानाचा पुरस्कार सुरू केला. गेल्यावर्षी पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय महिला गझल संमेलनात अकोला येथील ज्येष्ठ गझलकारा देविकामाई देशमुख यांना प्रदान करण्यात आला होता. यंदाचा पुरस्कार गझलकारा सुनीता रामचंद्र यांना देण्यात आला. सुनीता रामचंद्र या सातत्याने उत्कृष्ट गझललेखन करतातच पण त्याबरोबरच त्या एक उत्तम कवयित्री, शिक्षिका आणि सायकलिस्ट आहेत. त्यांचा "अनफॉलो, अनफ्रेंड, अन ब्लॉक" हा कविता संग्रह प्रकाशित असून आजवर त्यांनी १२००० किलोमीटर सायकल प्रवास केला आहे.
गझलक्रांती पुरस्कार मिळाल्याबद्दल गझलकारा सुनीता रामचंद्र यांचे साहित्यिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.


0 Comments