● पुस्तक परिचय ●
सामाजिक जाणिवांचा: ‘गझलनाद’
कोणत्याही संवेदनशील मनास सर्वप्रथम कविताच साद घालत असते. कवितेचा नाद लागण्याचा हा काळ असतो. त्या प्रारंभिक काळात झडझडून, भरभरून काव्यलेखन सुरु होते. कालांतराने कवी जसा परिपक्व होत जातो. तशा त्याच्या काव्य जाणिवा बदलत जातात. त्यास विविध काव्य प्रकार खुणावू लागतात. अभिरूची बदलण्याचाही हा काळ असतो, एखादा काव्य प्रकार कवीला खूप जवळचा वाटू लागतो. पुढे तो काव्य प्रकारच त्या कवीची खऱ्या अर्थाने ओळख बनतो. याला सिराज शिकलगार देखील अपवाद नाहीत. स्वतःचे चार-पाच कविता संग्रह प्रकाशित झाल्यानंतर शिकलगार यांना गझलेचा नाद जडला. त्यानंतर त्यांनी गझलेचे तंत्र मंत्रासह वृत्तानुसार मोठ्या चिकाटीने शिकून घेतले. कोणतेही नवे तंत्र, वेगळी गोष्ट समजून आणि शिकून घेण्याची त्यांची वृत्ती ताजी असल्या कारणाने जाणकार गझल मित्रांकडून त्यांना चांगला प्रतिसाद लाभला. अल्पावधीतच त्यांना अचूक व्याकरणासह मराठी गझलेचे आकृतीबंध अवगत झाले. खयालाच्या अभिव्यक्तीसाठी त्यांना गझलच अधिक जवळची वाटू लागली. हा काव्य प्रकार त्यांना हुकमी वाटू लागला. यातील सशक्तेचा त्यांना प्रत्यय येऊ लागला. मग त्यांचे गझल सृजन सुरु झाले. त्यांना खऱ्या अर्थाने गझलेचा सूर सापडला. त्यातूनच हा ‘गझलनाद’ आकारास आला. १ मे २०२१ रोजी नाशिकच्या ज्ञानसिंधू प्रकाशनाने त्यांचा हा पहिला वहिला ‘गझलनाद’ हा गझल संग्रह प्रकाशित केला. सन २००७ पासून त्यांनी गझल लेखनास सुरुवात केली असली तरी आधी कवितेला प्राधान्य देऊन नंतर जराशा उशिराने त्यांनी गझल संग्रह प्रकाशित केला असल्याचे दिसून येते. सिराज शिकलगार यांचा ‘गझलनाद’ अनेक बाबींनी वैशिष्ट्यपूर्ण ठरला. गझल म्हटले की प्रियकर-प्रेयसी यांच्यातील हळूवार संवाद, प्रेमातील ताटातूट, दोन जिवांची होणारी तगमग, परस्परांना समरसून भेटण्याची ओढ, मीलनाची आसक्ती, अनिवार श्रृंगार, विरह, प्रेमभंग या सारख्या प्रेमविषयक भावभावना आणि सजग दृष्ये रसिकांच्या नजरेसमोरून तरळून जातात. गझलेत इष्काला, प्रीतीला, प्रणयाला स्थान मिळणे आवश्यक असले तरी या साचेबध्द गोष्टीने गझलेच्या अभिव्यक्तीच्या पट मात्र विस्तारत नाही. ही गोष्ट नाकारून चालत नाही.
जोपर्यंत गझलेला बहुमुखी चेहरा प्राप्त होत नाही तोपर्यंत गझल बहुआयामी होत नाही. प्रखर समाज भान बाळगून सामाजिक दुःख पोटतिडकीने मांडल्याशिवाय गझल समाजाभिमुख होत नाही याची जाणीव सिराज शिकलगार यांना सुरुवातीलाच झाली. ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे. शिकलगार यांनी दैनंदिन समाज जीवनातील सर्वसामान्यांच्या समस्यांना, गुंतागुंतींना, उलथा-पालथींना प्राधान्याने ऐरणीवर घेतले आहे. त्यामुळेच गझलनादमधील बहुसंख्य गझलांना सामाजिक चेहरा लाभल्याचे सुस्पष्टपणे दिसून येते.
याशिवाय बेभान तरुणाईची बेपर्वाई, मुक्त जगण्यातील धुंदी, शेतकऱ्यांचे जीवन- मरणाचे प्रश्न, माय माऊलीची होणारी अक्षम्य उपेक्षा, धनलालसेत विस्कटलेली नातीगोती, स्त्रीची पावलोपावली होत जाणारी फसगत आणि फरफट, जगण्यातील क्षणभंगुरता, मौनातील स्तब्धता, मैत्रीतील फसवणूक यासारखे मनाला व्याकूळ करणारे असंख्य नाद शिकलगार यांच्या गझलेतून झंकारत राहतात. ही समाजाप्रती असलेली आंतरिक जाणीव लाखमोलाची आहे. पहिल्याच गझल संग्रहात शिकलगार यांनी विशाल विषयांच्या वैविध्यांचे दालन खुले केले आहे. ते खचितच वाखाणण्याजोगे आहे. कातळ हा पारदर्शी नसतो. त्यात अनेक शिला कोंडलेल्या असतात. कातळ हे मुर्दाड मनाचे निदर्शक आहे. म्हणून माणसाने कातळात स्वतःचे बिंब पाहण्याचा अर्थ खटाटोप करता कामा नये. तद्वतच आरशात फक्त चेहऱ्याची प्रतिमा दिसू लागते. माणसाच्या आंतरिक भावभावनांचे प्रतिबिंब त्यात कधीच उमटू शकत नाही. कातळ आणि आरसा यातील मूलभूत फरक सिराज शिकलगार यांनी तत्त्वज्ञानाची जोड देत साकारलेला हा उत्कृष्ठ शेर आहे. हा त्यांचा शेर वास्तवतेची पाठराखण करणारा आहे. शेर पहा---
कातळात माणसाचे बिंब दिसते कुठे
आरशात भावनांचे बिंब दिसते कुठे
माणसाच्या खऱ्या स्वभावाचा अंदाज कुणाला आहे ? आजकालच्या या दुनियादारीत बहुतांशी माणसे मुखवटाधारीच असतात. त्यांच्या चेहऱ्यामागे खोटाच चेहरा लपलेला असतो. त्यामुळे चोर कोण ? साव कोण ? हे सांगणे कठीण ठरते. समाज जीवनात चोरट्यांची आणि उचल्यांची वस्ती जागोजागी थाटलेली असते. त्यांच्यात जन्मभर राहून फसगतच वाट्याला येते. आपण आपल्या वागण्या-बोलण्यात स्वच्छता ठेवून लबाडीच्या लागवडीपासून स्वतःला चार हात दूर ठेवण्यात जीवनाची इतिकर्तव्यता असते. हे जगण्याचे सार सांगताना शिकलगार माणसाला सावधानतेचा इशाराही द्यायला विसरत नाहीत-------
वागणे बोलणे स्वच्छ असू दे लबाडी नको
चुकुनही चोर उचल्यांच्या वस्तीत राहू नको
संतजनांनी देखील मानवी जीवनाचे फोलपण जाणल्यानंतर आपल्या अभंगातून हाच उपदेश केला आहे. संताच्या उपदेशात कुठेच संदिग्धता अथवा तोचतोचपणा आढळत नाही. त्यात पराकोटीचा परखडपणा, स्पष्टपणा आढळतो. म्हणून संतांचा उपदेश संभ्रमात अडकून पडत नाही. किंबहुना तो संभ्रम दूर करतो, तो माणसाला जगण्याची खरी दिशा दाखवतो. माणसाची फसगत होऊ नये यासाठी त्याने जीवनाचे फोलपण वेळीच जाणून घेतले पाहिजे. यातच त्याचे कल्याण सामावलेले आहे. अध्यात्माच्या अंगाने जाणारा हा शेर शिकलगार अशा नेमकेपणाने आविष्कृत करतात---
संतानी फक्त जाणले फोलपण या जीवनाचे
उपदेश अभंग राहिले संभ्रमात कधी न गेले
सज्जन माणसे अपार कष्ट करून प्रामाणिकपणाची कास धरून आपले जगणे व्यतीत करत असतात. कष्ट हेच त्यांच्या पाचवीला पूजलेले असते. अशा भोळ्या भाबड्याच्या कुरणात मात्र ऐतखाऊ माणसे बिनधास्तपणे चरत असतात, बांडगुळासारखे परावलंबी आयुष्य जगण्यात त्यांना मोठी मौज वाटत असते. अशा माणसांकडून कष्टकरी वर्गाचे नेहमीच शोषण होत आले आहे. आपल्या कष्टावर डल्ला मारणाऱ्या अशा अप्पलपोटी संधीसाधूंना कष्टकऱ्यांनी त्यांच्या आयुष्यात थारा न देणेच त्यांच्या हिताचे ठरणार आहे.
केवळ अपार कष्ट उपसत मरून जाण्यात पुरुषार्थ नसतो. कष्टाचे मोल प्रत्येकानेच जाणले पाहिजे. या वस्तूस्थितीवरही शिकलगार यांनी प्रकाशझोत टाकला आहे-
कष्ट अपार करून कुणी मरतो आहे
भोळ्याच्या कुरणात कुणी चरतो आहे
गझलकार सिराज शिकलगार यांच्या गझल लेखनाचा आवाका विस्तृत आहे. याची साक्ष त्यांच्या या गझलसंग्रहातून पटल्याखेरीज राहत नाही. ‘गझलनाद’ हा त्यांचा पहिला संग्रह असूनही त्यात विविधता संमिश्रता ठासून भरलेली आहे. गझलेच्या आकृतीबंधाची नियमावली बऱ्याच प्रमाणात पाळण्याचा शिकलगार यांनी कसोशीने प्रयत्न केला आहे.
कोणत्याही नव्या रचनाकाराच्या रचनांमध्ये नवखेपणाच्या खुणा उमटणे स्वाभाविक असते. इथेहि क्वचित प्रसंगी सैलपणा आढळून येतो. परंतु हा दोष त्यांच्या सातत्यपूर्वक व्यासंगाने आपोआपच संपुष्टात येऊ शकतो यात शंका नाही. यापुढील त्यांचे गझल सृजन उत्तरोत्तर विकसीत होत जाईल. गझल रसिकांना आनंद देत राहील इतका विश्वास त्यांच्या ‘गझलनाद’ ने निश्चितपणे निर्माण केला आहे.
गझलनाद: गझलसंग्रह
गझलकार: सिराज शिकलगार
प्रकाशक: ज्ञानसिंधू प्रकाशन, नाशिक
पृष्ठे : ९६
किंमत : १००₹
बदीऊज्जमा बिराजदार
साबिर सोलापुरी


0 Comments