गझलकारांच्या नजरेतून महिला गझल संमेलन
गझल मंथन साहित्य संस्थेचे दुसरे अखिल भारतीय महिला गझल संमेलन नवी मुंबईतील विष्णुदास भावे सभागृहात नुकतेच पार पडले. या संमेलनाविषयीच्या सन्माननीय गझलकारांच्या भावना त्यांच्याच शब्दात...
-----------------------------------------------------------------
स्त्री कोषाचा मुक्त कवडसा- गझलमंथन संस्था आयोजित दुसरे अखिल भारतीय महिला गझल संमेलन
तिनका-तिनका, ज़रा ज़रा, है रोशनी से जैसे भरा
हर दिल में अरमाँ होते तो हैं बस कोई समझे ज़रा
जणू उजेडाची झाडंच झाडं आपल्या अवतीभवती उगवली आहेत,
आपलं मन चैतन्यविलासाचा विराट अनुभव घेतंय.
चौकोनी आकाशातले मोजके सूर्यकिरण आता आपल्याला प्रिय नाहीत, आता प्रिय आहे सगळंच आभाळ, सगळं ब्रह्मांड !!आपण अंतर्मुख होतोय आणि त्याचक्षणी आपल्या गझलप्रतिभेचा इत्यर्थ आपल्याला खोलू बघतोय. सुटू न शकणारी पायाखालची जमीन, तुटू न शकणारी श्वासांची लय उघड्या डोळ्यांसमोर विरून चाललीय....
अशी अनुभूती तुम्ही कधी घेतलीय का हो..?
मी घेतलीय आणि माझी खात्री आहे १९ जानेवारीला विष्णुदास भावे सभागृहात गझलेत विरघळून जाणाऱ्या कित्येक महिला गझलकाराही निश्चितपणे या अनुभूतीचा एक भाग झाल्या होत्या.स्त्री गझलकारांच्या मनाच्या तळाशी क्षणोक्षणी होणाऱ्या अगणित उलाढालीच्या, उलटापालटीच्या मागे काहीतरी ठोस अक्षरतत्व आहे.. जे तिच्या खयालातून, शेरातून, गझलेतून उजागर होऊ पाहतेय.... ह्या अक्षरतत्वाला सन्माननीय व्यासपीठ मिळायला हवं.. ही तिची आंतरिक उर्मी जाणून घेणारी गझल मंथन साहित्य संस्था आणि त्यांनी आयोजित केलेलं दुसरं अखिल भारतीय महिला गझल संमेलन या गोष्टीची साक्ष होते !!
अतिशय सुंदर अशा रांगोळीपासून उपस्थित सर्वांसाठी असलेल्या लकी ड्रॉ पर्यंत प्रत्येक गोष्टीत ही जाणीव कुठे ना कुठेतरी डोकावत होती.कार्यक्रमस्थळी संमेलनाध्यक्षा डॉ. सुनंदा शेळके, प्रमुख पाहुण्या आ. ममता सिंधुताई, प्रमुख उपस्थिती आ. हेमलता पाटील, गझल क्रांती पुरस्कारार्थी आ. सुनीता रामचंद्र या विदुषी ज्या सहजपणे वावरत होत्या, सर्वांशी संवाद साधत होत्या ते पाहून गझलेने प्रदान केलेला *विशुद्ध आनंद* म्हणजे काय याची ठायी ठायी प्रचिती येत होती. आपल्या सहजसोप्या पण बुद्धीगम मनोगतातून या सर्व विदुषीनी गझलेच्या मर्माबरोबरच स्त्री जाणीवांचे कोष रंगीबेरंगी फुलपाखरासारखे अलवारपणे खोलले... आणि एकाच वेळी कस्तुरीगंध आणि इंद्रधनू रंग सभागृहात मिसळू लागले, ही जादू त्यांच्या शब्दांची होती.गझलध्यास पुरस्कारप्राप्त आ. माधुरीताई खांडेकर यांचे प्रांजळ मनोगत बरंच काही सांगून गेलं.तब्येत अस्वस्थ असल्यामुळे आ. उर्मिलामाई बांदिवडेकर कार्यक्रमाला उपस्थित राहू शकल्या नाहीत. त्यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली.
गझलमंथन मार्गदर्शक समितीचे आधारस्तंभ आ. प्रमोददादा खराडे आणि डॉ. कैलास गायकवाड यांचे मनोगत समस्त महिला गझलकारांसाठी प्रेरक आणि आश्वासक होते.जेष्ठ, श्रेष्ठ गझलकार आ. आप्पा ठाकूर यांची प्रोत्साहन स्वरूप उपस्थिती प्रचंड सुखावह होती. त्यांचे अल्प मनोगत, शेर सादरीकरण आणि आम्ही महिला गझलकारांना त्यांनी हसतमुखाने दिलेला आशीर्वाद... खरंच स्वप्नवत होते.
गझलयात्री पुरस्कारप्राप्त आ. मनीज वराडे,आ. प्रणाली म्हात्रे, आ. सचिन इनामदार, आ. मानसी जोशी... यांची संस्थेप्रती निःस्वार्थपणे काम करण्याची तळमळ त्यांना ह्या पुरस्काराप्रत घेऊन आलेली होती. ही तळमळच असे कार्यक्रम यशस्वी होण्यापाठीमागचे खरे गमक असते.उद्योगरत्न डॉ. कौतिक दांडगे यांना गझलसोबती पुरस्कार प्रदान करण्यात आला.
गझलमंथन साहित्यसंस्थेप्रती त्यांचा असलेला मदतीचा हात आणि आदरभाव त्यांच्या मनोगतातून अत्यन्त विनम्रतेने सामोरा आला. गझल न जाणणारा कुणीतरी गझलेपाठी इतका भक्कमपणे उभा आहे हे पाहून खरंच खूप आंतरिक समाधान वाटले.
निमंत्रित महिला गझलकारांचा मुशायरा म्हणजे गझलेचे विविधांगी आविष्कार सादर करणारा एव्हरग्रीन परफॉर्मन्स.. होता असं म्हटलं तर अजिबात अतिशयोक्ती ठरणार नाही.
आ ममता सिंधुताई यांच्या अध्यक्षतेखाली जयश्री कुलकर्णी हिच्या अत्यन्त लाघवी, कर्णमधुर, अभ्यासू सूत्रसंचालनाखाली रंगलेला हा मुशायरा डॉ. सुनंदा शेळके, सुनीता रामचंद्र, डॉ. स्नेहल कुलकर्णी, हेमलता पाटील, ज्योत्स्ना रजपूत, श्रद्धा खानविलकर, सुनीती लिमये, मनीषा नाईक, विजया टाळकुटे यांनी अक्षरश: गाजवला.
त्यानंतर एकसे एक रंगत गेलेले मुशायरे.. ही सर्व स्त्री गझलकारांच्या हरहुन्नरी व्यक्तीमत्वाची झलक होती. प्रत्येकीने सादर केलेली गझल तिच्या वेगळेपणाची झलक होती असं विनम्रपणे आणि तितक्याच अभिमानाने नमूद करावंसं वाटतं.आ. मीना शिंदे, आ. सुनेत्रा जोशी,डॉ. सुजाता मराठे, आ. सुनंदा भावसार,आ. प्रणाली म्हात्रे यांचे अध्यक्षीय मनोगत तसेच आ. अंजली दीक्षीत, आ. दिपाली कुलकर्णी, आ. दिपाली सुशांत,आ. पल्लवी उमरे, आ. मनाली माळी.. यांचे सूत्रसंचालन कमी वेळेतही गझलेला जास्तीत जास्त न्याय कसा देता येतो याचा एक उत्तम वस्तुपाठ होता. या सर्वांचे आणि सहभागी सर्व गझलकारांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे... असंच गझलमय होऊन रहा सख्यांनो!!
कमी जागा आणि थोडयाफार त्रुटी असतानाही अध्यक्ष महोदयांपासून सर्वांनीच जे सहकार्य केलं किंबहुना कार्यक्रम उंचीवर नेला त्या प्रत्येकाची गझलमंथन संस्था स्नेहांकित आहे.
उत्कृष्ट आदरातिथ्य, नाष्टा, चहा जेवण यांची अप्रतिम व्यवस्था आणि प्रत्येकाचा अमाप उत्साह यामुळे कार्यक्रम अधिकच रंगतदार झाला.
गझल मंथन साहित्य संस्थेचा एक महत्वाकांक्षी उपक्रम असलेले हे दुसरे अखिल भारतीय महिला गझल संमेलन यशस्वी करण्यासाठी झटणारे संमेलनाचे संयोजक आणि मार्गदर्शक डॉ. शिवाजी काळे,कोकण विभाग प्रमुख डॉ. मनोज वराडे, मुंबई जिल्हा अध्यक्ष प्रणाली म्हात्रे,सचिव सोनाली जगताप, उपाध्यक्ष योगिता तकतराव, संमेलन समिती अध्यक्ष मुकुंदराव जाधव, संमेलन समिती संयोजक प्रदीपजी तळेकर, प्रसिध्दी प्रमुख भरत माळी, संस्थेचे अध्यक्ष अनिलजी कांबळे, उपाध्यक्ष देवकुमारजी, सचिव जयवंत वानखेडे सर आणि संपूर्ण राज्य कार्यकारिणी, कोकण विभाग कार्यकारिणी, आणि मुंबई जिल्हा कार्यकारिणी, मार्गदर्शक समिती सदस्य कैलास सर आणि प्रमोद दादा तसेच सहभागी झालेल्या सर्व मान्यवर महिला गझलकारांचे, प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे या संमेलनाला मदत करणाऱ्या प्रत्येक हाताचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार. डॉ. सुजाता मराठे हिचीही कार्यक्रमस्थळी खूप मदत झाली... आभार सखी.कुणाचे नाव अनावधानाने राहिले असेल तर... गझलकार या शब्दात सर्वांचेच नाव आहे हे नक्कीच समजून घ्याल अशी खात्री आहे.
आ. सुरेश भट म्हणतात
जन्मले घेऊन जे पायात काटा
त्या भणंगांनीच यात्रेला निघावे
पुरातन काळापासून पायात रुतलेला, आत्ता निघाला म्हणता म्हणता राहिलेल्या कणासह पुन्हा पुन्हा सलणारा काटा घेऊन गझलयात्रेला निघालेल्या आम्ही सर्व महिला गझलकारा... आमच्यासाठी हे संमेलन म्हणजे फुलांच्या पायघडया होत्या....
आणखी काय हवं...
डॉ. स्नेहल कुलकर्णी
------------------------------------------------------------------
सगळ्या बाया मला नद्या दिसत होत्या...
साधारणत: दोन आठवड्यांपूर्वी स्नेहलचा जेव्हा फोन आला तेव्हा ती म्हणाली "महिला गझल सम्मेलन आहे वाशीला.आणि तुला यायचं आहे." ही महिलांचं गझल सम्मेलन नावाची गोष्टच मला फार भावली. कारण एका स्त्री ने दुसरीला पायघड्या टाकणं, तिच्या पंखांचा सन्मान करणं म्हणजे एका अर्थाने स्त्रीने स्त्रीशी मैत्र घट्ट करणं... आणि हे घडतंय म्हटल्यावर तिथे जाण्याची संधी मी थोडीच नाकारणार होते .
यासोबतच दुग्धशर्करा योग म्हणजे गझलमंथन या संस्थेद्वारे मला जाहीर झालेला " गझलक्रांती " पुरस्कार. या कार्यक्रमाची मला या अर्थाने ही फार उत्सुकता होती कारण ओठांतून मिळालेली शब्दांची दाद अन पाठीवर कौतुकाचा हात याहून मोठं काय समाधान असू शकतं कुणाही कलाकारासाठी.
रविवार १९ जानेवारी प्रथमदर्शनी नजरेत भरली ती सुरेख रांगोळी. त्या पाठोपाठ एक एक मैत्रीण नजरेसमोर येत होती अन तिचे उबदार हात गळ्यात पडत होते कौतुक करण्यासाठी. ते साऱ्या सख्यांचे प्रेमाचे , जिव्हाळ्याचे स्पर्श हा ही एक दैवी पुरस्कार होता माझ्यासाठी...
या सगळ्या बाया आता मला नद्या झालेल्या दिसत होत्या... झुळझुळत होत्या, एकमेकींवर हास्याचे तुषार उडवित आतून वाहू लागल्या होत्या. हळूहळू त्यांचा हा काफिला काही क्षणांसाठी का होईना बाईपणाकडून निखिल माणूसपणा कडे चालू लागला होता. आणि हा सगळा सोहळा बघण्याचं सुख मला लाभलं... याचं
फार वेगळं समाधान आहे.
प्रत्येकीचं व्यक्त होणं किती वेगळं होतं. इंद्रधनुष्यात केवळ सात रंग नसावेत असं राहून राहून वाटतं होतं. तिचे शब्द , तिच्या भावना , तिचा स्वतंत्र विचार , तिची मांडणी , तिची धाटणी, तिचं बोलणं आज केवळ तिचं आणि तिचं एकटीचं एक स्वतंत्र विश्व होतं. त्यात ती मनसोक्त बागडताना दिसतं होती. आणि याच गोष्टीमुळे तिथली प्रत्येक बाई मला अप्सरेहून सुंदर दिसत होती...
आज तिला कुठलेच रंग वर्ज्य नव्हते . तिचा मान , सन्मान , अपमान , उपेक्षा , प्रेम , फसवणूक, पश्चात्ताप, माया , ममता , ओढ , असोशी अशा साऱ्या रंगांमधे ती न्हाऊन निघाली होती. आज तिच्याकडे कुणी खोचक , बोचक नजरेने बघणार नव्हतं. तिला कुणी जज करणार नव्हतं. ती आज मुक्ता होती, प्रतिभा होती आणि तिला जसं हवं तिला मोकळं होता येत होतं... हे उन्मुक्तपणे उमलणं बघताना आतून भरून येत होतं...
मी इथे कुणाही एका सखीचं नाव घेणार नाही कारण सगळ्यांनी हातात हात धरून एक गझलेचा सुंदर गोफ विणला होता. त्या गोफाभोवती त्या नाचत होत्या, गात होत्या, एकमेकींच दुखावलेलं काळीज मुकपणे गोंजारत होत्या. एकमेकींच्या पापणीच्या आड दडलेली दु:खे समजून घेत होत्या, आधार देत होत्या आणि याहून वेगळा असा बाईपणाचा उत्सव काय असू शकतो..
या साऱ्या सोहळ्यात, बाईचं मन जाणून घेणारेही अनेक पुरूष उपस्थित होते. त्यांनीही हा गोफ मनापासून अनुभवला हे त्यांच्या कधी कौतुकाच्या , कधी चिंतनाच्या नजरेतून दिसत होते. तसं पाहिलं तर हे सारं आयोजन म्हणजे करणं तसं फार जिकरीचं पण साऱ्या मदतीच्या हातांनी हे महिला गझल सम्मेलनाचे स्वप्न पुर्ण केले त्याबद्दल त्यांचे कौतुक आहे.
हे असं भरून आलेलं आभाळ मोकळं करणारं , वाहत्या पाण्यावर साचलेलं मळभ दूर करून पुन्हा वाहतं करणारं , बाई म्हणून जगण्याचं ओझं न वाटता ते कौतुकाने मिरवण्यासाठी बळ देणारं सम्मेलन शतायुषी होवो ही शुभकामनेसह ...
सुनीता रामचंद्र
------------------------------------------------------------------
कौतुकास्पद आणि अभिमानास्पद
अखिल भारतीय महिला गझल संमेलन हे वाक्यच आम्हा सर्व महिला गझलकारांना गर्व वाटण्यासारखं आहे.आणि असे संमेलन सलग दुसऱ्या वर्षी यशस्वीपणे पार पडावे तेही महिला सदस्यांच्या अथक परिश्रमाने व पुढाकार घेऊन करण्याचे हे तर अजूनही कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे. मी स्वतः अनेक मुशायरे आयोजन केले आहे त्यासाठी सुद्धा खूप धडपड करावी लागते.इथे अखिल भारतीय गझल संमेलन आयोजित करणे व यशस्वीरित्या पार पाडणे ही साधी गोष्ट नाही.गझलमंथन साहित्य संस्था हे मोठं कुटुंब आहे. आणि या कुटुंबाची मी सुद्धा एक सदस्य आहे याचा मला अभिमान वाटतो.
उत्कृष्ट आयोजन नियोजन, सुरेख सुत्रसंचालन, जिव्हाळ्याने केलेले आदरातिथ्य,परस्परांमधील समन्वय, पुरस्कारांची योग्य निवड सारं काही स्तुत्य आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा. सुनंदाताई शेळके, प्रमुख पाहुण्या मा.ममता ताई सपकाळ, गझलक्रांती पुरस्कार प्राप्त सुनिता रामचंद्र, डॉक्टर स्नेहल यांचे साधेपणापणाने वावरणे मिसळणे आणि मधाळ वाणीने मंत्रमुग्ध करणे हे मनाला प्रेरित करून गेले. प्रमोद दादा खराडे आणि डॉक्टर कैलासजी गायकवाड यांचे हातचे राखून न ठेवता केलेलं मोलाचे मार्गदर्शन हे आदर्श घेण्यासारखे आहे व न मिरवता मोठेपण सिद्ध केलं या दोन्ही गझलकारांनी. दादा ठाकूर यांची अनपेक्षित उपस्थिती, भेट आणि आशीर्वाद हे तर अहोभाग्य आपले.
पडद्यामागे राहून गझलमंथन साहित्य संस्थेचा गाडा निःस्वार्थ भावनेने खेचणारे अनिलजी कांबळे यांना सलाम आहे माझा.मी ज्यांना गुरूस्थानी मानते त्या डॉक्टर शिवाजी काळे सरांचे गझलमंथन संस्थेसाठी निःस्वार्थ योगदान आणि मार्गदर्शन हे अमूल्य आहे.
मला या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे स्नेहाने आमंत्रित करणारी स्नेहल व गझलमंथन कार्यकारिणी मुंबई यांच्या ऋणात राहू इच्छिते व गझल मंथन साहित्य संघाची सदस्या या नात्याने मीही गझल मुशायर्याचे लवकरच आयोजन करीन याची ग्वाही देते.
धन्यवाद
हेमलता पाटील
------------------------------------------------------------------
सुगंधी मंतरलेले, मंत्रमुग्ध क्षण..
कालच्या कार्यक्रमाचे वर्णन शब्दांत करण्याजोगे नाहीच कारण भावनांनी शब्दांना चीत करून हृदयात साठलेल्या त्या अविस्मरणीय स्मृती आहेत.
वर्णन करायचा प्रयत्न केलाच तर भट साहेबांच्या
शब्दांचा आधार घ्यावा लागेल..
उरले उरात काही आवाज चांदण्यांचे
आकाश तारकांचे उचलून रात गेली
खरच अंधाऱ्या नभात तेजोमय चांदण्यांची आरास सजावी,तशा माझ्या सर्व गझलसख्यांचे
उत्स्फूर्त गझल मुशायरे..
देईन प्रेम म्हणता हलकेच मोगऱ्याला
देहास व्यापूनिया बिलगून गंध गेला..
खरंच कालच्या कार्यक्रमाचा सुगंध अजूनही काळजात दरवळतोय.
स्नेहल ताईंचा एकेक शब्द म्हणजे अमृताचा थेंब,
अध्यक्ष सुनंदा ताईंच्या शब्दांतून झालेली फुलांची बरसात.
ममता ताईंच्या चेहऱ्यावरील फुललेले गुलाब आणि शब्दांतून अत्तराचा वर्षाव..
मंत्रमुग्ध करणारे ते क्षण संपूच नये असे वाटत होते.
सम्मेलन आयोजक म्हणून निभावलेली भूमिका
अनिल कांबळे सरांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास
स्नेहल ताई , शिवाजी काळे सर मनोज वराडे सरांचा मार्गदर्शनरुपी आशीर्वाद, सखी योगिता आणि सखी सोनाली यांच्या भक्कम साथीने
आणि सर्व गझल सख्यांच्या निखळ प्रेम, सहकार्यानेच यशस्वीरीत्या पार पडली, हा विजयोन्माद अजूनही त्याच वातावरणात असल्याचा आभास करून देत आहे.
यात एक महत्वाचे नाव राहिले ते म्हणजे
कोणत्याही सन्मानाची अपेक्षा नसणाऱ्या निगर्वी व्यक्तिमत्त्व असणाऱ्या मनाली माळी ताई
या सखीने कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मला बहुमोल साथ दिली.
तुम्ही पाहिलेली उत्कृष्ट रांगोळी ताई मुळे सजली होती
तुम्ही पाहिलेल्या आकर्षक ट्रॉफी
घेण्यासाठी माझ्यासोबत भर उन्हात स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी समजून माझ्यासोबत ही सखी कार्यरत होती.
या निरपेक्ष साथ आणि प्रेमाला कोणती उपमा देऊ..??😘😘
तसेच आणखी एक नाव म्हणजे मुकुंद जाधव सर उत्कृष्ट निमंत्रण पत्रिका, उत्कृष्ट बॅनर ग्राफिक्स यामुळे कार्यक्रमाला त्यांनी आणलेली शोभा विसरू शकणार नाही.
तसेच
रवींद्र देशमुख सर, प्रिय सुजाता ताई
मानसी जोशी ताई यांचे स्नेहमय सहकार्य
तसेच संमेलन स्थळी स्मिता हर्डीकर ताई, सरिता गोखले ताई यांच्या प्रेमळ सहकार्याने संमेलन सुखद झाले..☺️☺️
सहकार्य, स्नेह, मायेने दिलेल्या साथीने
असाध्य कार्य साध्य होते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कालचे अखिल भारतीय महिला गझल संमेलन..
आयोजक, सूत्रसंचालक, मुशायरा अध्यक्ष, या तिहेरी भूमिका निभावणे केवळ गझल मंथन साहित्य संस्थेच्या माझ्यावरील विश्र्वासामुळे शक्य झाल्या.त्यात लाभलेल्या गझलयात्री विशेष पुरस्काराने त्या आनंदाला चार चाँद लागले.
या अविस्मरणीय अमृतमय सुखद क्षणांसाठी गझल मंथन साहित्य संस्थेच्या सदैव ऋणात राहीन.🙏🙏🙏☺️☺️❤️❤️❤️❤️🎉🎊
प्रणाली म्हात्रे
----------------------------------------------------------------
हृदय भरून आलं
१९ जानेवारी रोजी अखिल भारतीय महिला संमेलन दुसरे, विष्णूदास भावे नाट्यगृहात पार पडले. महिलांना हक्काचं व्यासपीठ, त्यांचा सन्मान गझल मंथन संस्था करते. नवोदितांना मार्गदर्शन करते.
महिला महिलांच्या शत्रू असतात, असं जे कोणी म्हणतात. त्यांनी काल तिथला सोहळा पाहिल्यावर म्हंटलं असतं,. महिला महिलांच्या खूप जवळच्या मैत्रिणी पण असतात.
ममता ताई, सुनंदाताई, सुनीता रामचंद्र मॅडम, स्नेहलताई, हेमलता ताई, यांच्याबद्दल काय बोलावं, हे संमेलन म्हणजे अभूतपूर्व सोहळा होता.
आप्पा ठाकूर सर, डॉ. कैलास गायकवाड सर,. प्रमोददादा खराडे, जयवंत वानखेडे सर, हे सर्वजण महिला संमेलनाला शुभेच्छा द्यायला आले होते, हे विशेष...
मान्यवरांची भाषणं, अगदी जीवाचे कान करून सगळेजण ऐकत होते. त्यांचे सत्कार झाले. त्यानंतर गझल ध्यास पुरस्कार घेण्यासाठी मला व्यासपिठावर बोलवलं. एवढ्या दिग्गज लोकांसमोर जाताना, माझा सन्मान होताना, माझं हृदय अगदी भरून गेलं. नवीन वर्षात गझलेनं दिलेलं हे दान कायम जपून ठेवेन. याचं सर्व श्रेय, डॉ. शिवाजी काळे, आपण भाऊ म्हणूनच संबोधतो, आणि डॉ. स्नेहलताई कुलकर्णी यांना जातं.
या दोघांच्या मार्गदर्शनाखाली गझलेचे धडे गिरवू लागले. अगदी लगावली पासून सुरवात केली. कितीही शंका आल्यातरी, आपला व्यस्त कार्यभार सांभाळून, त्यांनी अचूक मार्गदर्शन केलं . अजुनही करतात. त्यासाठी त्यांची मी अत्यंत ऋणी आहे.
गझल ध्यास हा पुरस्कार द्यावा. हे हेमलता ताईंच्या मनात आलं. त्यांना असं वाटलं की, युवा गझलकारांचे सन्मान होतात. त्यांना संधी मिळते. पण जेष्ठ गझलकार, आणि ती महिला असावी. या महिला संमेलनात तिचा सन्मान व्हावा. स्नेहलताईंच्या मदतीने त्यांनी माझी निवड केली. एका महिलेने, दुसऱ्या महिलेचा केलेला सन्मान.. असं कधी पहायला मिळतं का? पण गझल मंथनमध्ये हेही पहायला मिळतं.
ताई,. मी तुमची मनापासून आभारी आहे.
हा पुरस्कार फक्त माझा नाहीये. माझ्याबरोबर शिकण्याऱ्या, लिहिणाऱ्या असंख्य मैत्रिणी आहेत. त्या सर्वांच्यावतीने मी हा पुरस्कार स्वीकारला आहे.
हे संमेलन यशस्वी होण्यासाठी,. प्रणाली म्हात्रे, योगिताजी, सोनालीताई, आणि मुंबईची कार्यकारिणी यांनी खूप मेहनत घेतली. त्यांचेही
मनापासून खूप धन्यवाद.
मुंबईहून चिपळूणला परत आले, पण मन अजून त्या सोहळ्यातच आहे. सर्वांची मनोगतं कौतुकाने वाचते आहे.
पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार 🙏🏻
माधुरी खांडेकर
----------------------------------------------------------------
गझल प्रांतात महिलांना एक वेगळे अस्तित्व निर्माण करण्याची संधी..!!!
गझल मंथन आयोजित दुसरे अखिल भारतीय महिला गझल संमेलन २०२५
विष्णूदास भावे नाट्यगृह वाशी , मुंबई येथे नुकतेच सानंद संपन्न झाले.
महिलांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले त्याबद्दल सर्वप्रथम मी *गझल मंथन संस्थेचे मनापासून आभार मानते*.
अतिशय देखण्या रांगोळीपासून या संमेलनाची खरी रंगत सुरू झाली आणि तेवढ्याच देखण्या मुशायऱ्याने व आभारप्रदर्शनाने ..त्याची सांगता झाली.
व्यासपीठावर विराजमान असलेल्या एकापेक्षा एक ताकदीच्या लिहिणाऱ्या सर्व गझलकारांना बघून व ऐकून इतक्या लांबच्या प्रवासाचा शीणचं निघून गेला.
सर्व मान्यवरांचा यथोचित आदर, सत्कार व स्वागत समारंभ अगदी साग्रसंगीत पार पाडण्यासाठी मुंबई कार्यकारीणी अध्यक्ष *प्रणाली म्हात्रे* व त्यांच्या महिला सदस्या फार तत्पर होत्या..प्रणाली ताईंच्या ओघवत्या व सुंदर सुत्रसंचालनाने सभागृह दणाणले होते.
*या महिलांमागे कितीतरी मान्यवर पुरूष मंडळींचे सुद्धा अमुल्य सहकार्य प्रत्येकवेळी अधोरेखित होत होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अक्षरशः सर्वजण झटताना दिसत होते*
मुंबईकरांनी कार्यक्रमासाठी जागा कमी मिळाल्याची खंत बोलून दाखवली मात्र संपूर्ण कार्यक्रमात कुणाच्याही सरबराईत ते कमी पडले नाही.यावरून *जागा कमी असली तरी मनाचा मोठेपणा* असला की सगळ्या उणिवा भरून निघतात आणि हे मुंबईकरांनी सर्वांना दाखवून दिलयं.
आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान असलेल्या *गझलमंथनच्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गझलकारा गझलगुरू आ.उर्मिला माईंची भेट होईल असे वाटले होते..मात्र माईं काही अपरिहार्य कारणास्तव आलेल्या नव्हत्या मात्र माईंची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली*.
आ.स्नेहलताईंच्या भाषणातला एक एक शब्द काळजाला भिडत होता. अवघे सभागृह अगदी शांतचित्ताने व एकाग्रतेने ताईचे शब्द जणू मनावर कोरून घेत होते की काय असे वाटत होते. ताईचे ते मधाळ बोलणे संपूचं नये असे वाटत होते .जणू शब्दरूपी अमृतकुंभातल्या त्या अमृताच्या शिंपणाने सगळे न्हाऊन निघत होते..एवढ्या कळकळीने आणि पोटतिडकीने ताई बोलत होत्या...ताईंचा गझलेप्रती असलेल्या भावना ,प्रेम सगळं ओसंडून वहात होत. आपण खरचं किती भाग्यवान आहोत की,आपल्याला इतक्या सच्च्या व प्रांजळ मनाच्या गझलगुरू ,मार्गदर्शिका मिळाल्यात या विचाराने मन भरून येतं होतं.
यानंतर *सुनंदाताईंचे* गझलेविषयीचे विस्तृत मार्गदर्शनपर सुंदर भाषण तर *ममताताई* व *हेमलताताई* यांच्यातला साधेपणा मनाला भुरळ घालून गेला. इतक्या जेष्ठ श्रेष्ठ असून कुठेही ,कोणा मध्ये कुठलाच अहंभाव आढळला नाही.
गझल मंथन *पुरस्कर्त्या सुनिता रामचंद्र* यांच्या ओघवत्या व अनुभव संपन्न भाषणाने सर्वांना नवी दिशा मिळाली.
*साधी राहणी व उच्च विचारसरणी* याची प्रचिती आली.
*आ.सुनीती ताईंच्या* तरन्नूम ने सगळेच नेहेमीप्रमाणेच मंत्रमुग्ध झालेत.
*आ.हेमलताताईंकडून प्रायोजित असलेला पुरस्कार गझल मैत्रीण माधुरी ताईंना मिळाला ...खूप छान वाटले*
*अनेक मान्यवरांच्या उपस्थितीने संमेलनास एक वेगळे स्थान प्राप्त झाले*.
तरीसुद्धा *आ.शिवाजी सर* ( भाऊ) *आ. राजदा* आपली अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली.
यानंतर.. एकापेक्षा एक असे मुशायरे रंगत गेले.
मुशायऱ्यानंतर प्रत्येक गझलकाराचा सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला.
चहा- नाश्ता ,जेवण याकडेही कार्यकारीणीतल्या सदस्या आवर्जून लक्ष देत होत्या.
एकूणचं अखिल भारतीय महिला गझल मुशायरा हा अतिशय सुंदर रीतीने व उत्कृष्ट असा संपन्न झालाय.
गझल मंथन अध्यक्षा मुंबईकर *प्रणाली ताई* , *योगिता तकतराव* तसेच *सोनाली जगताप* व संपूर्ण कार्यकारीणीचे हार्दिक अभिनंदन!
या मुशायऱ्यात मला सुत्रसंचालनाची संधी दिलीत त्याबद्दल मी परत एकदा मुंबई कार्यकारीणी चे आभार मानते.
तसेच सर्व महिला गझलकारांना केवळ हक्काचेच नव्हे तर मानाचे ,जिव्हाळ्याचे व आपुलकीचे व्यासपीठ उपलब्ध करून एक वेगळे अस्तित्व निर्माण करण्याची संधी दिलीत , त्याबद्दल पुनश्च एकदा आपल्या गझल मंथनचे संस्थेच अध्यक्ष *आ.अनिल कांबळे* यांचे मनापासून आभार मानते*.!
सर्व मैत्रिणींच्या भेटीगाठी झाल्यात.मनसोक्त गप्पा झाल्यात आणि मनाचे समाधान झाले.परत एक नवी उर्जा घेऊन भरपूर फोटो व्हिडिओ काढून सर्वांनी एकमेकींचा परत भेटू असे आश्वासन देऊन निरोप घेतला.
सौ. दिपाली सुशांत
गझल मंथन जिल्हाध्यक्षा
कारंजा (लाड) जि.वाशिम
-----------------------------------------------------------------
उकृष्ट नियोजन
छान झाला कार्यक्रम, आपण आम्हाला संधी दिलीत यासाठी मनापासून धन्यवाद, नाश्ता, जेवण, पाणी यांची उत्तम सोय आपली टीम सर्वांची आपुलकीने चौकशी करीत होती हे फार छान वाटलं, इतक्या मोठ्या संख्येने लांबून प्रवास करून महिला आल्या होत्या हे विशेष, आपण नवोदित आणि प्रस्थापीत दोन्ही गझलकारांचा फार सुंदर समन्वय साधलात, योग्य पुरस्कारार्थी ची निवड, मंचावरील सर्वांचेच मार्गदर्शनपर विचार ऐकायला मिळणं ही पर्वणी.
एकंदरीत उकृष्ट नियोजन वं पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏
ज्योत्सना राजपूत
-----------------------------------------------------------------
सख्या भेटल्या ..
छान झाला कार्यक्रम... सुंदर नियोजन... सगळ्या ग़ज़लकार सख्या भेटल्या ....छान वाटले... ☘️☘️☘️ पुण्यात दुसरा कार्यक्रम असल्याने.. लवकर निघावे लागले... 🙏🙏 सर्व मुंबई टीमचे मनापासून आभार.. 🌿🌿 गझलमंथन संस्थेचा एक अभिनव उपक्रम..
सुनीति लिमये
-----------------------------------------------------------------
महिलांसाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब
महिला गझल संमेलन ही कल्पनाच मुळातच गझल लेखन, वाचन, आस्वादन करणाऱ्या प्रत्येक महिलेच्या दृष्टीने कौतुकाची, अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे.
कालच्या सोहळ्याबद्दल बोलायचं झालं तर
प्रत्येक पुरस्कारार्ह व्यक्ती म्हणजे गझल मंथनने विचार मंथन करून अगदी सुयोग्य निवड केली आहे ह्यात शंकाच नाही. त्या सत्रातील प्रत्येकीची भाषणे अगदी कार्यक्रमाच्या व त्यांच्या लौकिकाला साजेशी अशीच प्रभावी झालीत.
शुभारंभाच्या पहिल्या मुशायऱ्यात स्नेहल ताई ,हेमलता ताई ,सुनीता ताई ,सुनीती ताई ,मनीषा ताई ,ज्योत्स्ना ताई, विजया ताई , सुनंदा ताई , श्रद्धा आणि ममता ताई ह्यांच्या सगळ्यांच्याच गझलांनी मुशायरा एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला. अगदी थोडक्यात सांगायचं तर पैसा वसूल असं वातावरण ह्या सगळ्या जणींच्या शब्दांनी तयार केलं आणि ज्यांना मी मनापासून वाचते, अनुसरते. ज्या माझ्या खऱ्या अर्थाने आवडत्या गझलकारा आहेत त्यांच्या मुशायऱ्याचे सूत्रसंचालन करायला मिळणं हा माझ्यासाठी खूपच सुखद क्षण होता .अशी गोड संधी मला देऊन स्नेहल ताईने आणि गझलमंथन परिवाराने माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !
तुम लगाते चलो अश्जार जिधर से गुज़रो
उस के साए में जो बैठेगा दुआ ही देगा
अश्जार ..वृक्ष
गझल लेखन करणाऱ्या इतरांसाठी झटण्याचा, इतरांना प्रेरणा देण्यासाठी सातत्याने कृतीयुक्त पाठींबा देत राहण्याचा, सहकार्य, कौतुक प्रोत्साहीत करण्याचा गझल मंथन परिवाराचा प्रयास नक्कीच प्रभावित करणारा आहे
ह्या कार्यासाठी गझल मंथनच्या प्रत्येक सदस्यास सतत प्रेरणा आणि बळ ईश्वर प्रदान करत राहो ह्या मनःपूर्वक शुभेच्छा!!
जयश्री कुलकर्णी
-----------------------------------------------------------------
बाया आल्या एका छताखाली
फार सुरेख कार्यक्रम झाला.. इतक्या सगळ्या मैत्रिणींना भेटून आनंद झाला. आताशा एका छताखाली इतक्या सगळ्यांनी एकत्र येणं होत नाही. यानिमित्ताने ते झालं.
आपल्या पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा. 💐😊🙏🏻
ममता सिंधुताई
-----------------------------------------------------------------
उत्तम नियोजन
संमेलन म्हणजे याहून वेगळं काय .. जुन्या नव्या मैत्रिणी भेटल्या..ओळखी झाल्या.. गप्पा झाल्या... छान गझला ऐकायला मिळाल्या . यासाठी आयोजकांचे मनापासून आभार 🌺
सगळ्याच मान्यवरांची भाषणं छान झाली.. उत्तम भोजन 😊.. उत्तम नियोजन
टीमचे अभिनंदन आणि खूप शुभेच्छा.. भेटत राहू 🌺
श्रद्धा खानविलकर
-----------------------------------------------------------------
बाया लिहित्या व्हाव्यात...
महिलांनी महिलांसाठी केलेले नियोजन आवडले. सर्वांचा उत्साह बघण्या सारखा होता. सर्व मैत्रिणींना भेटून आणि ऐकून छान वाटले.
बाया लिहीत आहेत, सादर करीत आहेत, एकत्र येत आहेत, व्यक्त होत आहेत, विचारांची देवाण घेवाण करीत आहेत. एकमेकींना प्रोत्साहन देत आहेत याहून सुंदर चित्र काय असू शकते. यानिमित्ताने हे सगळे घडले.
अशी सम्मेलने व्हावीत. बाया एकत्र याव्यात, बाया लिहित्या व्हाव्यात.
सर्व आयोजकांना आणि कार्यकर्त्यांना धन्यवाद आणि शुभेच्छा 🌹🌹🌹🌹
मनीषा नाईक
-----------------------------------------------------------------
देखणा दिमाखदार सोहळा
कालचा गझल मंथन साहित्य संस्था आयोजित गझल मंथन महिला संमेलन... एक देखणा दिमाखदार सोहळा..🌹
गझल मंथन.. प्रेरणादायी साहित्य संस्था.. नेहमीच गझलेला मोठी करण्यासाठी तत्पर. फक्त महिलांसाठी असा मुशायरा आयोजित करणे हे सुचते फक्त गझल मंथनलाच.अशी संधी दिल्याबद्दल (शिवाय मुशायरा अध्यक्ष म्हणून पण संधी.) आभार मानण्यापेक्षा ऋणात राहणेच बरे. गझलकारा मा. ममता सिंधुताई दिग्गज गझलकारा या समारंभात भेटल्या. तसेच गझल गुरू मार्गदर्शिका गझलकारा मा. स्नेहलताईंची उपस्थिती नेहमीच प्रेरणादायी असते. हसतमुखाने प्रत्येकाला भेटतात. निगर्वी व्यक्तिमत्त्व. अर्थात मोठी माणसे नेहमीच तशी असतात किंबहुना ती तशी असतात म्हणून इतक्या उंचीवर पोहोचू शकतात. आणि त्यांचे मनोगत नेहमीप्रमाणेच ऐकण्यासारखेच. मुंबई कार्यकारिणीचे आयोजन आणि नियोजन खूप छान.स्वागत तसेच चहा जेवण अगदी हवे तसे होते. जातीने बसायची व्यवस्था बघत होते. टीमवर्क दिसून येत होते. गझलमंथनचे स्मृतिचिन्ह खूप छान. मुंबई कार्यकारिणीला सलाम आणि कौतुक. गर्दी आणि दर्दी दोन्ही होते. अनेक गझलकारांच्या बहारदार गझल एकाच ठिकाणी ऐकायला मिळाल्या. सगळ्या जणी एकमेकींना खूप छान योग्य ठिकाणी दाद देत होत्या. माणिक शूरजोशी.. प्रणाली म्हात्रे.. सुनंदा भावसार.. माधुरी खांडेकर.. वगैरै बर्याच मैत्रिणींशी बोलणे झाले. सगळ्यांची नावे इथे देत नाही सगळ्या जणींनी सुत्रसंचालन सुद्धा कमी वेळातही बहारदार केले. काही चांगले क्षण सोबत घेऊन पुन्हा भेटू या वळणावर असे म्हणत परतले. माझी टॅक्सी ५वाजता बाहेर येऊन थांबल्याने शेवटचा मुशायरा चुकला म्हणून थोडी चुकचुकले इतकेच..
सुनेत्रा विजय जोशी
रत्नागिरी
-----------------------------------------------------------------
दिवस खूपच सुंदर होता
कालचा दिवस खूपच सुंदर होता. आयोजन..नियोजन सर्व छान. मी या समूहात नवीन आहे, असं मला अजिबात वाटलं नाही. फक्त नावाने ओळखत असलेल्या मैत्रिणी अगदी एका दिवसात जिवाभावाच्या होऊन गेल्या. सर्व सूत्रसंचालीकांनी आपल्या सुदंर भाषाशैलीने आणि शेरा शायरीने कार्यक्रमाला चार चाँद लावले. सर्व मुशायरे अप्रतिम. सर्व महान व्यक्तिमत्वांकडून खूप काही छान छान शिकायला मिळाले. सर्वाचे आभार 😊💐💐🌹🌹🙏🙏
सौ. संजना विद्याधर जुवाटकर
कळवा, ठाणे.
-----------------------------------------------------------------
ऊर्जा देणारा सोहळा
गझलमंथनचे अखिल भारतीय दुसरे महिला गझल संमेलन..वाशी येथे विष्णूदास भावे नाट्य सभागृहात थाटामाटात पार पडले.
खचाखच दर्दी रसिकांनी भरलेले सभागृह
,प्रवेशद्वारावरील भव्य सुंदरशी रांगोळी लक्ष वेधून घेत होती. अतिथी आगमनानंतर नियोजनानुसार दीपप्रज्वलन, अतिथी सन्मानसोहळा पुरस्कार सोहळा अगदी थाटामाटात पार पडला.
सुनंदाताई शेळके संमेलनाध्यक्ष, ममता सिंधुताई प्रमुख पाहुणे.. हेमलताताई पाटील स्नेहलताई, प्रमोददादा खराडे, कोकण विभाग प्रमुख डॉ, मनोज वर्हाडे या सर्व
मान्यवरांचे बहुमूल्य विचार ऐकायला मिळाले. अतिशय प्रतिभावंत समाजसेविका गझलकारा ममता सिंधुताई सपकाळ यांना मनात, भेटायची ऐकायची ओढ होतीच...नावाप्रमाणेच चेहऱ्यावर सात्विकता आणि नजरेत कुणालाही आपलेसे करून घेणाऱ्या पद्मश्री ममताताई.. त्यांनाही भेटता आले. ऐकता आले, स्नेहलताईंनाही भेटता आले, अनेक फेसबुक वरील प्रेमाच्या मेत्रीणींची भेट झाली.हा एक सुवर्णयोगच म्हणावा. आजचा दिवस खरोखरच खूप आनंददायी आणि ऊर्जा देणारा ठरला नाही तरच नवल.
सुनिता रामचंद्रन या गझलक्रांती पुरस्काराच्या मानकरी ठरल्या. माधुरी खांडेकर ताईंना गझलध्यास पुरस्कार
दिल्या गेला. एकापाठोपाठ सहा सुंदर गझल मुशायरे पार पडले, सुंदर सुत्रसंचालन, शेरोशायरी, वाहवा, मुक्करर, इर्शाद, एकाहून एक सुंदर शेर आणि गझलांनी.. संपूर्ण गझलमय धुंद वातावरण, टाळ्यांचा दिलखुलास प्रतिसाद शेवटपर्यंत सर्व टिकून होते. पैठणी लकी ड्रा आणि व्हावचर हेही मुंबई बाजारपेठेचे संक्रांत विशेष आकर्षण होते.
ध्यानीमनी नसतांना वेळेवर चालून आलेली सुत्रसंचालनाची संधी, मी जबाबदारी समजून उत्तम पार पाडली. सगळ्यांचे सुत्रसंचालन खूप छान होते.मुशायरे तर एकाहून एक सरस गझलांनी चांगलेच गाजले. कार्यक्रम संपूच नयेअसे वाटत होते.
मुंबई जिल्हा कार्यकारीणी आणि गझलमंथनचे सर्व पदाधिकारी, गेले कित्येक दिवस काही हात या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी राबत होते. स्नेहलताई कुलकर्णी, प्रणाली मंगेश म्हात्रे, सोनाली जगताप, योगीता तकतराव, गझलमंथनचे सचिव जयवंतदादा वानखडे, शिवाजी काळे सर, यांनी विशेष परिश्रम घेत हे संमेलन यशस्वी करून दाखवले.आगत स्वागत, नाश्ता, जेवण, चहापाणी सगळेच छान होते.अतिशय सुंदर सुनियोजित सोहळा.
ट्राफी आणि सन्मानपत्रपण खूप सुंदर.
गझलमंथन कार्यकारिणीचे खूप कौतुक आणि आभार 😊🙏
पल्लवी उमरे
-----------------------------------------------------------------
गझलेची गुरुकिल्ली म्हणजेच गझलमंथन समूह..!
१९/०१/२०२५ रविवारी नवी मुंबई वाशी येथे गझलमंथन समूहाचे "दुसरे अखिल भारतीय महिला गझल संमेलन" विष्णू दास भावे नाट्यगृह येथे दिमाखात यशस्वी पणे संपन्न झाले..
गझलमंथन गझलेविषयी गोडी आणि ओढ सर्वांच्या अगदी नवोदितांपासून ते सर्व गझलकारांच्या मनापासून मनात वाढवत आहे..
गेल्या वर्षी पुणे येथे सावरकर नाट्यगृह पुणे येथे १९ नोव्हेंबरला पहिले गझलसंमेलन कायमचे मनात आणि नजरेत घर केले..आणि बरोबरीने वाशी येथे नुकतेच दुसरे अखिल भारतीय महिला गझलसंमेलन ही थाटात पार पडले.
प्रत्येक गझलकाराला स्वअस्तित्व निर्माण करुन देणारी गझलमंथन संस्था कायमच उभी असते. त्यामुळे आपोआपच उत्साह वाढतो.आणि त्याच उत्साहाने आणि प्रेरणेने मला वाशी येथे महिला गझल संमेलन येथे सर्वांना आनंदाने चहा,नाष्टा देताना प्रत्येक सखीचे नाव विचारले त्यामुळे परिचय झाला.स्मिता हर्डीकर,योगिता,प्रणाली,जयश्री कुलकर्णी ,पुष्पाताई कोल्हे,अपर्णाताई पुराणिक, सोनाली ताई जगताप अशा बऱ्याच नव्या जुन्या नावाने ओळखत होते पण प्रत्यक्षात भेटीत अगदी जीवाभावाच्या गझलसखी झाल्या.यामुळे ही गझलमंथन गुरुकिल्ली दिली की गझलमंथन समूहाचे नवीन वेगवेगळे हक्काचे व्यासपीठ आणि प्रेरणादायी व्यक्तीमत्व आणि सख्याची संख्या मनामधे आणि आयुष्यामधे जीवन विमा वाढत आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही.जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी गझलमंथन समूह.(Love you All Of You)
आल्याबरोबर स्वागत केले ते सुंदर रंगसंगतीचा मिलाफात सजलेल्या नटराजाच्या मुर्तीसमोरील रांगोळीने.छान पण छोटासाच भरगच्च गझलप्रेमींनी भरलेला हॉल गझलसखींची आणि संमेलन साठी लाभलेल्या सर्व अतिथीचे स्वागत करण्यासाठी सजून वाटच पाहत होता..!
स्नेहलताईंनी आल्याबरोबर पाठीवरून हात फिरवला छान वाटले कारण ताईंचे अर्धे बळ मिळाले.स्नेहलताईंचा साधेपणा आणि उत्साह कायम उर्जा निर्माण करतो..
स्नेहलताईंनी संमेलन अध्यक्षा सुनंदाताईं शेळके यांचा परिचय करून दिला आणि काय ओ.. भाग्यच लागते ना अशी गुंतवणूक करायला..!
ऐनवेळी हक्काने आपल्याला असे सगळे करायचे आहे तर तू हे कर असे स्नेहल ताईंनी सांगितले आणि मला ते अतिशय मनापासून आवडले..
थोडीशी धावपळ करताना मजा आली..याला कारण ऐनवेळी हॉल लहान मिळाला पण आज अजून नवीन वर्षात गझलेचे अमृतानुभव ऐकायला आणि पाहायला मिळणार यामुळे एक वेगळाच संचार माझ्या मधे झाला होता.
चहा ,नाष्टा देत असताना अचानक समोर आ.गझलकार आप्पा ठाकूर सर आले आणि स्वर्गीय सुखाचा परमानंद झाला..अगदी पायावर नतमस्तक होऊन नमस्कार करण्याचे भाग्य मला लाभले..!
यार मी किती भाग्यवान आहे ना..!
मग हळूहळू प्रत्येक अतिथींचा चहा नाष्टा देऊन आशिर्वाद आणि शुभेच्छा घेताना फार भारी वाटत होते..
एक विनोदाचा किस्सा झाला तो विजया ताई टाळकुटे यांच्या बरोबर परिचय करून घेताना.आडनाव वेगळे असल्यामुळे त्यांनी जी आडनावाची टाळ वाजवून अॅक्शन केली ती हसू आवरणे थोडावेळ अशक्य होते.
मग लक्ष वेधून घेतले ते व्यासपीठावर विराजमान असलेल्या मान्यवरांच्या मनोगतांची एका पेक्षा एक ताकदीचे मुंबई कार्यकारिणीने जे दिग्गज मान्यवर आणले होते त्यामुळे गझलसंमेलन सोहळा यशस्वी झाला.
प्रणाली ताईंच्या ओघवत्या आणि सुंदर व उत्कृष्ट आवाजात संमेलनाचे सुत्रसंचालन खुपचं आवडणारे आहे.यामधे प्रणालीला तिच्या आई बाबांसहित घरच्यांनी दिलेला भक्कम पाठींबा कौतुकास्पद आणि अभिमानास्पदच आहे.इथे म्हणायला काहीच हरकत नाही ये है मुंबई मेरी जान..
व्यासपीठावर सुरुवातीला लाभलेल्या सर्वच तेजःपुंज मान्यवरांचे मनोगत ऐकताना एक एक शब्द गझलेचे अमृत कलशच सर्वांना सोपवत होता.यामधे बरोबरीने थाटात पार पडलेला गझलक्रांती,गझल यात्री,गझलसोबती,व गझलध्यास पुरस्कार सोहळा सारे काही आदर्श घेण्यासारखे झाले.हे सर्व पुरस्कार प्राप्त झालेल्या सर्व गझलप्रेमींचे मनापासून हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!
यानंतर निमंत्रितांचा पहिल्या मुशायरामधे सर्वच गझलकारांच्या शेरांनी
रसिकांची मने जिंकली..
पहिल्या मुशायरानंतर सुग्रास भोजनाचा आस्वाद घेऊन पुढील ५ मुशायरासाठी व्यासपीठ आतुरतेने आणि हक्काने गझलकारांची वाटच पाहत होते.आणि नंतर जे एकसे बढकर एक चढते मुशायरे क्रमाने यशस्वी होत गेले..सर्वच मुशायराला लाभलेले सुत्रसंचालक आणि अध्यक्ष आणि त्या सर्वांची उत्कृष्ट मनोगते थाटात पार पडली.सर्व गझलकारांचा उत्साह उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवत होता.जो तो मिळेल त्या ठिकाणी फोटो काढून आपल्या आठवणी मनाच्या अल्बम मधे साठवत होत्या.
मला तर यावेळी अगदी सर्वांबरोबर फोटो काढायला मिळाले..
ज्या उत्साहाने सर्वजण आले त्यापेक्षा जास्त उत्साहाने पुन्हा भेटू म्हणत आपापल्या वेळेत निरोप घेत होते.
एकूणच ६०- ७० सर्वच गझलकारांच्या गझल, बरोबरीने सादरीकरण, प्रत्येक मुशायराचे सुत्रसंचालन,अध्यक्षांचे मनोगत साऱ्यांनीच नवी मुंबईच्या वाशीमधे अखिल भारतीय दुसरे महिला गझल संमेलन विष्णू दास भावे नाट्यगृह गाजवले..!
महिला गझल संमेलन मधे मुंबई बाजारपेठेचे डॉ.कौतिकजी दांडगे सरांनी लकी ड्रॉ पद्धतीने सर्वच भगिनींना पर्स बरोबर जी भेट दिली आहे ती अभिमानास्पद आहे..
आणि विष्णू दास भावे नाट्यगृहामधे सर्व गझलप्रेमींना गझलमंथन समूहाची गुरुकिल्ली मिळाली..
मी इथे आवर्जून म्हणेन जसे समूद्र मंथनातून चौदा रत्न बाहेर आली..तशीच मला गझलमंथन समूहाने सामावून घेतले आहे त्यामुळे अशी मोठमोठी (गझल रत्न) व्यक्तीमत्व भेटत आहेत..भेटत राहो.हीच ईश्वर चरणी मनापासून प्रार्थना!
मुंबई गझलमंथन कार्यकारिणीचे मनापासून आभार आणि अभिनंदन तुम्ही सर्वांनी जी मेहनत घेतली ती अतिशय सुंदर आणि यशस्वी झाली आहे..
गझलमंथन समूह आयोजित अखिल भारतीय दुसरे मराठी महिला गझल संमेलन साठी लाभलेल्या सर्वच मान्यवरांचे मनापासून आभार!
या अशा गझलमंथन साहित्य संस्थेसाठी अहोरात्र मेहनत घेऊन पडद्यामागे असलेली मुख्य कार्यकारिणीला मनापासून सलाम..
मला या समूहात सहभागी करून घेतल्याबद्दल मनापासून आभार आणि
तुम्हा सर्वांना माझा मनापासून सलाम!
सरिता प्रशांत गोखले
रत्नागिरी
-----------------------------------------------------------------
डाॅ. मनोज वराडे आणी मुंबईची पुर्ण कार्यकारिणी मुख्यत: मुंबई जिल्हा अध्यक्ष प्रणाली म्हात्रे, त्यांच्या सहकारी सोनाली जगताप योगिता ताकतराव,, संमेलन समिती अध्यक्ष मुकुंदराव जाधव, संमेलन समिती संयोजक प्रदीपजी तळेकर, प्रसिध्दी प्रमुख भरत माळी, संस्थेचे अध्यक्ष अनिलजी कांबळे, उपाध्यक्ष देवकुमारजी, सचिव जयवंत वानखेडे सर आणि संपूर्ण राज्य कार्यकारिणी, कोकण विभाग कार्यकारिणी, आणि मुंबई जिल्हा कार्यकारिणी, मार्गदर्शक समिती सदस्य कैलास सर आणि प्रमोद खराडे या सर्वाचे आभार .
वाशी येथे घेण्यात आलेला गझल मंथन साहित्य संस्थेच्या मुंबई कार्यकारिणीने आयोजित केलेला अखिल भारतीय दुसरे महिला संमेलन सोहळा थाटात साजरा झाला
आपल्याच गझलमंथन संस्थेनी फक्त महिलांची दोन गझल संम्मेलने लागोपाठ दोन वर्षे आत्तापर्यंत घेतली आहेत.
व मागच्या वर्षीपेक्षा जास्त महिला संस्थेच्या समुहात आल्या व जास्त महिलागझल नव्याने ही शिकल्या .
गझल मंथन सतत गझल प्रचार प्रसार करत असते .
दुसऱ्या मुशायऱ्यात मधे गझल सादरकरणाची संधी दिल्याबद्दल मी आपली आभारी आहे
दिग्गज गझलकारा मा. ममता सिंधुताई ,हेमलता ताई,सुनिता रामचंद्र गझलकारा या समारंभात भेटल्या. तसेच मार्गदर्शिका गझलकारा मा. स्नेहलताईंची च्या मनोगतातुन गझल लिहायला मनाला प्रेरणा व लेखणीला उर्जा मिळाली..
मान्यवरांचे गझल मार्गदर्शन व गझलमुशायरा
वाखाणण्यासारखा झाला.
मुंबई कार्यकारिणीने मध्यवर्ती हाॅलचे व मुशायऱ्याचे आयोजन आणि नियोजन खूप छान केले होते .
दरवाज्याजवळची सुरेख रांगोळी एक पर्स व गजरा/गुलाब पुष्प देऊन सर्व भगिनींचे स्वागत केले. तसेच चहा जेवण बसायची व्यवस्था बघणार्यामधे टीमवर्क ऊत्तम होते . गझलमंथनचे
स्मृतिचिन्ह व गझल पुस्तक भेट खूप छान आहे .
मुंबई कार्यकारिणीला मानाचा सलाम आणि कौतुक.
अनेक गझलकारांच्या बहारदार गझल एकाच ठिकाणी ऐकायला मिळाल्या. इर्षाद, मुकर्रर वाहवा हे शब्द सतत हाॅलमधे गुंजत होते बर्याच इतर जिल्ह्यांतील मैत्रिणींशी बोलणे झाले ,बरोबर फोटो वगैरे निघाले. सुत्र संचालकांनी मुशायरा संचालन कमी वेळात केले पण बहारदार केले.
लकी ड्राॅचे बक्षिसही पुणे जिल्ह़यातील सखी
तरूजा भोसले ला मिळाल्यानी आमचा आनंद द्विगुणीत झाला (आम्हाला पार्टी मिळणार आहे)
पुढच्या वर्षी नवीन मुशायऱ्यात मुंबईत असेच नक्की भेटुया .
डाॅ. रेखा देशमुख
बाणेर, पुणे
सेक्रेटरी,पुणे जिल्हा कार्यकारिणी
-----------------------------------------------------------------
शक्तीच्या विचारांची, कर्तृत्वाची अन् मायेची मनाला चिंब करणारी बरसात…..गझल मंथन आयोजित दुसरे अखिल भारतीय महिला गझल संमेलन २०२५
रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा
गुंतूनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा
संसाराच्या गुंत्यात गुंतलेली ती… घर, मुले, संसार, नोकरी, करिअर या चाकोरीत चालू असलेला खेळ मदाऱ्याप्रमाणे अविरत खेळणारी ती, नात्यांच्या अन् कर्तव्याच्या चक्रव्यूहात सापडलेली ती… तिला अलगद उचलून कोणीतरी एका सुंदरशा दुनियेमध्ये घेऊन जाते. जिथं हवा आनंदाने भरलेली असते, हास्यरुपी तुषार त्यांचा सडा शिंपडीत असतात, ममत्वाच्या फुलांची उधळण तिच्यावर होत असते, लाडाच्या, कोडकौतुकाच्या पायघडया तिच्या पायाशी अंथरल्या जातात…ही जादुई दुनिया तिच्यासाठी उभी करणारा एक निरपेक्ष देवदूत असतो… जो कुठल्याही नावासाठी किंवा प्रसिद्धीसाठी हे करत नाही. . त्याला ह्या कार्यासाठी साथ देणारे त्याच्यासारखेच अनेक दूत (हे जग खरंच चांगलं आहे ह्यावर विश्वास बसू लागतो) भेटतात …. आणि मग जे होते त्याला म्हणतात…दुसरे अखिल भारतीय महिला गझल संमेलन… जिथे उडान घेऊ पाहणाऱ्या महिलांना स्वच्छंद उडण्यासाठी अवकाश उपलब्ध करून दिले गेले. गझल मधन आयोजित १९ जाने २०२५, रविवारी, विष्णुदास भावे सभागृह वाशी मुंबई, इथे पार पडलेले दुसरे अखिल भारतीय महिला गझल संमेलन म्हणजे प्रत्येक महिलेला स्वतःचे वेगळे विश्व, जग निर्माण करण्यासाठी मिळालेली पर्वणी होती…जिथे महिलांनी या संधीचे सोने केले….
थोडक्या मुद्द्यातच मांडते
हॉलच्या प्रवेशद्वारावरची रंगांची उधळण करत सहर्ष स्वागत करणारी हसरी आकर्षक रांगोळी,
संमेलन उद्घाटनामध्ये स्नेहलताईने मधाळ वाणीमध्ये केलेले, तिच्या मनाच्या तळातून आलेले ओघवते, भाषण गझल लिहिण्यासाठी नेमके काय गरजेचे आहे? हे मांडणारे मार्गदर्शन म्हणजे एका निगर्वावी शिल्पकाराने कोरलेल्या शिल्पाप्रमाणे मनावर उमटलेला ठसा आहे.
ममता ताईचा साधेपणा, हेमलता ताईंचा सच्चेपणा आणि सुनंदाताईंचा खरेपणा भावला.
पहिल्या सत्रातील निमंत्रितांचा अव्वल मुशायरा,
खूप जुन्या चेहऱ्यांशी भेट आणि नवीन सख्यांशी ओळख, नंतर एकापेक्षा एक असे सरस, दिलखेचक मुशायरे झाले
जयश्रीसकट अंजली, दिपाली कुलकर्णी , दिपाली सुशांत, पल्लवी व मनाली ( तुम्ही सगळ्या सख्या वाटता म्हणून एकेरी) या सगळ्याच सूत्रसंचालकांनी केलेले बहारदार सूत्रसंचालन
प्रवीणभाऊ, मुकुंदभाऊ यांनी सकाळी लागणारी केलेली सगळी तजवीज तसेच योगिता (तिच्या साधारण ८-१० वर्षाच्या मुलीने सुद्धा आईसाठी दिवसभर हॉलमध्ये बसून वेळ काढला), सोनाली आणि कुटुंबासकट राबणारी, कावळ्याची नजर व हरणाची चपळता असणारी प्रणाली या तिघींच्या मेहनतीची फलश्रुती म्हणजे संध्याकाळी हॉलमधून बाहेर पडणारे समाधानी चेहरे होते.
आजारी असताना सुद्धा केवळ जबाबदारी पूर्ण करण्यासाठी हजेरी लावणारे माझे मित्र मनोजजी,
गरमागरम नाष्टा, जेवण, संध्याकाळचा चहा
सन्मानासोबत दिलेले हळदीकुंकूचे वाण,
१७५ बहिणींसाठी पुढच्या वर्षी आणखी दमदार महिला संमेलनाची घोषणा करणारे कौशिकजी आणि मनाला स्पर्शून जाणारे त्यांचे दातृत्व,
आप्पांसारख्या निखळ व्यक्तिबरोबर पहिल्याच भेटीत झालेल्या दिलखुलास गप्पा, प्रमोददादाने केलेली चौकशी की घेतलेली फिरकी म्हणू? श्रोते म्हणून हजर राहून सगळ्या महिलांना प्रोत्साहन देणारा तमाम पुरुषवर्ग
अशा अनेक मोजता न येणाऱ्या, अभौतिक, अलौकिक गोष्टींनी भरभरून गेलेले हृदय, नवी ऊर्जा देणारे आणि दर्दींची खचाखच गर्दी झालेले हे महिला संमेलन कायमच मनपटलावर कोरे करकरीत राहील.
प्रत्येक संमेलनाला जातीने हजर असणाऱ्या, शेवटपर्यंत थांबणाऱ्या माझ्या लाडक्या माई आणि ‘वन मॅन आर्मी’ मानसीताईची कमतरता प्रकर्षानं जाणवली.
पुढल्या वर्षीच्या महिला गझल संमेलनाची घोषणा नुकतीच झाली. खूप आनंद वाटला. भविष्यात असेच अजून उत्तमोत्तम संमेलन आयोजित करण्यात आणि तुम्हा सगळ्यांचे स्वागत करण्यात समाधान मिळत राहील.
डॉ. सुजाता मराठे
------------------------------------------------------------------
" गझल मंथन साहित्य संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा " !
"अथांगतेला अवकाशाच्या भिडून घ्यावे म्हणते
माण्याआधी जमेल तितके जगून घ्यावे म्हणते "
स्नेहलता झरकर अंदुरे
स्त्रीयांच्या अभिव्यक्तीला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी , त्यांच्या पंखांमध्ये उत्तुंग गगनभरारीसाठीचे बळ आणण्यासाठी गझल मंथन साहित्य संस्थेव्दारे आयोजित
दुसरे अखिल भारतीय महिला गझल संमेलन
दि १९ जाने २०२५ रोजी विष्णुदास भावे नाट्यगृह , वाशी (नवी मुंबई ) येथे उत्साहाने पार पडले .
याबद्दल गझलच्या प्रचार , प्रसारासाठी तळमळीने , सात्यत्याने , निस्वार्थपणे प्रयत्न करणारे गझल मंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष आ . अनिलजी कांबळे , उपाध्यक्ष देवकुमारजी, सचिव जयवंत वानखेडे सर , उपसचीव उमाताई तसेच गुरुवर्य आ . डॉ .काळे सर , डॉ . स्नेहलताई , डॉ . राजरणधीर यांचे केवळ आभार नव्हे तर आम्ही त्यांचे ऋणाईत आहोत.
साहित्य क्षेत्रातील नामांकित महिला गझलकारांच्या गाठी भेटी व त्यांना प्रत्यक्ष ऐकण्याचा आनंद आणि महिलांच्या लिहीत्या हातांच्या अभिव्यक्तासाठी उपलब्ध करून दिलेले व्यासपीठ म्हणजे गझल मंथन साहित्य संस्थे व्दारे सतत आयोजित केली जाणारी अशी संमेलने .
संमेलनाध्यक्षा -आ . डॉ . सुनंदा ताई , प्रमुख पाहुण्या ममताताई , आवर्जुन उपस्थित राहिलेल्या हेमलता ताई , स्वागताध्यक्षा- डॉ.स्नेहलताई , सुनीता ताई ... सगळ्यांनी किती अत्मियतेने मार्गदर्शक मनोगते व्यक्त केली . मुशायऱ्यात अप्रतिम गझलाही सादर केल्या .
ममता ताईंचे अगदी थोडके पण ममत्वाचे बोल . स्नेहलताईंचे अंतर्मनाला हेलावून सोडणारे बोल .
हेमलता ताई , सुनिता ताईंनीही तितक्याच आत्मियतेने सर्वांशी साधलेला संवाद . आ . जाधव सर , गायकवाड सर, मनोज वराडे सर, प्रमोद खराडे सर ई मान्यवरांची मार्गदर्शक सुंदर मनोगते .. सार सार कांही किती प्रगल्भ , किती श्रवणीय! - फक्त ऐकत ऐकतच रहावं असं ...
स्नेहलताई फक्त सुंदर गझल लिहीतात असे नव्हे तर गझल त्यांच्या अणू रेणूत पाझरली आहे , मुरली आहे . त्या जेव्हा स्वभान विसरून, अंतर्मनातुन व्यक्त होतात तेव्हा " गझलेशी तादात्म्य " होणं म्हणजे काय असतं हे कळतं , जाणवतं . स्वतः स्नेहल ताईच एक " गझल " नव्हे तर " हासीले गझल " आहेत असे मला तरी मनापासून म्हणावेसे वाटते . ममता ताईंनी तर त्यांना चक्क " गोड प्रकरण " हा कित्ती गोड "किताब " दिला . तो सार्थ वाटतो .
संस्थेव्दारे "गझल यात्री पुरस्कार " - मा . डॉ . मनोज वराडे , मानसी जोशी , सचीन इनामदार , प्रणाली म्हात्रे यांना, "गझल ध्यास " पुरस्कार माधुरी खांडेकरला , "गझल क्रांती " पुरस्कार सुनिता रामचंद्र यांना आणि " गझल सोबती " पुरस्कार आ . डॉ . कौतिक दांडगे यांना देवून सन्मानित करण्यात आले हे प्रसंसनिय .
मुंबई कार्यकारिणीच्या अध्यक्षा प्रणाली ताई व सदस्यांनी अतिशय काळजीपूर्वक पणे हे संमेलन यशस्वीरित्या पार पाडले . सुंदर रांगोळी , अगदी हसतमुखाने हळदी कुंकू लावून , सुंदर पर्स भेटवस्तू देवून स्वागत , छान नाश्ता चहा पाणी , मस्त जेवण , बुके ट्रॉफी , पुस्तक भेट , प्रमाणपत्रे .. सार कांही छान ..छान
महिलांच्या उत्साहवर्धक भरपूर प्रतिसादामुळे चक्क हॉल कमी पडावा .. हेच या संमेलनाच्या यशस्वीतेचे घोतक आहे . आ .डॉ . कौतिक दांडगे सर म्हणाले या संमेलनाच्या योगे मला .. खूप साऱ्या भगिनी मिळाल्या आणि या वेळी हॉल संख्येच्या मानाने कमी पडला याची त्यांनी केवळ खंत व्यक केली नाही तर पुढच्या वेळी होणाऱ्या संमेलनाला सुमारे २००० भागिनी सहभागी होतील अशी आता व्यक्त करून ते म्हणाले त्यावेळी या भगिनी प्रशस्त एअर कंडिशन्ड हॉल मध्ये आपल्या सुंदर गझला सादर करतील " असे आश्वासनही दिले - एका भावाची बहिणींच्या आनंदासाठी किती धडपड . . त्यांचेही अगदी मनःपूर्वक धन्यवाद .
तसेच या " महिला "संमेलनाच्या यशस्वी कार्यवाहीसाठी अथक प्रयत्न करणारे आ . शिवाजी काळे सर, मुकुंदराव जाधव सर , प्रदीप तळेकर सर , मनोज वराडे सर व अन्य पुरुष सदस्य यांच्या पडद्यामागच्या भुमिकेला मनःपूर्वक सलाम .
आ . उर्मिला माई , आ . काळे सर , आ . राज सर यांची तसेच आ .अनिल कांबळे सर , देवकुमार सर , भरत माळी सर आणि जास्त गझल सख्या आल्या असला तर सच में सबकी खुशी को चार चांद लग जाते ।
कारण संमेलने , मुशायरे हे निमित्त असतं पण खरे तर हा साहित्य समुहाचा स्नेह मेळावा असतो .
अनवधानाने कोणाचा नामल्लेख राहिला असल्यास क्षमस्व
कितीतरी गझल सख्यांच्या ओळखी , गप्पा , मस्ती , एकमेकिंच्या फिरक्या घेत , सुंदर निवेदने आणि वाहवा आणि टाळ्यांच्या प्रतिसादात पार पडलेले एकसे बढकर एक सहा मुशायरे - ऐकण्यात कब शाम ढल गई - पताही नही चला . संमेलनास जाणाऱ्या सख्यांचा मी ग्रुप केला व नांव दिले - " कसं कसं जायाचं वाशीला " - आणि सख्यांच्या खळखळून हास्याला सुरुवात झाली ते हास्य दिवसभर तसेच चेहेऱ्यावर विराजमान होते . सकाळी सहाला घर सोडले ते रात्री बाराला गाठले पण दंगा मस्तीत , गझलानंदान - नो थकवा ' नो शीण . उलट मेंटली ऑन फिजीकली बॅटरी रिचार्ज झाली असेच मी म्हणेन . या योगे आयुष्यातील जपून ठेवण्या सारखे अविस्मरणीय क्षण वाट्यास आले हे मात्र खरे .
पहिल्या अखिल भारतिय महिला गझल संमेलनापेक्षा दुसऱ्यात महिलांचा जास्त प्रतिसाद हे प्रशंसनिय . तिसऱ्या संमेलनात समस्त गझल मंथन परिवार असावा अशी मनोकामना आणी भावी काळात गझल मंथन साहित्य समुहाने " आंतरराष्ट्रीय महिला गझल संमेलन " आयोजित करावे असेही सुंदर स्वप्न ..
मै अकेला ही चला था जानीब - ए - मंज़ील मगर
लोग साथ आते गए और कारवाँ बनता गया
मजरूह सुल्तानपुरी
डॉ. विजया नवले (झरकर )
पुणे
उपाध्यक्षा - गझल मंथन साहित संस्था - पुणे विभाग कार्यकारिणी .
------------------------------------------------------------------
मंतरलेले क्षण
मराठीची आणि महिलांची अस्मिता जपणारा असा देखणा कार्यक्रम, गझल मंथन आयोजित दुसरे अखिल भारतीय महिला गझल संमेलन मुंबई विभाग वाशी येथे विष्णुदास भावे हॉलमध्ये १९ जानेवारी २०२५ रोजी संपन्न झाला.
🌹🌿🌹🌿🌹🌿🌹
हे मंतरलेले क्षण अनुभवण्याचे आणि त्यात कार्य करण्याचे अहोभाग्य मला आपल्या गझल मंथनचे सर्वेसर्वा आ. अनिल जी कांबळे सरांनमुळे मिळालेत. तसेच आ. मनोज वराडे, आ. स्नेहलता ताई यांचे अतिशय मौल्यवान मार्गदर्शन होते. आ. प्रणाली ताई, सखी योगिता यांच्याबरोबर खूप काही नवीन शिकायला मिळाले. सर्वांना एकत्र करून सगळ्यांची मन सांभाळून व्यवस्थित कार्यक्रम कसा करावा, हे शिकायला मिळाले.
सकाळी ८:३० पर्यंत विष्णुदास भावे हॉलमध्ये अतिशय सुंदर रांगोळीने स्वागत केले त्यामुळे मन अतिशय प्रसन्न झाले. माझ्या आधी सन्मा. सुनंदाताई भावसार आलेल्या होत्या. त्यांना भेटताच खूप आनंद झाला. आम्ही दोघी खानदेशी कन्या आहोत.🙏
हळूहळू सर्व सारस्वतांचे आगमन झाले. माझ्यासाठी जवळजवळ गझलकारा मैत्रिणी नवीन होत्या. तरीसुद्धा सगळ्यांना भेटून पहिल्या भेटीचा नाही... नाही... तर या आधी अनेक वेळा भेटल्याचा अनुभव मिळाला. जेव्हा उद्देश्य सगळ्यांचा एकच असतो. तेव्हा सगळेजण विचारांनी एक होऊन जातात. त्यामुळे वेगळेपण असे भासत नाही. युगायुगांचे अंतर मिटल्याचा हा अद्भुत अनुभव मिळतो.
फक्त एकमेकांना बघून आनंदाचे भरते हृदयात दाटून येतात. हा परमानंद फक्त अनुभवायचा असतो.
संमेलनाध्यक्षा आ. सुनंदाताई शेळके, प्रमुख पाहुण्या आ. ममताताई सपकाळ, आ. स्नेहलताई कुलकर्णी, सुनिताताई रामचंद्र, आ. हेमलताताई पाटील, आ. माधुरीताई खांडेकर, आ. सुजाताताई मराठे. आ. सुनेत्रा जोशी, आ. मीनाताई शिंदे, आ. दिपाली ताई, आ. अपर्णाताई, मनालीताई यांना प्रत्यक्ष ऐकायला मिळाले.
आ. उर्मिलामाई यांची पण भेट झाली असती तर किती छान झाले असते. खरोखर त्यांची उणीव जाणवली.
आ. ममताताई मी काय बोलू? भेटी लागी जीवा... अशी अवस्था झाली होती. पण माऊली ने पाहता क्षणी ओळखले आणि मला तिच्या कुशीत जायला मिळाले. असा क्षण भाग्याने मिळाला. मला ईश्वराचा स्पर्श झाला... यात काहीच शंका नाही.
त्या कुशीत आ. सिंधुताईंच्या आशीर्वादाचा सुगंध होता. ईश्वर तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करोत.... तुमचे समाजकार्याचे व्रत तुमच्या सिद्ध हस्ताने पूर्ण होवोत, हिच कामना. त्याचप्रमाणे अखंड साहित्य सेवा तुमच्या हातून होवो.🙏 आपल्याला प्रत्यक्ष ऐकायला मिळाले खूप वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले 🌹 श्रीरामाची कृपा.....
संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या गझलकारा महिलांचे स्वागत फुले आणि पर्स देऊन केले. सादरीकरणानंतर पुस्तके ही देण्यात आली.
या कार्यक्रमात माझी मैत्रीण मा. पुष्पाताई कोल्हे, पल्लवी उमरे, ऋचा पारेख आणि तिचे यजमान, सरोज भिडे आणि तिचे यजमान, स्मिताताई, सीमाताई झुंजारराव. आवर्जून आल्या होत्या. अगदी अचानक सूत्रसंचालनाचे काम पल्लवी ताईंना दिल्यावर त्यांनी खूप सुंदर रित्या पार पाडले हे गझले वरचे व गजल मंथन वरचे प्रेम प्रकर्षाने दिसून आले. गझलच्या प्रेमापोटी आ. रवींद्र देशमुख सर सकाळपासून तर शेवटपर्यंत उपस्थित होते.
आदरणीय सचिन इमामदार सर आणि प्रमोद खराडे सर यांचीही भेट झाली. प्रत्यक्ष आप्पासाहेबांची पण भेट झाली.
सर्व उपस्थित गझलकरांच्या गझल ऐकताना असं वाटत होतं की कसं जमतं एवढं सुंदर लिहायला....सर्वांचे मनःपूर्वक आभार, की आपण आलात आणि आम्हाला दर्जेदार रचना ऐकायला मिळाल्यात. खरंच आपल्या महाराष्ट्रात अशा सुंदर गझलकरा संपूर्ण जगासमोर येत आहे आणि साहित्य यज्ञ होत आहे. याचा सार्थ अभिमान वाटू लागला. आपणा सर्वांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देते.
महत्वाची गोष्ट म्हणजे अशा उत्तम संमेलनात आपण ऐकायला यायचं असतं मान्यवरांचे विचार आणि त्यातून मिळणारे प्रबोधन त्यामुळे नक्कीच आपल्याला एक उत्तम मार्गदर्शन मिळते.
नियोजन करताना अनेक अडचणींवर मात करून आ. प्रणाली ताईंनी अतिशय सुंदर प्रकारे नियोजन केले. चहापाणी नाश्ता जेवण संपूर्ण कार्यक्रमावर लागणाऱ्या गोष्टी. व्यवस्थित वेळेवर उपलब्ध होत्या. कोणाचीही गैरसोय होणार नाही, याची पूर्ण काळजी घेण्यात येत होती. प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह योगिता ताईंनी खूप सुंदर आणले होते.
आ. कौतिक दांडगे सरांनी अतिशय बहुमूल्य योगदान दिले. मान्यवरांना पैठण्या, दहा हजार रुपये voucher डायमंडचे... लकी ड्रा मध्ये ठेवले होते. त्यामुळे सगळ्यांना अजून उत्साह आला. खरोखर गझल सोबती हा पुरस्कार त्यांना अतिशय शोभतो.... सर आपण आलात त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद...
खरंतर पडद्यामागील भूमिका निभावणारे संमेलन समिती अध्यक्ष मुकुंदराव जाधव, संमेलन समिती संयोजक प्रदीपजी तळेकर, प्रसिध्दी प्रमुख भरत माळी, संस्थेचे अध्यक्ष अनिलजी कांबळे, उपाध्यक्ष देवकुमारजी, सचिव जयवंत वानखेडे सर आणि संपूर्ण राज्य कार्यकारिणी, कोकण विभाग कार्यकारिणी, तसेच उपविभाग आणि मुंबई जिल्हा कार्यकारिणी, मार्गदर्शक समिती सदस्य कैलास सर आणि प्रमोद खराडे या सर्वाचे आभार.
धन्यवाद 🌹
सौ. सोनाली जगताप
वांद्रे, मुंबई
------------------------------------------------------------------
पदरात दान पडलं
काहीतरी नक्कीच असावी पूर्वजन्मीची पुण्याई
त्याशिवाय का गझले तुझ्यासोबत नाळ जुळावी
१९ जानेवारी २०२५ रोजी वाशी येथे गझल मंथन साहित्य संस्था आयोजित दुसरे अखिल भारतीय महिला गझल संमेलनाची साक्षीदार होता आले.
आभार, कृतज्ञता हे शब्द देखील आता तोकडे पडत आहेत एवढे आम्हाला गझलमंथन या संस्थेकडून मिळाले आहे,मिळत आहे आणि मिळत राहणार आहे याबद्दल तीळ मात्र शंका नाही.
आम्हा नवोदितांना गझलेचे तंत्र आणि मंत्र समजावून देण्यापासून ते गझल सादरीकरणासाठी उत्तम व्यासपीठ मिळवून देण्यापर्यंतचे आपले अथक परिश्रम व गझलेप्रती तळमळ कौतुकास्पद आहे वंदनीय आहे व अनुकरणीय आहे.
नाट्यगृहात प्रवेश केल्यानंतर प्रथम दर्शनी नटराजाची मूर्ती आणि त्या समोरील नेत्र दीपक रांगोळीने मन प्रसन्न झाले. मुंबई कार्यकारिणीचे उत्तम नियोजन व सहकार्य वाखण्याजोगे आहे. स्त्रियाच स्त्रियांना मदत करत नाहीत अशी ओरड करणाऱ्यांना तोंडी प्रत्युत्तर न देता मुंबई कार्यकारणीच्या टीमने आपल्या कामगिरीने चोख प्रत्युत्तर दिले आहे. सर्वांना सामावून घेणाऱ्या जिंदादील मुंबईकरांच्या mumbai spirit ला सलाम 🫡
आदरणीय स्नेहलताई कुलकर्णी यांचे मार्गदर्शन मिळणे म्हणजे परिसस्पर्श होण्यासारखेच आहे. त्यांना प्रत्यक्ष पाहणे व ऐकणे हा माझ्यासाठी एक सुख सोहळा होता. गझलेच्या प्रसारासाठी त्यांचं योगदान अमूल्य आहे. मंत्रमुग्ध करणारे तुमचे मनोगत प्रत्यक्ष ऐकणे हा एक रोमांचकारी अनुभव होता. तुमचे मनोगत मांडताना तुम्ही स्वतः देखील एका वेगळ्याच विश्वात होतात व आमचा हात धरून आम्हाला देखील एका वेगळ्याच विश्वात घेऊन गेला होतात. खरोखर एक अद्भुत अविस्मरणीय असा शब्दातीत अनुभव. आपल्या कार्यास प्रणाम🙏🏻
आ.ममता सिंधुताईंना पाहणे व ऐकणे हे स्वप्न साकार झाले😍🥰 एक दिव्य अनुभूती.
सुनिताताई यांचे मनोगत खूप प्रेरणादायी होते. नात्यांमध्ये मैत्री असावी हा त्यांचा संदेश अनमोल आहे.
आ.सुनंदा ताईंनी आपल्या अध्यक्षीय भाषणात गझलेचा प्रवास खूप सुंदर पणे रेखाटला.त्यांची गझले वरील निष्ठा व व्यासंग वाखाणण्याजोगे आहे. त्यांनी काही निवडक गझलकारांचे शेर उद्धृत केले.यात माझ्या
कारणांची ढाल करणे फार झाले
मी प्रयत्नांच्या रथावर स्वार झाले
या शेराचा समावेश केल्याने खूप आनंद झाला. खरे तर हा शेर लिहिल्यापासून मला कोणत्याही कठीण परिस्थितीत या शेरा मुळे खूप ऊर्जा मिळते. आणि आदरणीय सुनंदाताईंनी तोच शेर निवडला. माझी ओळख अशा सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या शेरामधून झाली. माझी लेखणी धन्य झाली😍
या संमेलनामुळे ज्योत्स्नाताई राजपूत यांच्याशी ओळख झाली आणि पहिल्या भेटीतच त्यांनी एवढे प्रेम आणि जिव्हाळा दिला की जणू काही आम्ही वर्षानुवर्ष एकमेकींना ओळखत आहोत. त्या म्हणजे खरोखरच उत्साहाचा एक खळाळता झरा आहेत.
या संमेलनात उपस्थित राहण्यासाठी माझी प्रिय सखी माधुरी वेळात वेळ काढून आली. धावती का होईना आमची भेट झाली. छान वाटले.
खरेतर दहावीपर्यंत ठाण्यामध्ये शिक्षण झालेल्या मला मुंबई म्हटलं की शाळेचे दिवस आठवतात😍🥳 आणि गझल संमेलन वाशी मध्ये आहे असे समजल्यापासून एकच गाणे मनावर रूंजी घालत होते.
दिन रात दौडती पहियोपे..
सबको तेज भगाये
बसती है सबके खाबमे..
पर हाथ कभी ना आये
तू दिल के दरिया की रानी...
चमके तू मासोली वानी...
मायानगरी आहे की आहे जंतर-मंतर...
बारा महिने चालू आत कुठले यंतर...
Love you Mumbai....
जसा माझ्या शालेय जीवनाचा श्री गणेशा या उपनगरात झाला तसाच माझ्या गझल सादरीकरणाचा श्री गणेशाही या उपनगरामध्ये झाला. याचा खूप आनंद आहे मात्र त्या दिवशी मला माझ्या बाबांची उणीव जाणवत होती.
सर्व मान्यवरांना पाहता ऐकता आले व त्यांचा सन्मान होत असतानाचे साक्षीदार झाल्याचा खूप आनंद आहे.सर्व ज्ञात अझात कार्यकर्त्यांना व मान्यवरांना धन्यवाद.स्नेह असाच वृद्धिंगत व्हावा हेच परमेश्वराकडे मागणे 🙏🏻🙏🏻🙏🏻
खरंच या संमेलनाकडून जेवढी अपेक्षा होती त्यापेक्षा कैक पटीने पदरात दान पडलं. ही प्रेमाची शिदोरी पुढील प्रवासात नक्कीच उपयोगी होईल यात शंकाच नाही.
😍 दEurek(h)a 🥰
😍 दयुरेखा 🥰
सौ. रेखा दयानंद हिरेमठ.
सांगली.
------------------------------------------------------------------
गझल मंथन साहित्य संस्थेचा एक महत्वाकांक्षी उपक्रम असलेले कालचे दुसरे अखिल भारतीय महिला गझल संमेलन अत्यंत यशस्वी करून दाखवल्याबद्दल संस्थेच्या मार्गदर्शिका डॉ. स्नेहलजी कुलकर्णी, कोकण विभाग प्रमुख डॉ. मनोज वराडे, मुंबई जिल्हा अध्यक्ष प्रणाली म्हात्रे, त्यांच्या सहकारी सोनाली जगताप आणि योगिता ताकतराव, संमेलन समिती अध्यक्ष मुकुंदराव जाधव, संमेलन समिती संयोजक प्रदीपजी तळेकर, प्रसिध्दी प्रमुख भरत माळी, संस्थेचे अध्यक्ष अनिलजी कांबळे, उपाध्यक्ष देवकुमारजी, सचिव जयवंत वानखेडे सर आणि संपूर्ण राज्य कार्यकारिणी, कोकण विभाग कार्यकारिणी, आणि मुंबई जिल्हा कार्यकारिणी, मार्गदर्शक समिती सदस्य कैलास सर आणि प्रमोद दादा तसेच सहभागी झालेल्या सर्व मान्यवर महिला गझलकारांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार🌹🙏🏻
डाॅ. शिवाजी काळे
__________________________
संकलक:- भरत माळी
प्रसिद्धी प्रमुख, गझल मंथन साहित्य संस्था
मो. 9420168806

















0 Comments