Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

अध्यक्षीय भाषण Gazalkara Dr Sunanda Shelke

अध्यक्षीय भाषण 



(नवी मुंबई येथे गझल मंथन साहित्य संस्थेतर्फे आयोजित दुसऱ्या अखिल भारतीय महिला गझल संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. सुनंदा शेळके यांचे अध्यक्षीय भाषण)


व्यासपीठावरील सर्व मान्यवर गझलरसीक मित्र आणि माझ्या गझल प्रेमी सख्यांनो, 

नवी मुंबई येथे आज संपन्न होत असलेल्या दुसऱ्या अखिल भारतीय गझल संमेलनातील संमेलनाध्यक्षपद हा माझ्या जीवनातील एक आनंदाचा आणि धन्यतेचाही क्षण आहे असे मला मनापासून वाटते. कोणत्याही गटा-तटात कधी डोकावत नसतानाही मला गझलमंथनने हा क्षण सन्मानाने दिला. गेल्या चोवीस वर्षात माझ्याकडून जे गझल लेखन घडले, ज्या आत्मियतेने आणि जिव्हाळ्याने मी ते लेखन केले, त्या माझ्या गझलेवरील निष्ठेचा हा सन्मान आहे असे मी मानते. हा सन्मान मला प्रदान करण्यासाठी ज्यांच्या मनात माझे नाव तरळले ते महानगरपालिकेचे नूतन उपायुक्त गझलकार मा. कैलास गायकवाड, माझे मानसबंधू गझलकार जनार्दन म्हात्रे तसेच या क्षेत्रातील व्यासंगी गझल अभ्यासक डॉ. राम पंडित सर या सर्वांची आणि गझल मंथन साहित्य संस्थेची मी मनापासून ऋणी आहे. 

     गझल मंथनची स्थापना झाल्यापासून मी पहात आहे की अतिशय नियोजनपूर्वक कार्यकमांची आखणी होत असते. उत्तम व्यवस्थापन कौशल्य गझलमंथनमध्ये दृष्टीस पडते. नवोदितांना प्राधान्य देण्याचे  उद्दिष्ट गझलमंचने नेहमीच महत्त्वाचे मानले आहे. स्नेहल कुलकर्णी यांनी महिला गझलसंमेलनाची संकल्पना मांडली आणि आपल्या अथक प्रयत्नांतून ती साकारही केली. गझलमंथनच्या माध्यमातून सतत विविध स्पर्धाचं, मुशायऱ्यांचं आयोजन करणं, गझल संमेलन भरवणं हे उपक्रम टप्या-टप्याने वर्षभर सुरु असतात. या प्रयत्नांतून कितीतरी गझलकार नव्याने उदयाला येत आहेत ते गझलमंथनच्या कार्यशाळांतून घडूनच! म्हणूनच  अगदी कमी काळात ही संस्था नावारुपाला आली आहे. 

त्यांच्या या कार्यासाठी गझलमंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे, उपाध्यक्ष देवकुमार गुमरकर, सचिन जयवंत वानखडे, सहसचिव उमा पाटील आणि सर्वच सदस्य यांचे मी मनापासून अभिनंदन करते. आजच्या संमेलन समितीचे प्रमुख ऍड. मुकुंदराव जाधव, समन्वयक प्रदीप तळेकर तसेच मुंबई जिल्हाध्यक्षा प्रणाली म्हात्रे या सर्वांच्या उत्तम नियोजनाला तोड नाही. त्यांचेही मनस्वी अभिनंदन! तसेच गझल क्रांती पुरस्कार प्रथितयश गझलकारा सुनिता रामचंद्रन यांना जाहीर झाल्याबद्दल त्यांचेही हार्दिक अभिनंदन करते.


      "करतात आतुनी आत्मा सुंदर गजला 

देतात सावली मला निरंतर गजला.


 हे जगणे माझे आत्मिक, सालस, हळवे

 देतील तयाचे या प्रत्यंतर गजला.


 मी मांडत नाही सार उभ्या जन्माचे

 माझ्यासम जगती मस्त कलंदर गजला.


ऐकताच मजला विचारती ते सारे 

'सुचतात कशा या सुंदर सुंदर गजला'?


 तू आलीस शिंपीत चांदणेच मज भवती

 अन् प्रेमाचे या झाल्या अंबर गजला. 


मी नसेन जेंव्हा पडद्यावर काळाच्या

गातील कुणीतर माझ्यानंतर गजला." 


     ही गजलसोबतची एकात्म भावना घेऊन मी गजलेसोबत जगत आले. तिच्यासाठी कोणताच अट्टाहास कधी धरला नाही. ती मात्र माझी हृदयस्थ सखी होऊन माझ्यासोबत जगत आणि वाढत राहिली. ती माझाच एक अविभाज्य घटक बनून माझ्यासोबत अशी राहिली की...


"भासते जेव्हा उदासी मज उरी धरते गझल 

अंतरीचे क्षेम माझ्या ही मला पुसते गझल.


आजपावेतो कधी मज वाटले ना एकटे 

मी जिथे जाईन तेथे सोबती असते गझल.


हे न माझे, ते न माझे,  मी न माझी हे खरे 

कोण माझे शोधताना फक्त ही उरते गझल."


       अरबस्थानात जन्माला येऊन इराण मध्ये वाढलेली गझल उर्दूमध्ये येते काय आणि तिथून पुढे हिंदी, मराठी गुजराती सारख्या भाषांचा वेष धारण करून अगदी आपलीच होऊन जाते काय, हा सगळाच गजलचा प्रवास अतिशय आकर्षक आहे. दशकानुदशके सांस्कृतिक, सामाजिक पातळ्यांवर बदलत्या अवस्थांतून पुढे सरकताना मीर आणि गालिबच्या प्रेम आणि व्यथा, विरहाच्या पलीकडे ती प्रांतिक भाषांतून आकारत राहिली.  तिने सामाजिक आणि राजकिय भानही आपलेसे केले. कालानुरूप पुढे सरकताना कितीतरी वळणे घेत, चढ-उतार सांभाळत, ही गजल आता सर्वसामान्यांची प्रीय अशी एक काव्यसखी होऊन गेलीय. इतर अनेक काव्यप्रकारांहून ती सर्वांना जवळची वाटण्याचं कारण म्हणजे 'आपल्याच भावना प्रकट झाल्याचा' रसिकाला प्रत्यय देण्याची तिची क्षमता, हेच तिचे शक्तिस्थान आहे. याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे.

     १४ मार्च, २००३ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने गझलकार सुरेश भट कालवश झाले आणि २००४ मध्ये अत्रे कट्टा, गोरेगाव तर्फे  त्यांच्या प्रथम स्मृतीदिनाच्या निमित्तानं राज्यस्तरीय गजल लेखन स्पर्धा झाली. त्यामध्ये माझी गझल स्पर्धेत यशस्वी झाली. तिथे सत्कार झाल्यानंतर कार्यक्रम संपल्यावर आम्ही सर्वजण निघण्यासाठी उठलो. इतक्यात साधारण पन्नाशीची एक स्त्री माझ्या दिशेने आली. तिच्या दोन्ही डोळ्यांतून अश्रू गळत होते. मला मिठी मारून ती म्हणाली, "तुम्ही माझीच गझल सादर केली". मला क्षणभर कळले नाही, परंतु माझ्या मागोमाग स्पर्धेचे परिक्षक गजलकार मनोहर रणपिसे, सदानं‌द डबीर आणि गांगण सर बाहेर पडत होते. ते म्हणाले "चला आम्ही योग्य न्याय दिला गझलेला. ऐकणाऱ्याला ती माझीच आहे असं वाटणं हेच त्या गझलेच्या यशस्वीतेचं गमक असतं." मला त्या गजलेतील दोन शेर स्मरताहेत...


"पाळलेले पाखरू मी पंख माझे छाटलेले 

मुक्ततेचे शब्द माझ्या मजकुरातून काटलेले


 चालते माझी भरारी फक्त भिंती आत चारी

 हातच्या रेषांतरीचे भाग्य माझे फाटलेले"


 या गझलेने त्या स्त्रीच्या मनाची अवस्था टिपली गेली होती आणि आमचा कोणताही परिचय नसताना श्रोत्यांमधून माझ्याजवळ येऊन तिने मला मिठी मारली होती. एक गजलकारा म्हणून माझ्या आयुष्यात गजलेने मला दिलेली ती मोठी शाब्बासकी होती. लहानाची मोठी होत असल्यापासून, अगदी कोवळ्या बालवयापासूनच स्त्रीचं दुःख मला जाणवत आलेलं आहे. स्त्री नेहमी प्रेमाची भुकेली असते आणि कितीही कष्ट पडले तरी या प्रेमापोटी आणि स्वाभिमानापोटी ती बरंच काही सहन करत आपल्या कुटुंबाचा भक्कम खांब होऊन  संसाराचा गाडा आनंदाने ओढत असते.

    आजचे हे गझल मंथनचे दुसरे महिला गजलसंमेलन आहे. साहित्याच्या इतिहासात कधी नव्हे इतके विविध स्तरांवरील सखीभाव आजच्या स्त्री गजलकारांच्या रचनांतून पहावयास मिळतात.


"वात्सल्याच्या उबेत माझे पोषण झाले

आईची सय पुन्हा रडवते वय झाल्यावर"

किंवा

"घरटे माझे सावरताना आयुष्याला हरवत गेले 

पंखामध्ये बळ असताना उडणे का मी विसरत गेले"


असे म्हणणाऱ्या विशाखा पाटोळे रत्नागिरीतून गझल लिहितात. मीर म्हणतात त्याप्रमाणं दुःखाशी मैत्री करणं जमलं म्हणजे गझल उजळत जाते, कारण या जगात दुःखच एकमेव शाश्वत आहे. सुख तसे क्षणभंगूरच!


"जन्म मला तू द्यावा आंदण पुढल्या जन्मी

या जन्माची नको आठवण पुढल्या जन्मी"


असे आजच्या संमेलनाच्या प्रमुख पाहुण्या मा. ममता सिंधुताई म्ह‌णतात तेंव्हा मीर यांच्या विचाराला पुष्टी मिळते. इतकेच नव्हे तर सर्वच गजलकारांना कमी-अधिक प्रमाणात या सत्याची प्रचितीही आली असेल. पनवेलच्या जोत्स्ना राजपूत म्हणतात -


"काळजाने काळजावर वार केला

लोचनांवर आसवांचा हार केला"


वंदना पाटील-वैराळकर म्हणतात -


" कधी संपेल आता सांग कारावास माझा

का मला छळतो कळेना जीवघेणा भास माझा.


ना कुणाचा हात पाठी ना घराणे गाजलेले

माझियापासून झाला हा सुरु इतिहास माझा." 


स्वागताध्यक्षा स्नेहल कुलकर्णी तर सरळ-सरळ काळालाच विचारतात -


"काळा तुला नव्याने जडल्या उजडेवाटा

झाली तुझी 'दिशा' की केलेस तू स्थलांतर?"


त्यांच्या गझलेत भरपूर विचारमंथन असते. गजलकार गजलेला जन्म देतो आणि गजल गजलकाराला जन्म देते ही दोन्ही सत्यं एकाच शेरात सुंदरपणे गुंफताना त्या म्हणतात-


"ही गर्भनाळ कुठली दोघीत वाटते मी

गझले तुला प्रसवते आणिक जन्मते मी".


कोल्हापूरच्या संजिवनी तोफखाने  म्हणतात-


" वाटेत फार काटे जाऊ नकोस पोरी

अन् संकटात जीवा घालू नकोस पोरी


खांद्यास लाव खांदा मर्दास साथ दे तू 

मर्यादशीलतेला सांडू नकोस पोरी"


संजिवनी ताई स्त्रीसुलभ भावनांइतक्याच अध्यात्मिक जाणीवाही सुंदरपणे गझलबद्ध करतात. कोल्हापूरच्याच सारिका पाटील म्हणतात -


"गुन्हा नोंदवू कसा कुणावर?

मी केलेला इच्छांचा वध!" 


सांगलीच्या रेखा हिरेमठ म्हणतात -


"कारणांची ढाल करणे फार झाले 

मी प्रयत्नांच्या रथावर स्वार झाले".


धाराशीव, अंधुरे येथून स्नेहलता झरकर म्हणतात-


 "अथांगतेला अवकाशाच्या भिडून घ्यावे म्हणते

 मरण्याआधी जमेल तितके जगून घ्यावे म्हणते " 


ठाणे येथील प्रा. मानसी जोशी म्हणतात-


" जात, धर्म अन् पंथ मनाशी घट्ट चिकटल्यानंतर

 माणुसकीचे अत्तर सगळे वाऱ्यावरती उडते."


असे अनेक शेर उदाहरणादाखल देता येतील जिथे गजलकारा अनेक अनुभवांशी स्वतःला जोडताना स्त्री म्हणून असलेलं आपलं अस्तित्वभान प्रखरतेने शब्दबद्ध करताना दिसतात. प्रत्येक स्त्रीचा तिच्या भोवतीचा परिवेश वेगळा असला आणि दुःखाच्या पाकळ्या वेगळ्या असल्या, तरीही शोषित म्हणून जो एकसंध संबंधांचा 

धागा तयार होतो, त्यातून या सगळ्याच स्त्रीया लेखनाच्या माध्यमातून एकमेकींशी स्वःताला जोडताना सहजपणे दिसून येतात. आपल्या आणि सभोवतालच्या स्थितीच्या अनुभवांतून त्यांना एकंदरीत स्त्रीच्या अस्तित्वाचे काहीएक भान येते. या स्त्रीभानामुळेच ती कुठल्याही स्त्रीच्या अवस्थेत स्वत‌:ला पाहू शकते. तरीही प्रत्येकीच्या गजल लेखनाचं वेगळेपण अबाधित आहे. त्यातलं सौंदर्यही वेगळं आहे.

      कोणतीही उत्तम साहित्यकृती ही अंतिमतः सौंदर्यमूल्याची जोपासना करणारी असते. ती तशी असल्यामुळेच तिला मूल्य प्राप्त झालेले असते. गझलकार आपल्याला अनुभवास आलेले कडू-गोड अनुभव शब्द‌रुपाने गजलेत गुंफत असतो. त्यामुळे अनेकदा गझलेतून व्यक्त झालेली सौंदर्याची पातळी जीवनातील रम्य गोष्टी, स्वप्ने, अपेक्षा, अपेक्षाभंगाचे दुःख यांच्या कल्पनारम्य सौंदर्यापेक्षा वेगळी असते. ती सौंदर्यातही वास्तव मांडते आणि वास्तवमांडणीलाही सौंदर्य प्राप्त करून देते. तिच्या अशा संमिश्र स्वरूपामुळेच गझल सौंदर्यवती होते आणि समृद्धही होते. मानवी जीवनातील सौंदर्य विशद करणाऱ्या गजलांतील अशी काही सौंदर्यस्थळं असतात की ती त्या गजलेला कलात्मक सौंदर्य देतात. गजलेत अभिव्यक्त झालेला अनुभव किंवा भाव, सुख किंवा दुःख कोणत्याही अनुभूतीला उलगडणारा असला तरीसुद्धा ती गजल अंतिमतः रसिकाला आनंद देण्याचेच काम करते.

   अनेक गजलांमधून सामाजिक, सांस्कृतिक, राजकिय अथवा शृंगारिक असे विविधप्रकारचे शेर येतात. या सगळ्याला सौंदर्य प्राप्त करून देते ती गजलेची भाषाशैली. भाषेच्या वापरात जितकी प्रगल्भता असेल तितकी ती गझल  समृद्ध आणि सुंदर होते. एखाद्या गजलकाराचे व्यक्तिमत्व सर्वसामान्य माणसा पेक्षा कसे वेगळे अनुभव घेते किंवा नेहमीच्याच अनुभवाकडे ते कसे वेगळ्या नजरेने पाहते हा त्याच्या प्रतिभेचा खास गुणधर्म गज‌लेला वेगळेपण देतो. एकाच विषयाला धरून प्रत्येक गझलकाराची अनुभव मांडण्याची धाटणी ही वेगळी असते. साध्या-साध्या अनुभवांतील सौंदर्यही गझलकार कसे न्याहाळतो, माणूस म्हणून जीवनातील अनुभवांचे चिंतन तो कसे सूक्षमतेने करतो, हे त्या गजललेला समृद्ध करणारे तसेच इतरांहून त्याला वेगळे ठरविणारे वैशिष्ठय असते. प्रत्येक गझलकाराचे स्वतःचे असे एक संवेदनशील, सामाजिक अथवा सांस्कृतिक चिंतन असते.

    गझल ही मुळातच एक सौंदर्यमय कलाकृती आहे. ती वाङ्‌मयीन सौंदयनि समृद्ध असल्यामुळेच रसिकाला प्रत्येक वेळेस अधिकाधिक आस्वाद देत जाते. तिच्या प्रत्येक वाचनातून अर्थाचे आणि संवेदनांचे थर जसजसे झिरपत जातील तसतसा रसास्वाद आणि तिचे सौंदर्य चाखण्याची ओढ रसिकाला अधिकाधिक लागत राहते. प्रति‌मा आणि प्रतिकांचा वापर गझलेला चित्ररूप बनवितो. गजलेतील प्रतिमा शब्दांनी निर्माण केलेल्या असतात. मूलतः त्या आपल्या अनुभवातून निर्माण झालेल्या मानसिक प्रतिमा असतात. दृष्य, नाद, गंध, स्पर्श, रसना अशा विविध अंगांनी त्या शब्दरूप घेतात. म्हणूनच गझलकाराची भाषा जितकी परिपक्व तितक्या प्रतिमा सहजरूपाने गझलेला सजीव करतात.

    शब्द, अलामत, रदीफ, काफिया, लय, छंद प्रतिमा, प्रतिके, रूपके, इ. अनेक घटकांचे सजीव संघटन म्हणजे गझल. या सर्व घटकांतून तिला जे शब्दरूप प्राप्त होतं ते दिसणारं असलं तरी तिचं एक अमूर्त अर्थबंधात्मक रूपही महत्त्वाचं असतं. या दोन्ही रुपांच्या एकत्रित बंधा मधूनच गझलेमध्ये 'गझलियत' येते. वरील सर्व घटक गजलेला फुलवितात. प्रत्येक शेरातून रसिकापर्यंत पोहोचणारा अर्थ म्हणजे आशय.  हा आशय अनुभवाचा अविष्कार असतो, त्याचवेळी त्यातून एक भावविश्वही साकार होत असते. केवळ सुंदर शब्दांच्या समुच्चयाने गझल साकारत नसते. आशय आणि भावविश्वाचा एकजीनसीपणा गझलेचा एक रूपबंध तयार करतो. हा एकजिनसीपणा जितका प्रभावीपणे येतो तितकी ती गझल अधिक प्रभावी होते. रसिकांना गुंतवून ठेवते. याचाच अर्थ त्यामध्ये गजलियत येते. गझलकार हा असा एक कलाकार असतो, जो शब्दांच्या आणि प्रतिमांच्या माध्यमातून शब्दांच्या आणि प्रतिमांच्या पलिकडचे असे काही व्यक्त करतो. 

    प्रसारमाध्यमांवर अनेक नवनव्या गझल वाचायला मिळतात. अनेकांनी वैवध्यपूर्ण आशयाला हात घातलेला असतो. पण मनातील विषय शब्दबध्द करण्याची त्यांची घाई शेरांतून डोकावते. आपली गझल किंवा गझलसंग्रह केंव्हा एकदा छापला जाईल याची उत्सुकता त्यांना असते. एकादा लिहून मोकळं झालं की आपण बाजी मारली, ही प्रवृत्ती गझलकारला किंवा - कोणत्याही कलाकाराला मारक असते. आपण लिहिलेलं आधी आपणच त्रयस्तपणानं वाचायला हवं. सर्वांगानं त्यावर विचार करायला हवा.

    गझलकार हा समाजाचा घटक असल्याने गझलेतून सामाजिक भान व्यक्त होणे साहजिक आहे, परंतु नुसता आशय वृत्तामध्ये बसवला म्हणजे गझल होत नाही. गझलही नुसती रचना नसते. रचनेत केवळ एक 'आवाका' येतो. मात्र हा आवाका ओलांडल्यावर प्रतिभेचा जो एक अदृष्य प्रदेश लागतो तिथून गझल येते. रचनेत केवळ यांत्रिक, कृत्रिम कारागिरी असते. अशा कारागिरीच्या प्रयत्नात गझल निसटून जाते. गझलकाराला आशयासोबतच आपला जीव ओतावा लागतो, प्राण फुंकावा लागतो तेंव्हाच श्रोत्याला खिळवून ठेवणारी आणि दाद घेणारी गझल तयार होते. नवीन गझलकारांनी ही बाब लक्षात घ्यावी कारण-


" दु‌खालाही दाद द्यायला गजल लावते

गोड मानुनी जन्म घ्यायला गजल लावते.


 असेल जो पत्थरदिल त्याला मिठी मारुनी

फुलाहुनीही मृदू व्हायला गजल लावते.” 


शेवटी गझलेनं आयुष्यात मला जे दिलं त्यासाठी मी तिची शतशः कृतज्ञ आहे कारण-


"वेदनेने पोळलेला प्राण आहे

अन् तरीही आत माझ्या गान आहे.


मी फुलांच्या संगतीने गंधणारी

आत माझ्या एक हिरवे रान आहे.


गजल येते मज खुशीने भेटण्याला

हाच मोठा या जगी सन्मान आहे."


जयहिंद ! जय महाराष्ट्र!



डॉ. सुनंदा शेळके

Post a Comment

0 Comments