Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

लहजा Dr Narsing Ingale

 ● पुस्तक परिचय ● 



🌹 लहजा 🌹


मधु मागशि माझ्या सख्या परि

           मधुघटचि रिकामे पडती घरि….


             राजकवी भा. रा.‌ तांबे ह्यांच्या ह्या अजरामर काव्यपंक्ती, आणि त्याद्वारे आता उतारवयात माझ्याकडून पुर्वी सारखी काव्य सृजनाची अपेक्षा धरू नका अशी ते आपल्या चाहत्यांना आर्जवे करतात. आणि हे जे काव्य आहे व त्यातील भाव आहे हे सर्व ज्येष्ठ कवी कलावंताचं प्रतिनिधित्व करत असावं.

       पण, सुरेश भट यांच्या नंतरच्या पहिल्या फळीतील व आताचे आघाडीचे कवी गझलकार माननीय सदानंद डबीर हे ह्याला अपवाद ठरलेत. कारण अगदी वयाच्या ऐंशी व्या वर्षी ते अनेक रस-गंध-खयालांच्या गीत कविता गझलांचा 'लहजा'  हा नवा मधुघट घेऊन रसिकांसमोर आलेत. 

अभिव्यक्तीचा लहजा म्हणजे लय, ढब, हेल, शैली, टोन प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. सरांचाही एक वेगळा लहजा आहे. त्यात शब्द सुरांसोबत 'मौन' ही अंतर्भूत आहे याची प्रचिती    


मौन सुध्दा….एक लहजा बोलण्याचा

फक्त नजरेतून सारे सांगण्याचा... 


संग्रहाच्या ह्या पहिल्याच शेरातून  येते. 

         गझल म्हणजे इश्क, गझल म्हणजे प्रेम विरह सौंदर्य, हा भाव आणि सुफी तत्वज्ञान असलेले व तरूण गझलकारांनाही अचंबित करतील असे कितीतरी नितळ-तरल-अलवार शेर 'लहजा' मधे विखूरलेले आहेत.


         शब्द भाषेला न उरले काम काही

        चुंबनातून खूप काही बोललो ना


         जन्मोजन्मीचा दुरावा संपला अन्

         एकमेकातच नव्याने हरवलो ना… 


हे शेर याची साक्ष देतात, शिवाय 


एकाच तिच्या नजरेने, मी कुठे हरवतो आहे

व्हिस्कीत बर्फ वितळावा, मी तसा वितळतो आहे...


त्यांचा हा मतल्याचा शेर म्हणजे इश्क-मैकशीचा कॉकटेलच जणू 

       मराठी गझलेत मैकशी व विनोदी गझलेची (हजलची) तशी वानवाच आहे. डबीर सरांनी ती उणीव भरून काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे.

ते लिहितात,...


               थोडीच शुध्द बाकी थोडा नशेत आहे

               जा सांग त्या जगाला मीही मजेत आहे


              हातात जाम माझ्या सुरई भरून आहे

              खय्यामची रुबाई माझ्या कवेत आहे

आणि,

              मी पिण्याचे सोडले अन् काय की

              मयकदे वाटेत येऊ लागले

किंवा 

              प्रेम भक्तीची सुराही आणते ती

             गझल काठोकाठ प्याला भरुन देते… 


हे शेर याची प्रचिती देतात

आणि,....


हा चोंबडा तो कोंबडा हा लाळघोट्या बघ कसा

हा वाकडा तो खेकडा हे राजकारण ही गंदगी


              काय खड्डेमुक्त झाले सर्व रस्ते

              स्वप्न हे भलते मला का पडत आहे?


             ह्या राक्षसास मित्रा म्हणतात लोकशाही

             जोडून हात येतो नंतर तुम्हास लुटतो,....


ह्या तीन वेगवेगळ्या शेरांतून सध्याच्या राजकारणावर व नेत्यांवर सर अतिशय मार्मिकपणे आसूड ओढतात.

शिवाय,


              राग बाईचाच काढू पुस्तकांवर

           चांदबीबीला मिशी लाऊन पाहू… 


हा हझलचा शेर वाचकांना चक्क शालेय जीवनाच्या कालखंडात नेतो. 

       सर दोन जीवघेण्या व प्रदीर्घ उपचार असणाऱ्या आजारावर यशस्वीपणे मात केल्यामुळे त्याचं जीवन मृत्यू वरचं चिंतन मंथन अगदी प्रगाढ तर आहेच पण ते पांडित्यपूर्ण नसून अनुभवांवर आधारित आहे, म्हणून रसिकांच्या ह्रदयाला ते भिडतं व बुद्धीला पटतं.  सुख-दुःख, जीवन-मृत्यू ह्याकडे तटस्थपणे पाहण्याची आध्यात्मिक बैठक त्यांच्याकडे आहे. हे 


             दे निरोप तू हसून मी इथून निघताना 

             सुटकेचा उत्सव कर जीव मुक्त होताना

किंवा 

            मी इथे सुख भोगत राहिलो

            जन्मभर आनंद शोधत राहिलो 


            शेवटी आनंदशय्या शरण दे 

            दे विनासायास आता मरण दे… 


ह्या रचनेद्वारे जीवनातील भैरवीचे सूर आळवतात. 

      गीत, प्रार्थना, कविता, गझल, कत्आ शिवाय उर्दू गझलचा गझल फॉरमॅट मधे केलेल्या भावानुवादातून सरांनी जीवनातील भावभावनांचा कोळ 'लहजा'त उतरवला आहे. तो प्रत्येकांनी पुन:पुन्हा वाचावा म्हणूनच संग्राह्य असा आहे.

    डबीर सरांच्या  कविता, गीत, गझलांचा मधुघट असाच काठोकाठ भरून ओसांडत राहो व आम्हा रसिकांना आकंठ प्राशन करायला मिळो हिच सदिच्छा व प्रार्थना.



डॉ. नरसिंग इंगळे

उल्हासनगर

Post a Comment

0 Comments