Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

गझलतारा Gazalkar Sabir Solapuri

 🌹पुस्तक परिचय 🌹



मनाकाशात चकाकणारा: ‘गझल तारा’


      झलतारा भवतालास दीप्तीमान करत दुरितांचे तिमिर छेदत, भेदत जातो. काळाच्या आदिम अंधाराला अंतर्बाह्य उघडा पाडतो. पाचवीला पूजलेल्या अंधारात चाचपडणाऱ्यांना गझलतारा उजेडाची वाट मोकळी करून देतो. तो मनाकाशात चकाकतो आयुष्ये उजळून निघतात. ही सारी किमया असते गझलताऱ्याची. प्रतिभावंत गझलकार सिराज शिकलगार यांचा अशाच आशयाच्या प्रकाशाने ओतप्रोत भरलेला ‘गझलतारा’ हा गझलसंग्रह प्रकाशित झाला आहे. सिराजभाई हे पलूस तालुक्यातील आंधळी या आडवळणावरच्या अगदी छोट्याशा गावचे रहिवासी असले तरी त्यांच्या गझला मात्र अतिशय डोळस आहेत. ‘गझल तारा’ हा संग्रह अनेकांना उजेडाची दृष्टी देणारा आहे. त्यांच्या गझलामधून माणसात जगण्याची सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यांच्या गझला केवळ रसिकांचे मन रिझवत नाही तर यांचे प्रबोधनही करतात. सिराजभाई हे माणुसकीचा सलोख्याचा, सदभावेचा, सहृदयतेचा उदघोष करणारे गझलकार आहेत. त्यांच्या गझल प्रतिभेतून मोठ्या प्रमाणात सुभाषिते मुखर होतात. जी समाजाला उन्नत करणारी उंच धेय्य उराशी बाळगण्याची शिकवण देतात. संतांनी ज्याप्रमाणे त्यांच्या अभंगातून, किर्तनातून हितौपदेश करून समाजात जागृतीचे वारे खळते ठेवले. तद्वतच सिराजभाई हे देखील त्यांच्या बहुसंख्य गझलांमधून उपदेशपर शेर समाजाला देतात. ते केवळ उपदेशकाच्या भूमिकेत राहत नाहीत तर त्यांचे आचरण ही ‘बोले तैसा चाले’ असेच आहे. ज्यांना त्यांचा प्रत्यक्ष सहवास लाभला आहे. अशांना याचा प्रत्यय आल्यावाचून राहत नाही. याचा मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे.

          सिराजभाई यांचे व्यक्तिमत्व मुळात वादातीत आहे. गझल अभिवृध्दीचा विचार सोडून नुसते वादविवाद निर्माण करणाऱ्या कोणत्याही गटातटात ते कधीच सामील होत नाहीत. वितुष्ट निर्माण करणाऱ्या वादापेक्षा त्यांना गझल वाड़मयावर व्यापक चर्चा करणेच आत्यंतिक महत्वाचे वाटते. ते स्वतःला काळजीपूर्वक गटबाजीपासून चार हात दूर ठेवतात. आपली गझल प्रतिभा अधिकाधिक कशी उन्नत होत जाईल, याचाच ते क्षणोक्षणी विचार करतात. ते कुणाच्या वादात पडत नाहीत याचा अर्थ ते संकटांना फारकत देतात असे नाही. संकटांना पाहून दडून बसत नाहीत. संकटांना धीरोदत्तपणे सामोरे जाणे हा तर त्यांच्या लेखणीचा गुणधर्म आहे. म्हणून त्यांच्या लेखणीची धार कधी ओसरत नाही. याचा अनुभव देणारा सिराजभाई यांचा हा शेर पहा------


वादात मी कुणाच्या, पडलो कधीच नाही

पाहून संकटांना, दडलो कधीच नाही


सिराजभाई हे अतिशय हळव्या मनाचे भावूक स्वभावाचे गझलकार आहेत. लपवून दाह खोटा ते जीवनाचे डाव खेळत नाहीत. व्यापार भावनांचा त्यांना मान्य नाही. आभाळाला भिडलेले दुःख ते मनात साठवून घेतात. शर्यतीला जिंकण्याच्या स्पर्धेत ते कधीच उतरत नाहीत. दुःखात कोण दिसता त्यास उराउरी भेटणे, त्यांच्या जखमेवर स्नेहाची फुंकर घालणे, परदुःख शीतल समजण्याची त्यांची वृत्ती नाही. दुसऱ्यांच्या दुःखाला गझलेच्या कक्षेत घेतात. जीवनाची सार्थकता सिध्द करणारी त्यांची सौजन्यशील भूमिका ते त्यांच्या गझल निर्मितीतून चोखपणे पार पाडतात. स्वदोष दुरूस्त करणे हे प्रत्येकाने ठरवले तर समाजात आपोआप दुरूस्ती येणार आहे. यावर सिराजभाई यांचा भरोसा पक्का आहे. या भरोश्याला गझलेच्या केंद्रस्थानी ठेवून त्यांचा गझल लेखनाचा दमदार प्रवास सूरु आहे. जीवनाची निरर्थकता कशात आहे, सार्थकता कशात आहे यातील भेद समजून घेता आला तर जीवनातील मांगल्याचा आदर्श आपसूक समोर येतो. दुःखाला समजून, त्याला खोटे रंग भरून त्याचे व्यापारीकरण करण्याची अंगभूत हातोटी अनेकांमध्ये असते. पण अशा बाजारबुणग्यापासून सिराजभाईंची गझल शेकडो मैल दूर आहे. दुःखाच्या चेहऱ्याला खोटा रंग फासण्याची गरज त्यांना कधीच पडत नाही------


जखमा उरात माझ्या, लपवून ठेवल्या मी

दुःखात रंग खोटा, भरता मला न आला


जेथे अज्ञानाचा, अत्याचाराचा, अन्यायाचा, अनाचाराचा, व्याभिचाराचा कुट्ट अंधार पसरलेला आहे, तेथे सिराजभाईं यांचा गझल तारा उजळतो आहे. समाजाला अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचा त्यांनी केलेला हा प्रयत्न म्हणजे त्यांच्या गझलेची पायवाट प्रकाशमान करणारा आहे. पायापुरती वाट निर्माण करणे, स्वतःच्या गरजेपुरता विचार करणे हि स्वार्थी वृत्ती कोणाच्याही कामी पडणारी नसते. माणूस मोठ्या विश्वासाने स्वतःचा हात दुसऱ्याच्या हाती देतो तो त्यांना आधार समजूनच. पण नेमका घात इथेच होतो. धारेत पट्टीचे पोहणारे आपला हात सोडून कधीच पार झालेले असतात. काठावर उभे राहून आपल्याला बुडताना पाहून त्यांना आसुरी आनंद होत असतो. हीच आजची जगरहाटी आहे. दुसऱ्यांच्या आधारावर स्वतःच्या जगण्याची भिस्त ठेवणे, नेहमीच फायद्याचे ठरते असे नाही. स्वतःच्या सामर्थ्यावर ज्यांचा विश्वास असतो तेच प्रवाह पार करून किनाऱ्याला लागतात. हे यशस्वी जगण्याचे रहस्य सिराजभाईंनी शेरातून आपल्या समोर ठेवले आहे-------


सोडला धारेत त्यांनी हात माझा पोहताना

वाटला आधार ज्यांचा तेच आधी पार होते


माणसाच्या मनाला असंख्य कंगोरे असतात. त्याच्या स्वभावाचे कोडे सहसा कुणालाच उलगडत नाही. माणसाच्या बोलण्या-चालण्यात तारतम्य नसते. त्याचा पोटात एक आणि ओठात एक असते. त्याचा मेळ घालणे कुणालाच जमत नाही. माणूस खऱ्यापासून पळ काढण्यासाठी असत्याचा आधार घेत असतो. बोलण्या-चालण्यातला तोल जेव्हा बिघडतो तेव्हा गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. दुसऱ्यांना आपल्या बोलण्याने संमोहित करून संभ्रमात ठेवण्याची एखाद्याकडे खुबी असते. बोलणे गोड आणि वागणे कटू हा फॉर्म्यला त्यांच्या अंगवळणी पडलेला असतो. पण त्यातून माणसाचा पलायनवाद लपून राहू शकत नाही हे सिराजभाई चांगल्या तऱ्हेने जाणून आहेत-----


कधी मेळ ना लागतो बोलण्या-चालण्याचा

खऱ्यापासून चालले भागणे माणसाचे


न्यायालयात जेव्हा एखादा दावा दाखल होते. तेव्हां संबंधित माणूस ‘तारीख पे तारीख’ ने पुरता हैरान होऊन जातो. निवाड्याला इतकी दिरंगाई होत असते की निकाल लागूनही त्याचा उपयोग फिर्यादीला होत नाही, नुसत्या तारखावर तारखा पडत असतात. बऱ्याच वेळा त्याच्या पैशांचा, वेळेचा चुराडा होतो. उशिरा मिळालेला न्याय हा अन्यायच असतो. ‘न्याय नको पण तारखा आवर’ अशीच एखाद्याची अवस्था होऊन जाते. तो न्यायालयातून अक्कल विकत घेतो. न्याय प्रणालीतील ही मोठी त्रूटी आहे. या गंभीर गोष्टीकडे कुणीच लक्ष देत नाही. ही वस्त्युस्थिती नाकारून चालणार नाही. सिराजभाईंनी

न्यायालयाच्या वेळ काढूपणावर नेमकेपणाने बोट ठेवले आहे--


विकत घेतली आज अक्कल जाहला व्यर्थ खर्च मोठा

काढला निकालात दावा आणखी तारखा कशाला


आशयाच्या आकाशात हा ‘गझल तारा’ सदैव चकाकत राही इतकी त्यात तेजस्विता समावलेली आहे. गझल ताराला माझ्या शुभेच्छा !


गझलतारा: गझलसंग्रह 

गझलकार: सिराज शिकलगार 

प्रकाशक:  अक्षरशिल्प प्रकाशन,  अमरावती

पृष्ठे: ९६. किंमत १५०₹




बदीऊज्जमा बिराजदार

(साबिर सोलापुरी)

Post a Comment

0 Comments