Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

गझल छाया Gazalkar Sabir Solapuri

 ● पुस्तक परिचय ●



मनमस्तकावर पसरणारी

‘गझल छाया’


     झलेची छाया वाचकांना छायांकित करुन टाकते. ती छाया जुन्या पुराण्या आठवणी सांगते. कासावीस जिवाला टांगते. चंद्र झोपी गेला तरी ती अंतरातच जागते. लपंडावाच्या खेळात तिला धरु पाहता ती हळूच पांगते, तिचा अर्थ शोधताना ती वेगळीच दिसायला लागते. माणसाच्या मनमस्तकावर गझलेच्या अनेक स्पष्ट, अस्पष्टछाया पसरलेल्या असतात.या छायापासून त्याला अलग राहता येत नाही. तिचा संग अटळ असतो. गझल लेखनाच्या क्षेत्रात आघाडीवर असलेले गझलकार सिराज शिकलगार यांचा ‘गझल छाया’ हा संग्रह रसिकांच्या दरबारात दाखल झाला आहे. तो मी अधाशासारखा वाचून काढला. प्रस्तुत गझल संग्रहाने मला कैक पातळ्यांवर आनंद दिला. माझ्या जाणिवांचे आकलनाचे विश्व त्यांच्या सर्वस्पर्शी गझलांनी समृध्द केले. गझलेच्या छाया किती किती स्वरूपात भेटत राहतात याचे मनोज्ञ दर्शन घडले.

          सिराजभाई यांच्या गझलेची परिभाषा सुबोध आणि संवादी आहे. रोजच्या बोलण्यातली सहजता त्यात आहे. उगाच शब्दांना अलंकारिक साज चढवून, नटवून-थटवून रसिकांसमोर पेश करणे हे त्यांच्या स्वभावात नाही. मनाच्या कुपीत जे संचित असते तेच देणे महत्वाचे असते. खरे बोलताना उधारी करून चालत नाही. अंतरातल्या झऱ्यात जे पाणी आहे त्यालाच वाहते ठेवणे हा सिराजभाई यांचा प्रयास असतो. त्यामुळे त्यांचे नितळ, प्रवाही बनत जातात. त्यात कुठेच खाच-खळगे, दगडधोंडे दिसत नाहीत. या हृदयीचे त्या हृदयी थेट पोहोचते आणि हेच गझल सृजनाचे वेगळेपण ठरते. सिराजभाई यांच्या कुंडीत संताचे सहृदय आहे, संताच्या विचारातील मौलिकतेची, सखोलतेचा, समाजाला शहाणे करून सोडण्याची शिदोरी त्यांना लाभलेली आहे. बहुदा हे कारण असावे की त्यांच्या गझला पुष्ट झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या गझलांकडे रसिक आकृष्ट होणे स्वाभाविक आहे. सुधारणेच्या, प्रबोधनाच्या अंगाने जाणाऱ्या त्यांच्या गझला अध्यात्मातील विज्ञान आणि विज्ञानातील अध्यात्म यातील कोडे सहजरित्या सोडवतात. अध्यात्म आणि विज्ञान यांच्या गफलतीत भटकत भरकटत जाणाऱ्या माणसाला नेटकी दिशा दिग्दर्शित करतात. ‘तुज आहे तुजपाशी उगा का वणवण करशी ’ असा सल्लाही ते देतात.

           आरंभिक काळात सिराजभाईंनी कविता, भजन, भारूडे लिहिलेली आहेत, त्याची छाया त्यांच्या गझलावर पसरलेली आहे. शेराच्या अवघ्या दोन ओळीत जीवन-मरणाचे सार सांगणारा गझल हा प्रभावी आणि प्रत्ययकारी काव्य प्रकार आहे. याच कारणामुळे सिराजभाईंनी प्रकटीकरणाचे प्रमुख माध्यम म्हणून गझलेची निवड केली असावी. विपुल प्रमाणात गझल लेखन करत असताना आयुष्याच्या या वळणावर घेण्यापेक्षा देण्याकडे, आसक्तीपेक्षा विरक्तीकडे त्यांचा जास्तीत जास्त झुकाव असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. तृप्तीची, मुक्तीची छाया त्यांच्या गझलांना व्यापून राहिली आहे. सामाजिक सौदार्ह हा भारतीय संविधानाचा मूलाधार आहे. हीच भारताची खरी ओळख आहे. जातिभेदावरून असहिष्णुतेचे वातावरण निर्माण करणे म्हणजे संविधानाचा पाया भुसभुसीत करण्यासारखे आहे. गुण्यागोविंदाने, एकोप्याने राहण्यातूनच माणुसकीचे खरे दर्शन घडते. जातीसाठी माती खाणाऱ्या माणसाच्या टोकाच्या दुराग्रहाने समाजाची माती झाली. जातिभेदामुळे अनेक गावे उध्दवस्त झाली. जातीच्या उतरंडीमुळे माणसे गावापासून दुरावली. ती गावकुसात गेली. ज्यांना जातीचा वृथा अभिमान असतो अशी माणसे दुर्जन असतात. ते सज्जन माणसांचे जगणे मातीमोल करून टाकतात. जातीवरून कुणी मोठा ना छोटा ठरत नाही. इथून तिथून माणूस एकच आहे. हि गोष्ट साधू-संतांनी वेळोवेळी विशद केली. पण जाती नष्ट होण्याऐवजी पुष्ट होत गेल्या. याची खंत सिराजभाईंना देखील वाटते. जातिविरहित सज्जनांच्या गावात आपल्याला आबाद होता यावे, अशी त्यांची मनीषा आहे ---


जात नाही भेद नाही एक ऐसे गाव जेथे

सज्जनांच्या संगतीने मी तिथे आबाद व्हावे


     मोठी माणसे आपला उत्तराधिकारी जाहीर करण्यात घाई करतात. सारी सुत्रे वारसांच्या हाती सोपवून ती नामनिराळी होतात. त्यांना फुकटात वारसा लाभला आहे त्यांनी त्या वारशाची भरभराट केली आहे अशी इतिहासात फारशी उदाहरणे नाहीत. याउलट वारसदार ऐतखाऊ बनतात. धनाच्या जोरावर ते चंगळवादी बनतात, ते कुणालाच जुमानत नाहीत, जन्मदात्यांना देखील धाकात ठेवतात. त्यांचे काही एक चालू देत नाहीत, आयत्या मिळालेल्या संपत्तीची उधळपट्टी करत राहतात. या एका महत्वाच्या गोष्टीकडे सिराजभाई लक्ष वेधतात-----


सुत्रे कशास द्यावी हातात वारसांच्या

जातात जन्मदाते धाकात वारसांच्या


     पावसाच्या लहरीपणाचा फटका बळीराजाला नेहमीच बसतो. निसर्गाच्या अवकृपेने होणारी सततची नापिकी, डोक्यावर चढत जाणारे सावकारांच्या कर्जाचे डोंगर, या आर्थिक अडचणीत प्रपंचाचा गाडा चालविणे जिकिरीचे झाल्याने बळीराजाच्या आत्महत्या दिवसागणिक वाढत आहेत. ही बाब अत्यंत लाजिरवाणी आहे. बळीराजासाठी अमुक कर, तमुक कर अशी केवळ भाषणे केली जातात. पॅकेजचे गाजर दाखवत त्याची बोळवण केली जाते. परंतु वर्तमान काल आणि भविष्य कालीन सोडवणूक कशी करायची याचे वस्तूनिष्ठ विवेचन करण्यात येत नाही. देशाचा पोशिंदा जगला तर देश जगेल, हे वास्तव धोरणकर्त्याने ताबडतोबीने लक्षात घेण्याची आवश्यकता असताना याकडे गांभीर्याने पाहिजे जात नाही. अशा पराकोटीच्या असंवेदनशीलतेमुले बळीचे भाग्य मातीमोल व्हायला वेळ लागणार नाही असा स्पष्ट इशारा सिराजभाई तितक्याच पोटतिडिकीने देतात------


कर्जात त्या बळीचे खाते तसेच आहे

थेंबात भाग्य त्याचे न्हाते तसेच आहे


     शिक्षकांवर उद्याचे जबाबदार नागरिक घडविण्याचे उत्तरदायित्व असते. शिक्षकांच्या विद्येमुळे सुसंस्कार पिढीची मने घडत असतात. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडविण्याचे व्रत इमाने इतबारे अंगीकारलेले असते. शिक्षण प्रसारात त्यांचा सिंहाचा मोठा वाटा असतो. त्याच्या विद्येचा प्रकाश समाजजीवनात उजळत असतो. भवतालातील अंधार दूर करण्याचे वरदान शिक्षकाला लाभलेले असते, अशा व्रतस्थ शिक्षकांचा आदर करणे, त्यांचा मानसन्मान करणे, हे समाजाचे आद्यकर्तव्य ठरते. शिक्षकाविषयीचा अभिमान व्यक्त करताना सिराजभाई म्हणतात-------


विद्येविना कुणाचा पडतो प्रकाश येथे

अंधार दूर करणे वरदान शिक्षकाला


     महाराष्ट्राला संतांची प्रदीर्घ परंपरा लाभलेली आहे म्हणूनच आपण महाराष्ट्राला पुढारलेले, प्रागतिक विचारसरणीचे राज्य संबोधतो. देवभोळ्या सज्जनांना फसवणाऱ्या समाजातील भोंदूवर, शोषणावर संतांनी वेळोवेळी तिखट शब्दात कोरडे ओढून त्यांची कानउघडणी करण्याचे कृतीशील अभियान राबविले. सिराजभाईच्या गझला संतांच्या वाटेने जाणाऱ्या आहेत. त्यांच्या शेरातून संत विचारांची रुजवात होते. त्यांच्या गझल रचनांमध्ये जनसामान्यांना पावलोपावली भेडसावणाऱ्या प्रश्नांचा सांगोपांग ऊहापोह असतो. अघटितांचा परामर्श असतो. जो वास्तवावर आधारित आहे. तो संवेदनेतून आलेला आहे. त्याला काल्पनिकतेची स्वप्नरंजनाची जोड देण्याची गरजच पडत नाही. तत्वचिंतनाच्या शब्दकळेतून त्यांचा गझल रचना घडत जाते. जी वाचकांना आरपार भिडते. ‘गझल छाया’ हा त्याचाच परिपाक आहे.


गझल छाया: गझलसंग्रह

गझलकार: सिराज शिकलगार 

प्रकाशक: अक्षरशिल्प प्रकाशन, अमरावती

पृष्ठे: ९६ मूल्य:२००/-₹




बदीऊज्जमा बिराजदार 

(साबिर सोलापुरी)

Post a Comment

0 Comments