● पुस्तक परिचय ●
🌹दशदिशात दरवळणारा ‘गझलगंध’🌹
कोणत्याही गझलकारास जसे समाजभान असणे आवश्यक असते त्याप्रमाणे त्यास आत्मभान असणेही महत्वाचे ठरते. आत्मभानातून आत्मस्वर झंकारत असतो. त्याचे नानाविध पडघम घुमत असतात. त्याला वेगवेगळ्या रंगाच्या छटा, निरनिराळ्या गंधाचा दर्प प्राप्त होत जातो. त्यातून अभिव्यक्तीचे नवनवे प्रयोग सिध्द होतात. सिराज शिकलगार हे मुळात प्रयोगशील गझलकार आहेत. मनात आलेल्या प्रयोजनाला प्रयोगात कसे रुपांतरित करायचे याचे प्रयोगात्मक कसब त्यांच्या लेखणीत आहे. प्रयोजनासाठी विषय समोर आला तरी त्याची कसदार रचना करण्यासाठी ते हरघडी सज्ज असतात. म्हणूनच ते जगण्याच्या बहुविध आयामांना चुटकीसरशी अक्षरबध्द करतात. त्यातून मनाला भावणारे गझलेचे मनोहारी रुप आकारास येते. एखादा प्रसंग असो वा विषय तो त्यांना सुचला की त्यातील भाव-भावना, अपेक्षा, इच्छा यांना लागलीच मूर्तरूपत देऊन मोकळे होतात. अभिव्यक्तीतील गतिशीलता पाळणे ही काही सर्वसामान्य गोष्ट नाही. हे एखाद्या प्रगाढ प्रतिभावंताचे काम आहे. उत्कटता, उत्स्फूर्तता मग ती जगण्यातील असो वा लिहिण्यातली ती अन्वयार्थाचा शोध पटवून घेते.
सिराज शिकलगार हे असे सहज स्फूर्त गझलकार आहेत. त्यांची प्रतिभा नाणावलेली आहे. शब्द त्यांच्या भोवती कायम फेर धरून असतात. गझलेचा त्यांचा व्यासंग इतका दांडगा आहे की रदीक, काफिये, वृत्ते त्यांच्या दिमतीला तयार असतात. मग गझल कागदावर उतरविण्यासाठी त्यांना फारसा वेळ लागत नाही. गझलेच्या वाड़मयात सुपर फास्ट गझलकार म्हणून त्यांचा आदराने उल्लेख करण्यात येतो, ही मोठी गोष्ट आहे. गझल त्यांच्यावर सर्वार्थाने प्रसन्न आहे. हा केवळ जादुई करिश्मा नाही तर सिराजभाई यांच्या कष्टाचे ते इष्टफळ आहे. सिराजभाई यांचा ‘गझल गंध’ हा गझल संग्रह त्यांच्या सर्व वैशिष्टयानिशी वाचकांच्या भेटीस आला आहे. त्याचा गंध दशदिशात दरवळणारा आहे. तो चांद्यापासून बांद्यापर्यंत गझलेचे सुंगधी माहोल निर्माण करणारा आहे. त्यांची गझलनिष्ठा अतुलनीय अशी आहे. ती एक प्रकारची प्राणप्रतिष्ठाच आहे. निष्ठेतूनच हुकूमत प्राप्त होते आणि हुकूमतीचे बोट धरूनच नैपुण्यता येते.
गझल गंधची किती तरी वैशिष्ट्ये सांगता येण्यासारखी आहेत. त्यात प्रामुख्याने वृत्तांची भरमार आहे. प्रमिला, व्योमगंगा, सुकामिनी, आनंदकंद, मनोरमा, मंजुघोष, संयुक्त, कल्याण, आनंद, कादंबरी, वीरलक्ष्मी, भुंजगप्रयात यासह अनेकविध मिश्र वृत्तातून सिराजभाई यांनी गझलांची बांधणी केलेली आहे. त्यातील प्रत्येकाची लयकारी रसिकांना वेगवेगळा आनंद देऊन जाते. गझल एकाच वृत्तात बांधावी, ती दोन वृत्तात बांधली गेली तर त्यातील सहजता हरवून जाते, असे काही काठावर बसून मासे धरणाऱ्या समीक्षकांचे म्हणणे आहे. परंतु त्यात फारसे तथ्य नाही. सिराजभाई यांनी त्यांच्या अनेक गझला दोन वृत्ता लिहिण्याचे आव्हान लीलया पेलले आहे. त्यातला ताल आणि तोल कुठेच ढळलेला आढळून येत नाही. वृत्त कोणतेही, कसेही असो तो राबवणारा गझलकार किती सक्षम आहे. त्यावरच त्या वृत्ताची यशस्विता अवलंबून असते. प्रस्तुत संग्रहातील सिराजभाई यांची दोन वृत्तातील कोणतीही गझल वाचली तर याचा पुरेसा प्रत्यय येऊ शकतो. त्यातला गोडवा थोडाही कमी होत नाही. वृत्तांच्या संमिश्रतेमुळे त्याचा एक वेगळा रंग आणि गंध निर्माण होतो. जो रसिकांचे चित्त उल्हसित करतो. फक्त अट एवढीच आहे की वृत्तातली एकरूपता साधता आली पाहिजे. सिराजभाई म्हणतात त्याप्रमाणे---
झालेत ओळखीचे सारेच रंग आता
रंगात आज माझ्या सारेच दंग आता
मुळात सिराजभाई हे ग्रामीण भागातील गुणी गझलकार आहेत. तिथल्या मातीशी त्यांची नाळ घट्ट जोडलेली आहे. त्यांचे पाय मातीचे आहेत. मातीत राबणाऱ्या माणसाशी त्याचे घामाचे नाते आहे. काळ्या आईला प्रसन्न करण्यासाठी घामाचे अभिषेक घालणाऱ्या बळीराजा विषयी त्यांच्या मनात विशेष आदर आहे. त्यांच्या गझलेतून हाच सच्चा भाव उमटतो. सिराजभाई यांचा हा शेर त्याचे तर निदर्शक आहे--------
मातीत राबती ते जनतेस अन्न देण्या
गाळून घाम शेती कसतात लोक कैसे
स्वतःसाठी जगण्याचा खटाटोप तर प्रत्येकजण करत असतोच परंतु दुसऱ्यांसाठी जगण्यातच जीवनाचे खऱ्या अर्थाने सार्थक होते. याचा विसर माणसाला सदान् कदा पडलेला असतो आणि त्यातच त्याच्या जीवनाची संध्याकाळ होते. आपल्या इतकाच दुसऱ्यांचा विचार करणे, त्यांच्या जीवनात चार हसरे क्षण निर्माण करण्यासाठी, त्यांना आनंदित करण्यासाठी झटणे, आपले जीवन दुसऱ्यांच्या कामी यावे याकरिता सदभावना बाळगणे, ही खऱ्यां जगण्याची लक्षणे आहेत. असेच सिराजभाईंना मनापासून वाटत राहते---
दुसऱ्या कुणासाठी अता जगू या जरा
हसऱ्या क्षणासाठी अता मरू या जरा
बंगले आणि अवाढव्य घरे वाटून घेण्यातच आप्तेष्टांची जीवघेणी स्पर्धा सुरु असते. जीवन व्यतीत करायला माणसाला सहा फुटांचे घर चालू शकते. परंतु जास्तीत जास्त मालमत्ता माझ्याच वाट्यास आली पाहिजे. हा माणसाचा हव्यास कधीच संपत नाही. मरणानंतर माणसाच्या सोबत काहीच येत नाही. सर्व काही इथेच सोडून जावे लागेत. जगण्याच्या धुंदीत माणूस मृत्यूच विसरून जातो. हा मानवी जीवनातला मोठा विनोद आहे. टोलेजंग इमारत असो वा सहा फुटाचे साधे घर, कुठेही राहिले तरी मरण काही टळत नाही. सिराजभाई यांचा शेर माणसाला वास्तवतेची जाणीव करून देणारा हा शेर पहा---
बंगले अन् घरे घेतली वाटून त्यांनी
या सहा फुटात मात्र मी बंदिस्त आहे
सिराजभाई यांची नाळ सामाजिक जाणिवेशी जुळलेली आहे. ते त्यांच्या बहुसंख्य शेरांमधून मनाची नाही तर जनाची बात करतात. भवतालातले प्रश्न त्यांना पावलोपावली तीव्रतेने अस्वस्थ करत असतात. तळागाळातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांना उद्गार दिल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. त्यांना छळणाऱ्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी त्यांची लेखणी सातत्याने तळपत राहते. परंतु प्रस्तूत गझल संग्रहात सामाजिक आशयाच्या गझलाबरोबरच प्रेमाविषयक भावनेच्या गझलाही वाचावयास मिळतात. प्रिया, सजणी, प्रियतमा, सखी, अप्सरा यांच्या संदर्भातील प्रीतीच्या गझलांचा हळूवार पटदेखील त्यांनी तितक्याच नजाकतीने मांडलेला आहे. ठळकपणाने नजरेत भरावी अशी ही लयलूट आहे. प्रीत फुलाच्या स्पर्शाचा गंध त्यातून दरवळत राहतो. वानगीदाखल त्यांचे शेर पहा-----
आजकाल फार लाड चालले तुझे सखे
वागणे तरीच द्वाड जाहले तुझे सखे
पदर तो ढळावा एकदा तरी, सदा वाट मी पाहतो
ना तुला कशाची कदर साजणे बरे वाटते का ?
‘गझल गंध’ मधील हे कॉम्बिनेशन रसिकांना मोहविणारे आहे. सिराजभाईंच्या वेगवान गझल प्रवासास मनःपूर्वक शुभेच्छा !
गझल गंध: गझलसंग्रह
गझलकार: सिराज शिकलगार
प्रकाशक; अक्षरशिल्प प्रकाशन, अमरावती
पृष्ठे: ९६ मूल्य:२००/-₹
बदीऊज्जमा बिराजदार
(साबिर सोलापुरी)


0 Comments