● पुस्तक परिचय ●
मनामनात झंकारणारे: ‘गझलगीत’
गझल आणि गीत या काव्यातील दोन वेगवेगळ्या विधा आहेत. या दोन्ही विधा गायकीप्रधान आहेत. सिराजभाई शिकलगार यांच्या प्रकाशित झालेल्या ‘गझल गीत’ ह्या शीर्षकावरून हा गझलगीतांचा संमिश्र संग्रह आहे की काय असे सुरुवातीस वाटले होते. मी कुतुहलापोटी हा संपूर्ण संग्रह वाचून काढला. त्यानंतर ही गोष्ट लक्षात आली की हा स्वतंत्र गझल संग्रह असून त्यात तरोताजा ८२ आशयपूर्ण गझलांचा समावेश आहे. ‘गझलगीत’ हे आगळेवेगळे शीर्षक सिराजभाईंच्या प्रतिभेतून साकार झालेले आहे. सिराजभाई शिकलगार हे मराठीतील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गझलकार आहेत. त्यांच्या कैक वैशिष्ट्यांनी भारलेली, भरलेली गझलांची ओंजळ ते रसिकांना सातत्याने देत आले आहेत. म्हणूनच रसिकही त्यांच्यावर दिलोजान से फिदा आहेत. तरीही ते म्हणतात--
ध्यानात रहावे मी कुणाच्या एवढे माझे नाव नाही
घालावेत नमस्कार मजला एवढा माझा भाव नाही
हा सिराजभाई यांच्या मनाचा मोठेपणा आहे. त्यांना ‘ग’ ची बाधा झालेली नाही. अहंकाराच्या वाऱ्याला ते त्यांच्या आसपास सुध्दा वाहू देत नाहीत. यशाची नशा ते डोक्यात शिरु देत नाहीत. लिहिण्यातला त्यांचा भाव अस्सल आहे. वागण्यातला विनय वाखाणण्याजोगा आहे. एकाग्रतेने गझल लेखन करणे आंतर्बाह्य दंग राहणे ही त्यांची खासियत आहे. स्वतःला झोकून देऊन गाजावाजा न करता गझलेची साधना करणारे सिराभाई हे समकालातील दुर्मिळ गझलकार आहेत. सिराजभाईंच्या गझलेचा आवाका इतका विस्तारलेला आहे की ते कोणताही विषय सहजी लेखणीच्या टोकावर घेतात. एखाद्या घटनेवर, प्रसंगावर जेव्हा ते सफाईदारपणे शेर लिहितात तेव्हां वाटत राहते की अशा प्रकारच्या अत्यंत साध्या सोप्या विषयावर देखील इतक्या दर्जेदार शेराची निर्मिती होऊ शकते. ही त्याच्या कसबदार लेखणीची करामत आहे. समाजात सतत घडत जाणारी स्थित्यंतरे, काळानुरूप बदलत जाणारी जीवनशैली, हरवत चाललेली माणुसकी, वाढता चंगळवाद, व्यभिचाराला मिळणारी राजमान्यता, नैतिक मूल्यांची हेळसांड, धनाच्या लालसेपायी बिघडत जाणारे समाजस्वाथ्य, नातेसंबंधातील दुरावा त्यातून येणारी विचार शून्यता अशा किती तरी अनागोंदीवर सिराजभाई यांनी त्यांच्या शेरातून अचूकपणे भाष्य नोंदवले आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला स्वतःकडे पाहायला वेळ नाही. मग तो समाजावर, देशावर प्रेम कसा व कधी करु शकणार, असा अंतर्मुख करणारा प्रश्न त्यांना नेहमीच पडतो. सिराज भाई हे अशा संवेदनशील मनाचे गझलकार आहेत. ज्यांना समजा मनाची चिंता सतावत असते.
आज जन्मदात्यांकडे पाहायला सुध्दा मुलांकडे अजिबात वेळ नाही. वृध्दापकाळी मातापित्यांची सेवा करण्याऐवजी मुले त्यांची रवानगी थेट वृध्दाश्रमात करतात. ज्यांनी आपले सारे आयुष्य पणाला लावून मुलांचे पालनपोषण केले. त्याच्या उज्जवल भवितव्यासाठी तारेवरची कसरत केली. त्या मुलांनी मात्र मातापित्यांची कर्तव्ये भावनेने देखभाल करण्याऐवजी स्वतःच्या प्रपंचात गढून जावून मातापित्यांना वृध्दाश्रमाची वाट दाखवावी, ही कोणती रीत आहे, कुठला न्याय आहे याची विचारणा सिराजभाई यांच्या शेरातून अशा प्रकारे करतात------
पडला विसर त्यांना उदरात वाढल्याचा
आपापल्या प्रपंची सारे गढून गेले
राजकीय पुढाऱ्यांच्या कोडगेपणाबाबत तर काही बोलण्याची सोयच उरलेली नाही. निवडणुकीच्या हंगामात ते आम जनतेला वारेमाप आश्वासने देतात. भोळी भाबडी जनताही त्यांच्या आश्वासनाने आपले कल्याण होईल, या आशेने त्यांना निवडून देते. ते निवडून आल्यानंतर मात्र दिलेली सारी आश्वासने बासनात बांधून ठेवतात. जनतेच्या पदरात निराशेशिवाय काहीच पडत नाही. पुढारी फक्त फसवणुकीचे दुकान थाटून बसतात. त्यांच्या वागण्या-बोलण्यात कमालीची तफावत येते. जनतेची फसवणूक होते. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी याचा प्रलय येतो. ही लोकशाहीची शोकांतिका आहे. पुढाऱ्यांच्या या संधीसाधू प्रवृत्तीवर कडक ताशेरे ओढताना सिराजभाई म्हणतात--------
आश्वासने दिलेली झाकून कुठे ठेवली त्यांनी
जनतेस फसविण्याचा त्यांनी धंदा थाटला आता
माणसाचे जगणे मर्यादित आहे. त्याची कालमर्यादा ठरलेली आहे. म्हणून त्यास अमर्यादतेचे मोठे आकर्षण असते. तो घरात पैशाच्या राशी रचण्यात गढून जातो. तो अमर्याद धन जोडण्याच्या पाठीमागे अहोरात्र लागलेला असतो. त्यातच त्याचे जीवन अपूर्ण पडते. वाटेल त्या मार्गाने जोडलेल्या धनाचा शेवटी उपयोग काय होतो. धनप्राप्ती घरात कुजून जाते. आपल्या अंगी असलेल्या कलागुणांचा विकास करुन काळाच्या पटलावर आपल्या पाऊलखूणा सोडायच्या त्या विसरून जातो. अतिधनाच्या लोभाचा अनिष्ट परिणाम जगण्यावर कसा होतो यावर सिराजभाईंनी स्वच्छ प्रकाश टाकला आहे-
जोडून ठेवले धन उपयोग काय त्याचा
जीवन अपूर्ण पडले मत्ता कुजून गेली
जळाऊ लाकडाचे अड्डे सर्वत्र असतात. यापासून कुणाचीच सुटका नसते. एखाद्याचे चांगलेचालत असताना ते न बघवणे ही दुष्ट प्रवृत्ती आहे. स्वतःच्या कर्तबगारीवर एखाद्याने मिळविलेल्या घवघवीत यशावर जळत राहणे ही जळकी प्रवृत्ती आहे, अशी जळकी वृत्ती स्वतःलाच जाळत असते. शेवटी त्याची राख होऊन जाते. अशा जळक्या प्रवृत्तीचा माणूस जीवनात स्वतःची प्रगती सधीच साधू शकत नाही. दुसऱ्यांविषयी सदभावना बाळगणे, त्याच्या यशात सामील होणे, हे निर्मळ मनाचे द्योतक आहे. जळण्यातून फक्त पदरात राखच पडते. फुलांचा सहवास त्याला कधीच लाभत नाही. जळक्या प्रवृत्तीच्या माणसांना सिराजभाईंनी अगदी साध्या सोप्या शब्दात याची जाणीव करून दिली आहे--
जळणारे जळतात जळू दे त्यांना
उरते अवघी राख कळू दे त्यांना
सिराजभाईंची गझल प्रासादिक परंतु रोखठेक शब्दकलेची आहे. त्यामुळे त्यांच्या गझला जनसामान्यांच्या मनाची पटकन पकड घेतात. नुसत्या शब्दांचा फुलोरा फुलविण्यात ते शब्द खर्ची घालत नाहीत. शेरातून मुलभूत विचार वाचकांपर्यंत पोहोचावा अशी त्यांच्या गझल लेखनामागील खरी तळमळ असल्याचे त्यांच्या अनेक गझलांतून स्वच्छपणे दिसून येते. कोणत्याही गझलकाराच्या गझलेला त्याची स्वतःची चाल असणे आवश्यक असते. स्वतःची चाल मजबूत असल्याशिवाय प्रतिस्पर्ध्यावर चाल करून पुढे जाता येत नाही. हे खरेच आहे. सिराजभाई यांनी लांबलचक, मोठ्या वृत्तांच्या अनेक गझला लिहिल्या आहेत. परंतू छोट्या वृत्तांत ही गझल लिहिण्यात ते निष्णात आहेत. अत्यंत कमी शब्दात मोठा आशय तोलून धरणे हे गझलकारासाठी अनेक वेळा सत्वपरीक्षेचे क्षण ठरतात. त्यातून त्या गझलकाराची खरी कसोटी लागते. सिराजभाई त्या कसोटीस पूर्णत्वाने उरतात अशा कसोटीस उतरणारी कोणतीही रचना तत्कालीन नसते. ती कालाऔघात टिकून राहते---
चाल माझी एकट्याची
जीवनाचा भाग झाली
सिराजभाई यांच्या या अनोख्या ‘गझलगीत’ संग्रहास माझ्या हार्दिक शुभेच्छा
गझल गीत: गझलसंग्रह
गझलकार: सिराज शिकलगार
प्रकाशक; अक्षरशिल्प प्रकाशन, अमरावती
पृष्ठे: ९६ मूल्य:१५०/-₹
बदीऊज्जमा बिराजदार
(साबिर सोलापुरी)


0 Comments