Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

दिशांतर Gazalkara Sujata Nimbalkar

   ● पुस्तक परिचय ●



गझलप्रेमी वाचक व एका गझल वेड्या 

रसिकाच्या भूमिकेतून 'दिशांतर'


    स्नेहलताईंविषयी मी लिहिणं म्हणजे सूर्याची चांदणीने आरती करण्यासारखी गोष्ट. पण 'दिशांतर' वाचला आणि हे धाडस करण्यापासून मी स्वतःला थांबवू शकले नाही. माहित नाही कितपत शब्दात बांधू शकेल.. पण 'दिशांतर'ला शब्दात व्यक्त करणे कुणासाठीही अशक्य गोष्ट आहे हे निश्चित. 

     सामान्य अनुभूतींच्या सीमारेषा ओलांडून कल्पनातीत असणारे जबरदस्त शेर लिहिणं ही स्नेहल ताईंची खासियत मी गेले सहा-सात वर्ष अनुभवते आहे. कदाचित म्हणूनच त्यांच्या शेरांची 'फॅन' म्हणवून घेताना मला प्रचंड अभिमान वाटतो. 'दिशा' या नावाने स्नेहलताई लिहितात. 'दिशा' हे नाव त्यांना सर्वंकषपणे लागू होते. माझ्यासह अनेक नव गझरकारांना दिशा देण्याचे काम त्या अगदी सहजतेने आणि उदात्त भावनेने करतात. 

      सामान्य माणसाच्या भावभावनांना शब्दात.. तेही तंत्र सांभाळत, शेरातून व्यक्त करण्याचे कौशल्य त्यांना साध्य आहे. त्यांचे शेर वाचताना मन त्या भावलेल्या शेरात कितीतरी वेळ खिळूनच राहते.  

जसे -


'आवेग सुखाचा माझ्या अश्रूंना सोसत नाही 

वेदना उजागर करते मी मुक्ति मागत नाही'


आणि 


'याहून कोणती मोठी नशिबाची थट्टा नाही 

हमरस्ता अनोळखी अन् पाऊल मोडके आहे' 


     ताईंच्या गझलांमधून स्त्रीमन अलवारपणे उलघडतेच, पण फक्त 'स्त्रीत्वाच्या'  कुंपणात अडकणारी ताईंची गझल नसून त्यांच्या कार्याइतकीच त्यांच्या गझलेने उंच भरारी घेतलेली 'दिशांतर' मधून अगदीच दिसून येते. 

     आजूबाजूच्या मूर्त कल्पना, निसर्ग, सृष्टी, दैनंदिन गोष्टींचा स्पर्श असणाऱ्या घटना, ऋतू, त्यांचे बदलते रूप, यांच्या आधारे भावभावना गुंफण्यात त्यांची गझल मातब्बर आहे. हे पुढील शेरांवरून समजते. 


'तिचे झेंडूप्रमाणे देठ.. वेगाने नका ओवू 

उमलणाऱ्या जुईसाठी सुई दाभण असू शकते'

 

 आणि


'उंच घर बांधून कोठे पूर्तता झाली तुझी 

पाखरा मातीतले दाणे पुन्हा टिपतोस तू'


     या आणि अशा मूर्त कल्पनांच्याही पल्याड अमूर्त जगतात नेणारे अनेक ताकदीची शेर लिहून ताईंनी आपले गझलेतील भक्कम अस्तित्व सिद्ध करून दाखवले.


'अचानक एवढे नाही भडकले प्रौढ झाल्यावर 

उन्हाचे बालपण सुद्धा धुके गिळण्यामध्ये गेले' 


आणि 


'पेटवा आकाशगंगा.. अन तिला शोधून काढा 

पण 'दिशा' रात्री कुणाच्या स्वागताला येत नाही' 


    असे सखोल आशायाचे शेर वाचल्यावर सामान्य वाचकांच्या तोंडून देखील 'वाह!' निघतेच. 

आयुष्य जगणं प्रत्येकालाच साध्य होतं. पण जगणं शब्दात बांधणं ही कला हळव्या आणि तत्पर मनाच्या कवीकडेच असते. फक्त कोवळे शब्द लेवून ही गझल नटली नाही. तर त्यांचे शब्द तावून-सुलाखून लखलखणाऱ्या, तळपणाऱ्या तलवारीच्या पात्यासारखे वाटतात. ताईंचा व्यासंग व शब्दांवरचे प्रभुत्व हे त्यांच्या भरमसाठ शब्दसंग्रहावरून सहज लक्षात येते. 


'नितळ उन्हाचा केला तरीही रात्रीने दुस्वास पुन्हा 

अंधाराची नाळ चिकटते सूर्याच्या बिंबास पुन्हा' 


'केसात बकुळीची फुले डोळ्यात सन्नाटा 

शापित असल्यासारखा शृंगार का आहे'


आणि 


'संतापला आहेस की खंतावला नक्की 

काळा तुझ्या डोळ्यांमध्ये अंगार का आहे' 


   कवित्व एका उच्च पातळीवर गेल्यावर ते दैवी योगत्व प्राप्त करते.

    स्नेहल ताईंना ते अद्वैत प्राप्त झाले आहे ज्याद्वारे त्या आपल्या शेरांतून काळाला, सूर्याला, चंद्राला, नियतीला, देवाला, दैवाला खडे सवाल विचारू शकतात.

 हा होणारा गझल संवाद इतका भावतो की, आपण तोच प्रश्नकर्ता आहे असे वाटून, आपण गजलेशी कधी समरस होतो ते लक्षातही येत नाही. 

     आपले कार्यक्षेत्र, तत्त्वज्ञान व त्या त्या क्षेत्रातील गहिरा अभ्यास लेखकाच्या लेखणीत नकळतपणे उतरतोच. काही शेरातून त्यांच्या व्यवसायिक शिक्षणाचा गाढा अभ्यास दिसून येतो जसे -


'कारणे शास्त्रीय द्या अथवा करा चर्चा जिवाची 

जन्ममृत्यूची मिमांसा सिद्ध करणे शक्य नाही' 


आयुष्याची क्षणभंगूरता, वास्तवता माहिती असूनही अस्तित्वाचा लढा देणारा मनुष्य व त्याचे आयुष्य याचा अभ्यास शेरांतून दिसतो. जीवनातील अनुभवांना त्या अतिशय मार्मिक पद्धतीने मांडतात.


'तुझ्या निष्प्राण देहाचे विषय सुद्धा गहन झाले 

कसा 'खपला' कुणी म्हटले, कुणी म्हटले निधन झाले' 


'ती हवीच तर भौगोलिक आकाशापल्याड शोधा 

अकरावी दिशा ग्रहांच्या पाठीवर जन्मत नाही' 


     जीवनप्रवास जन्मापासून मृत्यूपर्यंत एका डॉक्टर पेक्षा अधिक कुणाला उमगला असावा. 

 एका जबाबदार वैद्यकीय अधिकारी पदावर असलेल्या ताईंचे मृदुल स्वभावदर्शन जागोजागी होते. जीवनाची हळवीबाजू, स्त्रीचे गुंतागुंतीचे (अगदी आजही) असणारे जीवन, तिची सोशिकता, व्यथा आणि मानवी जीवनाचे संवेदन मांडणारे अनेक शेर वाचकांना अक्षरशः थक्क करून जातात. 


'छापून आली लोकसंख्या पण मला पटली कुठे 

 गर्भात मेलेल्या मुलींची माहिती कळली कुठे'


'घोषित जन्मदात्री केले तुम्ही मला 

विसरून वय पुन्हा मी अल्लड कशी बनू' 


       शेर वाचताना आपल्याला ते शेर जेव्हा आपल्याच जीवनाचा भाग वाटतात, तेव्हा ती गझल 'सामान्य माणसाची गझल' झाली असे म्हणावे. आपल्याच मनातील सुप्त भाव, आपले मनोविचार कुणी अतिशय सुरेख रीतीने शब्दात मांडले की आपुलकीची व जिव्हाळ्याची जाणीव होते.

   ताई आपल्या शेरातून ना केवळ वाचकांच्या मनापर्यंत पोहोचल्या. तर त्यांच्या मनात त्यांनी टुमदार असे घर निर्माण केले.. हे पुढील शेर सिद्ध करतात.


 'मन जपते तेव्हापासून दुसऱ्याचे जमेल तितके 

मी फार जवळ मृत्यूच्या जाऊन परतले होते' 


 हा शेर माझ्याच मनातून आल्यासारखा मला का वाटावा? असं कित्येक ओळीतून अनेकांना जाणवेल कारण भावनांचा सहसंबंध व समभाव निर्माण होतात त्याच्या लेखणीतून. 


'पाहिजे होती तुझी जवळीक सख्ख्यासारखी 

शल्य सवतीच्या मुलाचे जाणले नाहीस तू'


    शब्दांना वळवण्याचे अफाट सामर्थ्य व सरस्वतीचा वरदहस्त असलेल्या ताईंनी अर्थाचे बारकावे अलगद सांभाळत एकाहून एक अप्रतिम शेर वाचकांच्या दिमतीला 'दिशांतर' मधून दिलेत. गजलांमधले वेगवेगळे, नाविन्यपूर्ण कवाफी पाहून त्यांच्या शब्द सामर्थ्याची अचाट ताकद व अलौकिक प्रतिभा लक्षात येते.


'फासून घेते आहे हिरवी छटा पोपड्यांवर ती

स्वप्नामध्ये भिंतीच्या रंगारी आला आहे'


इतकी सुंदर कधीच नव्हते दिसली कोणालाही

कुठून पारखी नजरेचा जोहारी आला आहे


     मेजवानीच्या थाळी मधला कुठला पदार्थ उत्तम आहे हे एखाद्याला पटकन सांगता येते. पण स्नेहल ताईंचे 'दिशांतर' ही अशी 'शाही थाळी' आहे की, यातील कोणती गझल सांगू आणि कोणती वगळू..? प्रत्येक गझल ही परिपूर्ण व पक्व आहे.


 केशरी घनसावळे हलके निळे झाले 

रंग जो ल्याली 'दिशा'.. अंबर तसे झाले'


   अशा दमदार शेरांच्या खुमासदार गझला वाचण्याचा अवर्णनीय आनंद घेण्यासाठी प्रत्येकाने 'दिशांतर' करावेच. गझलसंग्रह वाचल्यानंतर आपण गझलरंगी नाही झालो तर नवलच.. 




सुजाता निंबाळकर

फलटण

Post a Comment

0 Comments