🌸 पुस्तक परिचय 🌸
सूर्य आहे पेरला: गझलसंग्रह परिचय
सुप्रसिद्ध कवी प्रा. डॉ. माधव ज्युलियन यांनी ओळख करून दिलेल्या आणि सुप्रसिद्ध गझलकार सुरेश भट यांनी चेहरा दिलेल्या मराठी गझलने सध्या लिहित्या हातांवर गारूड केलेलं आहे. कित्येक पानं खर्ची करूनही सांगता न येणा-या भावना फक्त दोन ओळीतून मांडणं आणि एकाच गझलेत वेगवेगळ्या शेरांतून वेगवेगळे विषय हाताळता येणं या वेगळेपणामुळं ही गझलविधा अनेकांना आकर्षित करत आली आहे.
त्या अनेकांमधीलच एक ठळक आणि आश्वासक असं नाव म्हणजे कवी/गझलकार मा.दिनेश भोसले. नुकताच त्यांचा " सूर्य आहे पेरला " या शिर्षकाचा पहिला गझलसंग्रह प्रकाशित झाला असून त्याला पदार्पणातच डोंबिवली येथील काव्यरसिक मंडळाचा कै.अनिल साठ्ये स्मृती सर्वोत्कृष्ट गझलसंग्रह (२०२४) पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे. प्रथमत: याबद्दल त्यांचं अभिनंदन.
खरी निरागस तुझ्यासारखी दुनिया असती तर ?
भल्या माणसा तुझ्यासारखी दुनिया असती तर ?
दोन तीन वर्षांपुर्वी दिनेशजींच्या फेसबुकवरील ही गझल वाचनात आली. प्रत्येकाच्या काळजात असा एक चेहरा असतो त्याने कितीही चुका केल्या, धोका दिला तरी तो आपल्याला निरागसच वाटतो. या गझलेतील मतला काळजातल्या जीवलग व्यक्तीला उद्देशून असल्याने खूप भावला होता. या गझलेतील सर्वच शेर आशयसंपन्न आणि मनाला भावणारे होते.
" सूर्य आहे पेरला " या गझलसंग्रहातील सर्वच गझला आणि त्यातील शेर देखील असेच आहेत. परंतु ही गझल त्यांना सहजासहजी पावली नाही. वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी " स्पर्श " ही कादंबरी लिहिल्यानंतर काही कारणास्तव त्यांच्या लिखाणात खंड पडला तो तब्बल बारा वर्षे म्हणजे एक तप.
या दरम्यान ऐतिहासिक, परिवर्तनवादी, वैचारिक असं वाचन होत असलं तरी इतक्या वर्षांमधली मनाची घुसमट व्यक्त करायला लिखाणाचं अधिकाधिक प्रभावी माध्यम सापडत नव्हतं. अशातच त्यांनी सुप्रसिद्ध गझलकार मा. सईद असिफ यांच्या हिंदी - उर्दू गझल कार्यशाळेत प्रवेश घेतला आणि त्या कार्यशाळेत
जिंदगी बदनाम है
हां यही अंजाम है
ही पहिलीच हिंदी - उर्दू मिश्रित गझल लिहिली. ती गझल ऐकून असीफ सरांनी त्यांना " ज्वेल ऑफ द वर्कशॉप " असं म्हणून शाबासकीची थाप दिली. इथं सापडलेली गझल पुढे पुणे विद्यापीठ ( सावित्रीबाई फुले विद्यापीठ ) येथील मराठी विभागातर्फे आयोजित गझल चर्चेच्या निमित्ताने ज्येष्ठ गझलकार मा. प्रदीप निफाडकर आणि गझल अभ्यासक/गझलकार मा. अविनाश सांगोलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बहरत गेली. त्यातील निवडक गझलफुलांचा गुच्छ " सूर्य आहे पेरला " या गझलसंग्रहाच्या माध्यमातून त्यांनी रसिक - वाचकांसाठी आणला आहे.
प्रत्येक कलाकृतीमध्ये कलाकाराचं प्रतिबिंब डोकावत असतं असं म्हणतात. दिनेशजींच्या गझलाही त्याला अपवाद नाहीत.
सुरा मारणा-यास मारू मिठी चल
बिचा-या सु-यास कुठे काय कळते ?
निर्मळ झ-यासारखा स्वभाव, कायम हसतमुख चेहरा आणि अजातशत्रू असल्याशिवाय असं लिहिणंच शक्य नाही. दिनेशजींचा स्वभाव असा आहे म्हणूनच ते असं लिहून जातात.
ईश्वर, प्रेम, विरह, वैचारिक या मर्यादीत विषयांभोवती फिरणारी पुर्वीची गझल काही वर्षांपासून बदलत्या सामाजिक, राजकीय विषयांचाही वेध घेऊ लागली आहे. या गझलसंग्रहात दिनेशजींनी प्रेम, विरह विषयांवर कमी परंतु सामाजिक विषयांवर अधिक प्रमाणात लिहिलंय. त्यांच्या गझलांना चिंतनाची बैठक आहे. त्यामुळे त्यांचे शेर हे वैयक्तिक न राहता वैश्विक होऊन जातात.
भिंत जर दोघांमध्ये आहे जराशी
उंच ती होण्याअगोदर पाड आता
हा शेर एकच असला तरी याला अनेक विषयांचे ॲंगल आहेत. उत्तम संघटक, उत्तम सूत्रसंचालक, विद्यार्थीप्रिय, आदर्श शिक्षक आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची आंतरिक इच्छा असल्यामुळे त्यांनी
कासवाला आणि सशाला हे कधी कळणार आहे
संगतीने चालल्यावर सर्व काही ठीक होते
असा शेर लिहिला तर त्यात नवल नाही. हा शेरही कॅलिडोस्कोपसारखा आहे प्रत्येकाने आपापला अर्थ काढावा. दिनेशजींच्या गझलमधील अनेक शेरातून समाजाबद्दल प्रचंड आत्मियता दिसून येते.सध्याचं जग प्रचंड गतिमान आणि ॲडव्हॉन्स होत चाललं असलं तरी सर्वसामान्य लोकांच्या एक वेळच्या रोजीरोटीचा जो प्रश्न आहे - तो आहे तिथंच आहे यावर ते
धावते मेट्रो किती वेगात माझ्या इंडियाची
भारताच्या लेकरांचा प्रश्न पोटाचा न मिटला
या एका शेरातून तट्ट पोट भरलेल्या उच्चभ्रू धनदांडग्यांची "इंडिया" आणि पोट खपाटीला गेलेल्या गरीबांचा "भारत" या दोन प्रतिकांमधून वास्तव विरोधाभासाचं विदारक चित्रण आपल्यासमोर मांडतात. रोजीरोटीशी संबंधित असलेला परंतु राजकीय पार्श्वभूमी असलेला
अर्थसंकल्पातल्या आश्वासनांचा गोडवा
वंचना इथल्या भुकेची संपवत नाही कधी
हा शेर इथल्या बेगडी शासनव्यवस्थेचे बुरखे टराटरा फाडून टाकतो. सध्या माणसातील संयतपणा, सहनशीलता खूप कमी होत चाललीय. क्षुल्लक गोष्टींवरून ते हिंसक होत आहेत. कुणाच्याही चिथावणीखोर वक्तव्यावरून रस्त्यावर उतरून दंगली घडवताहेत. चिथावणी देणारे घरात बसतात परंतु दंगलीत प्रत्यक्ष सहभागी होणारे मात्र कायमचे जायबंदी होतात, पोलिसी चौकशीच्या फेऱ्यात अडकून सोन्यासारखी जिंदगी बरबाद करतात. यावर दिनेशजी त्या भरकटलेल्या तरूणांविषयी काळजीपोटी अतिशय नेमकेपणाने लिहितात
कुठे दंगल उसळली तर नको तू भावनिक होऊ
घरामधली तुझी जागा भरत नाही कशानेही
आपली सद्सद्विवेकबुद्धी गहाण ठेवून कुणाचंही ऐकणा-या अशा मानवी वृत्ती बदल ते लिहितात
कशाला व्हायचे आपण गवत वाळून गेलेले ?
सहज लावून जातो मग कुणीही आग आयुष्या
नेहमी चर्चिला जाणारा विषय म्हणजे जात आणि धर्म. धर्मा-धर्मात कलह माजवून अनेक राजकीय नेते आपली पोळी भाजून घेत असले तरीही समजुतदार सर्वसामान्य जनता मात्र माणसाला धरून आहे, एकमेकांच्या सुखदुःखात, उत्सवात सहभागी होत आहे,मग ते कुठल्याही जातीचे असोत धर्माचे असोत. यावर दिनेशजींचा लाजवाब शेर आहे
तू बांध लाख भिंती कट्टर दगड विटांच्या
दिलदार यार माझा नाचे सणात माझ्या
युद्धाच्या पार्श्वभूमीवरील दिनेशजींचा पुढील शेर अंतर्मुख करून जातो
युद्ध जिंकले म्हणजे तुम्ही काय जिंकले ?
रक्ताचे ओहळ दिसल्यावर कळले असते
खरं तर यापुर्वीच्या असंख्य युद्धाचे रक्तरंजित परिणाम माहिती असूनही माणसाला त्याची उपरती होत नाही हे खूप मोठं दु:ख आहे.इतिहासातून माणूस काहीच बोध घेत नाही हेच खरं. माणसाने दोन प्रकारे या सुपिक जमिनीचा -हास चालवलेला आहे. युद्धात वापरणा-या आण्विक अस्त्रांनी आणि हिरव्यागार झाडांच्या कत्तलीने. ही झाडं म्हणजे या धरणीचा श्वासच. यावर दिनेशजी अप्रतिम शेर लिहून जातात
धरेचा श्वास छाटून माणसा उद्दाम झाला तू
अता दिसणार कोठून सोहळा कणसात दाण्याचा ?
मला भावलेले काही शेर असे आहेत की ज्यांना कुठल्याही विश्लेषणांची आवश्यकता नाही
जिथे दररोज भरती दानपेट्या फार सरकारा
ईडीचे ध्यान तिकडेही जरा वळवायचे आता
कोणता रंग मी लावू मला ?
पांढरे राहणे सोपे नव्हे
हुकमी एक्के सा-यांकडले काढून घेऊन
दुर्री - तिर्री वापरायला हवी एकदा
एक डरकाळी पुरेशी सत्यवादी
नेभळट ते रांगणे मंजूर नाही
असे अनेक शेर उल्लेख करण्यासारखे आहेत. दिनेशजींचं आयुष्य ख-या अर्थाने गझलमय होऊन गेलंय. म्हणूनच ते प्रशांत पोरे, अभिजित काळे, संदीप जाधव, निलेश शेंबेकर या आपल्या गझलकार मित्रांच्या सोबतीने पिंपरी - चिंचवड मध्ये " गझल पुष्प " या संस्थेमार्फत गझलविषयक कार्यक्रम आयोजित करुन जनसामान्यांच्या मनात गझलेचा सूर्य पेरण्याचं महत्वपूर्ण कार्य करत आहेत. मा. प्रशांत पोरे यांचं समर्पक मुखपृष्ठ असलेला, गझलकार आणि गझल अभ्यासक मा. संजय गोरडे यांची प्रस्तावना लाभलेला, गझलपुष्प संस्था प्रकाशित " सूर्य आहे पेरला " हा दर्जेदार गझलसंग्रह आपल्या संग्रही हवाच.
किती चरे किती किती मनास पाडतील ते
दिनेशची गझल सहज च-यास लिंपते इथे
दिनेशजींना आपल्या गझलेबद्दल इतका प्रचंड विश्वास आहे.गझलेप्रती त्यांचा हा विश्वास उत्तरोत्तर वृद्धिंगत होवो आणि या पेरलेल्या सुर्याने त्यांच्या गझल प्रवासाची वाट आजन्म प्रकाशमान होवो या शुभेच्छा.
गझलसंग्रह : सूर्य आहे पेरला
प्रकाशन : गझलपुष्प संस्था पिंपरी - चिंचवड
मूल्य : २२०/-
अनिल वसंत दीक्षित
(सारंगनिल)
मो. ९९२२६१३३७५
0 Comments