🌸 पुस्तक परिचय 🌸
रसिकांना भरगच्च उपहार:
‘गझल हजार’
सिराज शिकलगार म्हणजे गझलेला पडलेले सुंदर स्वप्न आहे. ‘सिराज’ या नावाप्रमाणेच तो गझलेचा चकाकणारा हिरा आहे. प्रतिभेच्या चैतन्याचा खळाळता झरा आहे. त्यांचे संबंध व्यक्तिमत्वच गझलमय झाले आहे. त्यांच्या गझलांची आणि शेरांची विपुल संख्या पाहून गझलेलाही अचंबा वाटावा. केवळ गझलेसाठीच त्यांचा जन्म झाला असावा, असे वाटत राहते. सिराजभाई हे बहुप्रसव गझलकार आहे. अल्पावधीतच त्यांनी गझल लेखनातील सारे विक्रम मोडून काढले. ‘गझल हजार’ हा त्यांचा तेरावा गझल संग्रह आहे. या संग्रहातून त्यांनी रसिकांना गझलेचा भरगच्च वेगळ्या उपहाराने रसिकांना तृप्त केले आहे. हजारहून अधिक गझला लिहिण्याचा त्यांनी विक्रमी टप्पा पूर्ण केला आहे. गझल वाड़मयात विक्रमादित्य गझलकार म्हणून त्यांची ठळक नोंद झाली आहे. त्यांच्या घराण्यात कोणतीही वाड़मयीन परंपरा अथवा वारसा नसतानाही आंधळी सारख्या लहान खेड्यात राहण्याऱ्या या गझलकाराने एकलव्याप्रमाणे मनोभावे साधना करत गझल लेखनात केलेली कर्तबगारी लाखमोलाची आहे. येणाऱ्या काळात सिराज शिकलगार यांचे नाव सुवर्णाक्षराने लिहिले जाईल. हजारातील गझल लाखोत जाईल. याची मला पक्की खात्री आहे. सिराजभाई यांचा कोणताही गझल संग्रह वाचला तर ही गोष्ट सहजपणाने लक्षात येते की त्यांच्या प्रत्येक गझल संग्रहात सत्तर ते पंच्याऐंशीच्या सरासरीने गझलांचा समावेश आहे. केवळ पाच शेर लिहून ते थांबत नाहीत. गझलेची पूर्ण ओंजळ ते रसिकांसमोर रिकामी करतात. किमान सात ते नऊ शेर तरी ते सहज लिहितात. समाज जीवनातील सर्वच विषयांना ते स्पर्श करतात. त्यावर शेरांच्या माध्यमातून मार्मिक भाष्य नोंदवतात. केवळ स्पर्धेसाठी, यशासाठी, विक्रम करण्यासाठी नाही तर गझल लिहिल्याशिवाय त्यांचा श्वास मोकळा होत नाही. त्यांची प्रतिभा बारा तास, बारमाही तळपत राहते. गझलेच्या प्रवासातील ‘थांबा’ त्यांना ठाऊक नाही. त्याची आवश्यकताही त्यांना वाटत नाही. लाखाने शब्द त्यांच्या ओसरीला आहेत. ते लिहायला बसले की वह्या भरून जातात. ताव सरून जातात. मग ते थांबणार कसे ?
लाखात शब्द माझ्या आहेत ओसरीला
भरतात चोपड्या अन् सरतात ताव माझे
जलदगतीने त्यांचा गझल प्रवास सुरु आहे. अल्पावधीत हजार गझला लिहिण्याचा टप्पा ते पूर्ण करू शकले आहेत. ‘गझल हजार’ हे काय आकाशातून पडलेले नाही तर त्यामागे त्यांच्या सजग प्रतिभेची ताकद, कष्ट करण्याची जबरदस्त सवय आणि विलक्षण जिद्द याच्या बळावर त्यांनी गझलेचे क्षितिज पार केले आहे. आज गझल सम्राट सुरेश भटसाहेब हयात असते तर त्यांना सिराजभाईच्या अपूर्व गझल कामगिरीचा निःसंशय अतीव आनंद झाला असता. त्यांच्या विपुल गझल लेखनाचे सगळ्यांनाच आश्चर्य आणि कुतूहल आहे. हजार गझलांचा टप्पा त्यांनी हार न मानता कसा पूर्ण केला हे त्यांच्या शब्दात सांगायचे झाले तर इथे त्यांच्याच शेर उध्दृत करणे क्रमप्राप्त आहे.
लेखणीने पार केला एक टप्पा दशक केले शंभराचे
मी यशाला मित्र केले मानली ना हार केव्हा या गड्याने
सिराजभाई यांची गझल लेखनाची शैली सहज सोपी, ओघवती असती तरी त्यातून जीवनाचे तत्वज्ञान, सखोल चिंतन प्रभावीपणे प्रकटते. शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे शोषण, वंचितांची हेळसांड स्वातंत्र्यानंतर त्यांच्या वाट्यास आलेले दुःख दैन्य, कुटुंबातील आटत चाललेला आपुलकीचा झरा, वयोवृध्द माता-पित्यांची मुलांकडून होणारी उपेक्षा, राजकारणातील बजबजपूरी, सतत वाढत चाललेला भ्रष्टाचार, अनाचार, नातेसंबंधातील दुरावा यासारखे सगळे विषय सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेने सिराजभाई यांच्या गझलांमधून मुखर होतात. म्हणूनच त्यांच्या गझला जनसामान्यांना अधिक भावतात. त्यांना मिळणारा उस्फूर्त प्रतिसाद त्यांच्या गझल लेखनाचा हुरूप वाढविणारा ठरत आहे. त्या प्रेरणेतूनच त्यांचे निरंतर लेखन घडत आहे. त्यांच्या लेखनाचा बाज ग्रामीण असला तरी शहरातून महानगरातून त्यांच्या अफाट गझल लेखनाची सर्वतोपरी चर्चा झडत आहे. याची जाणीव आता त्यांनाही झाली आहे. सिराजभाई सर्वच पातळ्यांवर निर्भयपणे व्यक्त होत आहेत---
ग्रामीण बाज माझा दडपण झुगारले मी
काबीज शहर करण्या भयमुक्त आज झालो
मरण आपल्यापासून दूर आहे. आपले जगणे जिवंत आहे तोवर चांगले कार्य करणे अगत्याचे आहे. मरण कधी एकदा दारात येऊन दत्त म्हणून उभे राहील याची शाश्वती नसते. आपल्या आचरणात सदैव नैतिकता असली पाहिजे. विधायक कार्यासाठी संवेदना महत्वाची असते. ही संवेदना कधीही पातळ होऊ देता कामा नये. संवेदनेतूनच चांगले कर्म घडत असते. म्हणून संवेदना जागृत ठेवणे आवश्यक असते. नाहीतर आपले जीवन विनाशाकडे झेपावते. म्हणून नैतिकतेला, मांगल्याला, चांगल्या गुणांना अनन्यसाधारण महत्व आहे. माणसाचे जीवन अनमोल आहे. ते एकदाच मिळते. जिवंत असेपर्यंतच सत्कर्म केले पाहिजे. कबर झाकल्यावर कुणालाही मुभा मिळत नाही. याची जाणीव सिराजभाई आपणास करून देतात-----
मरण दूर जोवर करू कर्म बरवे
मुभा ना कुणाला कबर झाकल्यावर
निवडणुका जवळ आल्या की जनसामान्यांच्या कल्याणाच्या योजनांचा, घोषणांचा नेत्यांकडून अमाप पाऊस पाडला जातो. परंतु पुढे या योजनांची अंमलबजावणी करण्यात येते का, योजनांचे लाभ खरोखर जनसामान्यांपर्यंत पोहोचतात काय ? याकडे कुणीही पुरेशा गांभीर्याने पाहात नाही. अशा घोषणा म्हणजे जनतेची दिशाभूल करणाऱ्या वल्गनाच ठरतात. महागाईच्या चटक्यांनी जनतेची होरपळ थांबत नाही. घोषणांच्या पावसात लोकांनी अश्रू पिऊनच जगायचे का ? आश्वासनात घोषणांची खैरात अखेर कुणाच्या खिशात पडते ? असा उद्वेगजनक प्रश्न ते पुसतात. सिराजभाईने त्यांच्या नाटकी दुटप्पी वागण्याकडे बोट दाखवतात------
नेमस्त घोषणांचा पाऊस अमाप पडतो
पुसतात जन बिचारे अश्रू अता पिऊ का
सोमवार ते रविवार या साप्ताहिक वारांवर सिराजभाई यांनी लिहिलेली आनंदकंद वृत्तातील गझल अतिशय वेगळ्या स्वरूपाची आहे. त्यातील कल्पनांचे योजन आणि प्रयोगशीलता वाखणण्याजोगी आहे. आठवडाभराच्या वारांवरील ही मराठीतील पहिली एकमेव गझल आहे. प्रत्येक वाराचे वैशिष्ट्य आणि महत्व या गझलेतून विशद करण्यात आले आहे. ही गझल वाचनीय आहे. ती मुळातून वाचण्यासारखी आहे--
रविवार घात ठरला आला निरोप दुसरा
पुढच्याच सोमवारी येतो म्हणे दुपारी
सिराजभाई यांच्या वेगवेगळ्या विषयांवरील आशयपूर्ण हजार गझला गझल वाड़मयात मोलाची भर घालणा-या आहेत. गझलेचा हा ठेवा उद्योन्मुख गझलकारांसाठी मार्गदर्शन करणारा आहे. सिराजभाईच्या दमदार, जोरदार वाटचालीस माझ्या शुभेच्छा
गझल हजार: गझलसंग्रह
गझलकार: सिराज शिकलगार
प्रकाशक: अक्षरशिल्प प्रकाशन, अमरावती
पृष्ठे: ९६
मूल्य:२००/-₹
बदीऊज्जमा बिराजदार
(साबिर सोलापुरी)
0 Comments