● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
तुझ्या गावात आल्यावर
स्मृतींची तीव्र झाली झळ.. तुझ्या गावात आल्यावर
पुन्हा छातीत उठली कळ.. तुझ्या गावात आल्यावर
मनाच्या शांत काठावर पुन्हा बेभान लाटांची
अचानक वाढली वर्दळ.. तुझ्या गावात आल्यावर
तुझ्यासाठी न आलो पण तुझ्यापाशीच पोहचतो
कसा टाळू तुझा दरवळ.. तुझ्या गावात आल्यावर
तुझी जादूच ही, झालो पुन्हा ताजातवाना मी
मनाची संपली मरगळ.. तुझ्या गावात आल्यावर
तुझ्या कक्षेत आलो अन् बदल माझ्यात जाणवला
मनावर वाढली हिरवळ.. तुझ्या गावात आल्यावर
विसरली सर्व काही की तुला अद्याप आठवतो
समजले हे तरी पुष्कळ.. तुझ्या गावात आल्यावर
तसा संबंध नसतो या जगाशी कोणता माझा
मला जग वाटते प्रेमळ.. तुझ्या गावात आल्यावर
तुझा उल्लेखही साधा इथे करणार नाही मी
तुझी जपणार मी काजळ.. तुझ्या गावात आल्यावर
तुझ्या जर बंगल्याची मी चुकीने बेल वाजवली
तुला झेपेल हे वादळ.. तुझ्या गावात आल्यावर
निलेश कवडे
🌹काटा गुलजार होत गेला 🌹
गदुष्काळ जीवघेणा आजार होत गेला
गोठ्यातल्या गुरांचा मग भार होत गेला
जाणून घेतल्या मी माझ्यातल्या उणीवा
तेव्हा जगात माझा जयकार होत गेला
चिवचिव तिची कुठेही ऐकूच येत नाही
घरट्यात माणसांचा अधिकार होत गेला
नाती विकायला का सोकावलाय जो तो
रक्तात भेसळीचा बाजार होत गेला
बरबाद शेत झाले माती विषाक्त झाली
रासायनिक खतांचा भडिमार होत गेला
माझ्या यशात त्यांचा सहभाग एवढा की
काटा फुलात इतका गुलजार होत गेला
वृद्धापकाळ येता संतान भार म्हणते
वृद्धाश्रमा तुझा रे आधार होत गेला
विष्णू जोंधळे
गझलकार निलेशजी कवडे व
विष्णूजी जोंधळे यांना वाढदिवसाच्या
मंगलमय शुभेच्छा.. 🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments