🌸 पुस्तक परिचय 🌸
छान जमलेली भट्टी
‘गझल हट्टी’
सिराज शिकलगार यांची गझल खूपच आहे हट्टी. ते त्यांना एक दिवसाची ही देत नाही सुट्टी. सतत लिहिण्याचा प्रेमळ हट्ट ती करत असते. मग सिराज भाई फारसे आढे वेढे न घेता लेखणी हातात घेतात आणि अख्ख्या गझल संग्रहाची निर्मिती झाल्याशिवाय ते घडीभर ही थांबत नाहीत. गझलेच्या हट्टामधूनच सिराजभाई यांचा ‘गझल हट्टी’ हा ७८ गझलांचा सतरावा संग्रह वाचकांसमोर आला आहे. यात मानवी जगण्यातले सगळेच सरस रंग रस आहेत. प्रेम, वियोग, दुःख, वेदना, संघर्ष, सफलता, विफलता, वात्सल्य, जिव्हाळा, वंचना अशा भावनांनी ओतप्रेत असलेल्या आशयपूर्ण गजलाच्या रंगाची मुक्त उधळण आहे. मानवी भावनांना आपल्या तंत्राने मंत्राने आणि कमालीच्या कलात्मकतेने बांधलेल्या गझलांच्या प्रत्येक अविष्काराला रसिकांची नक्कीच भरभरून दाद मिळेल.
एकूणात छान जमलेली भट्टी म्हणजेच ‘गझल हट्टी’ सिराज भाई यांनी गझलेचे सर्व हट्ट पुरविले आहे.
सिराज भाई यांच्या लेखनशैलीची खास वैशिष्ट्य असे की त्यांची गझल रंजनवादी नाही तर सुधारणावादी आहे. सुधारणेतूनच समाजाची निर्मिती होऊ शकते, याकडे त्यांचा कल आहे. रंजनापेक्षा अंजनाची निकड अधिक असल्याची जाणीव त्यांच्या अनेक शेरातील व्यक्त होते. नकारात्मकतेकडे दुर्लक्ष करून सकारात्मकता रुजविणे हा त्यांचा मनोध्यास आहे. ते ओसडीत हिरवळ उगवतात, दुराव्याला जवळ आणतात, मौनाला संवादाची भाषा देतात. वाचाळांना तंबी देतात, दुःखाला सौंदर्याची दृष्टी देतात. वंचितांमध्ये जगण्याची आस निर्माण करतात. प्रबोधनाच्या अशा अनेकानेक पैलूंचे दर्शन त्यांच्या गझलांमधून घडत जाते. यात भाबडेपणाचा आशावाद नाही तर आत्मियता आणि प्रांजळपणा आहे. हे सदविचार शेरातूनप्रकट करताना त्यात कुठेही रुक्षता, कृत्रिमता किंवा पढिकतेचा आव उमटत नाही. आततायी माध्यमांचा रेटा असह्य होत चालला आहे. त्यातील मोबाईल तर बालकांच्या हातातील खेळणे होऊन बसले आहे. बालके दिवसेंदिवस मोबाईलच्या इतक्या आहारी जात आहेत की त्याशिवाय त्यांना घडीभरची उसंत नाही. पुढे हीच सवय कायम राहते. ते आळशी बनतात. परिश्रमाने यश मिळविण्याची त्यांच्यातील ऊर्जा संपून जाते. त्यातूनच संस्काराचा आणि वाचन संस्कृतीचा लोप होत जातो. याबाबत पालकांनी वेळीच जागरूक होणे गरजेचे आहे. बालक आणि मोबाईल यांचा अंतर ठेवले पाहिजे. बालकांचे लाड जरूर करा पण त्यांना मोबाईलपासून रोखा असा सल्ला ते पालकांना देतात--------
पालकांनो आततायी, माध्यमांना रोखा
बालकांना दोन ओढा निरगुडीच्या फोका
ऊठसुट दुःखाचे भांडवल करून चौकात त्याचे सतत प्रदर्शन मांडणारे नाटकी असतात. जिवापाड कष्ट करण्याची मनापासून तयारी असेल तर दुःखावर सहज मात करता येते. केवळ दुःखाला गोंजारून लोकांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करणे म्हणजे हे एक प्रकारे बसून आयते खाण्याचे, लोकांना फसविण्याचे नाटकच असते. कष्टाविना बांडगुळासारखे परावलंबी जीवन फार काळ जगता येत नाही. हे नाटक नेहमीच वठवता येत नाही. ते उघडे पडतेच. दुःखाचे प्रदर्शन भरविणाऱ्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे असा कानमंत्र सिराजभाई देतात----------
प्रदर्शन मांडले त्यांनी, सदा चौकात दुःखाचे
कळाले आज दुनियेला, बिचारे नाटकी होते
माणसाच्या जीवनातील अध्यात्माचे सुगंध उडून गेल्यामुळे कलीयुगात संस्कार नष्ट होत चालले आहेत. माणूस सज्जनांच्या सहवासात राहण्याऐवजी तो दुर्जनांच्या घोळक्यात सामील होत आहे. चंगळवादाकडे तो आकर्षित होत चालला आहे. त्याला आदर्श सांस्कृतिक मूल्यांचा विसर पडत आहे. त्यामुळे तो दिवसोंदिवस वाममार्गाकडे कूच करत निघाला आहे. उदात्ततेच्या, मांगल्याच्या सुगंधाने जीवन कसे फुलवावे याकडे त्याचे दुर्लक्ष होत आहे. जीवनाचे सार्थक करणारा खरा भक्तिभाव समजून सांगणारा त्याला कुणी सावता माळी भेटत नाही. हा सगळा लबाडांचा खोट्याचा बाजार भरला आहे. माणसांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे ती वाईट संगतीला लागतात. कष्टाऐवजी नशेच्या आहारी जातात. ही आजची सत्यता आहे. अशा दिशाहीन माणसांचे अखरे काय होणार ? या चिंतेने संवेदनशील मनाची अधिकच तडफड होते. अशीच काहीशी भावना सिराजभाई यांच्या या शेरातून प्रत्ययाला येते--------
सुगंधित करावे कसे जीवनाला
खरी भावभक्ती पुसा सावत्याला
शेतकरी काळ्या आईच्या काळजात फक्त बी पेरत नाही. तर तो उद्याचा घास पेरतो, श्वास पेरतो, जगण्याची आस परेतो, रात्रंदिवस मशागत करतो. काबाडकष्ट करतो. निसर्गाने साथ दिली तर पिके पदरात पडतात. एवढे करूनही हमीभाव मिळेलच याची शाश्वती नसते. अशावेळी कर्जाचे डोंगर वाढत जातात. खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकरी गळफास जवळ करतो. जीवनयात्रा संपवून टाकतो. वर्षानूवर्षे शेतकऱ्यांचा वनवास सुरु आहे. यावर ठोस उपाय योजना मात्र करण्यात येत नाही. शेतकऱ्यांविषयीचा हा शेर काळजाचा ठाव घेणारा आहे------
तो पोटाचा घास पेरून आला
जगण्यासाठी श्वास पेरून आला
सिराजभाई यांच्या गझलेचा प्रवास अव्याहत सुरु आहे. तो निंदकाची हाक ऐकत नाहीत. कुणाच्या धाकाला बळी पडत नाहीत, थकत नाहीत, थांबत नाहीत--------
कुणी मारली हाक मी थांबलो नाही
कुणी घातला धाक मी थांबलो नाही
रात्रीचा दिवस करून ते लिहित आहेत.
कष्टाची तर सवय जिवाला
दिवस रात्र समसमान मजला
कष्टाची सवय असणारा, व्यक्त होण्याची असोशी अदभूत प्रज्ञा आणि प्रचंड ऊर्जा असणारा गझकारच हे सगळे करू जाणे ! सिराजभाई यांच्या खयालात विपुल विषयांचे वैविध्य आहे. लोक भावनेशी निगडीत विषय आणि अस्सल जीवनानुभव त्यांच्याकडे ठाण मांडून असतात. विषय सूचत नाही, सांगण्यासारखे काही शेष नाही म्हणून कित्येक
गझलकारांची लेखणी बराच काळ थांबते. परंतु सिराजभाई यांच्या संदर्भात अशी रिक्त वेळ कधीच आली नाही. चिंतनातून आलेली अनुभवसंपन्नता आणि सुस्पष्ट विचारांची परिपक्वता आल्याशिवाय सृजनाचा हुंकार विस्तारू शकत नाही. एका पाठोपाठ एक नितांत सुंदर गझल संग्रहांची त्यांनी झडी लावली आहे. त्यांच्या धेय्यामध्ये आगळी आस आहे, मनात, मेंदूत काही अचाट करून दाखविण्याची दुर्दम्य जिद्द आहे--------
नको नको ते मनात माझ्या भरते आहे
मेंदूमध्ये अचाट काही ठरते आहे
सिराजभाई स्वतंत्र बाण्याचे गझलकार आहेत. ते तिसऱ्याची तरही गझल लिहित नाहीत. कुणाचे अनुकरण वा अनुवाद करण्याची त्यांना गरज पडत नाही. त्यांनी आत्मसात केलेली स्वतंत्र शैली वाचकांना आकर्षित करते. ते निडरपणे व्यक्त होत असतात—
स्वतंत्र साधा बाणा माझ्या, साहित्याची ओळख आहे
मला कुणाच्या अनुवादाचा, कर ही नाही डर ही नाही
सिराजभाई यांच्या गझल उच्चांक पर्वाचे स्वागत !
गझल हट्टी: गझलसंग्रह
गझलकार: सिराज शिकलगार
प्रकाशक: अक्षरशिल्प प्रकाशन, अमरावती
पृष्ठे: ९६ मूल्य:२००/-₹
बदीऊज्जमा बिराजदार
(साबिर सोलापुरी)
0 Comments