Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

एक पक्षी Gazalkar Divakar Chaukekar

🍀 पुस्तक परिचय 🍀



 मनाच्या फांदीवरुन आकाशात

 झेपावलेला: 🕊 'एक पक्षी'



गावाकडून आला शहरात एक पक्षी 

पडला अजून तेव्हा पेचात एक पक्षी ....

अंधार जीवनाचा करण्यास दूर अंती 

सूर्याकडे निघाला रागात एक पक्षी ....


     शा व्दिपदींनी आपल्या पहिल्यावहिल्या गझल संग्रहाची सुरुवात करणा-या सतीश गुलाबसिंह मालवे यांचा 'एक पक्षी' हा संग्रह नुकताच हाती आला आणि जाणवले की, 'हे पाणी काही वेगळंच आहे.' मनोगत वाचल्यावर कळाले की, मु-हादेवी, (ता.अंजनगाव सुर्जी, जि.अमरावती) या खूपच लहानशा गावात राहणा-या सतीश मालवे याने बारावीनंतर ITI केले असून, तो अगदीच सामान्य अशा घरातून पोटापाण्यासाठी बाहेर पडलेला व पुण्यासारख्या महानगरात नोकरीसाठी आलेला, त्याच्या कुटुंबा मधील पहिलाच मुलगा आहे आणि म्हणूनच तो या शहरात आल्यावर खूप बावरला, गोंधळला आणि पेचात पडला असावा. सुदैवाने त्याला शिक्रापूर येथील एका कंपनीत नोकरी मिळाली आणि सुखाची चाहूल येत असल्यासारखे वाटत असतानाच आपला भूतकाळ, जगण्यासाठी करावा लागलेला संघर्ष यांची आठवण झाल्यावर सतीश म्हणतो ....


दिवस दु:खातले माझ्या कसे विसरून जाऊ मी ? 

जरासा जीवनामध्ये सुखाचा काळ आल्यावर ....


    आपण केलेल्या संघर्षाची अशी आठवण तसेच जाणीव ठेवणारा सतीश समाजात दिसून येणा-या विषमतेवर, समाजावर असलेल्या राजकीय प्रभावामुळे दिसून येणाऱ्या परिणामांवर देखील आपले मत अगदी रोखठोकपणे मांडताना दिसतो, आपली खंत व्यक्त करताना दिसतो ....


बाप इकडे साफ करतो शासकी मो-या 

आणि मुलगा आमदारासारखा फिरतो ....


     परिस्थितीशी संघर्ष करण्याची सवय, आपल्या  जबाबदारीची जाणीव आणि कराव्या लागणा-या त्यागाची भावना बाळगणारा सतीश इथले वास्तव सुध्दा खूपच प्रखरपणे मांडून जातो ....


चिंतेमधे बुडाली असता स्थिती मनाची 

खाली कसा गळ्याच्या उतरेल घास माझ्या ....


     चिंतन, आत्मचिंतन आणि सामाजिक चिंतन यांची चांगलीच सवय असलेल्या सतीशला प्रश्नही खूप पडतात आणि म्हणूनच तो विचारतो ....


किती पडलीत भगदाडे मनाच्या जीर्ण भिंतींना

गिलावा शेणमातीने कुणी करणार आहे का ? 


     पण या प्रश्नाचे उत्तर मिळण्या आधीच सतीशला इथले वास्तव,भोवताली असलेली परिस्थिती लक्षात येते, शहाणे असूनही आपण वेड्यासारखे वागतो, डबक्यालाच सागर मानतो, क्षणाक्षणाला मरत जातो व भलेही परिस्थितीशी झगडत असलो तरी आपण फक्त पोटासाठीच लढणारे आहोत हे त्याच्या लक्षात येते आणि याचेच त्याला खूप हसू येते तेव्हा ....


रडवून घेतले ...... हसवून घेतले

मी जन्मभर मला समजून घेतले ....

घेशील  तू ...... भरारी अंबरामधे 

पक्षी स्वत:स जर मानून घेतले ....


     अशी स्वत:चीच समजूत काढून घेतो पण तरीही इथे सोसलेल्या व्यथा, यातनांची आठवण जेव्हा येते तेव्हा सतीश म्हणतो की, इथे येऊन तू फसला आहेस आणि इथला वनवास तुला भोगायचा आहे असे तो आपल्या आयुष्यालाच सुनावतो ....


कैद्याप्रमाणे काढतो आहे दिवस इथले 

जीवन तसेही एक कारावास आयुष्या ....


     असे असले तरी कधीतरी आपल्या आयुष्यात सावली येईल या आशेवर सतीश उन्हाच्या झळा सोसायला सुध्दा तयार होतो व म्हणतो ....


आधी व्यथा सोसून घे ... बाकी बघू पुढच्यापुढे

दु:खास कवटाळून घे ....बाकी बघू पुढच्यापुढे ....


होऊ नये अपुल्यामुळे वाईट कोणाचे कधी !

इतुके इथे समजून घे ... बाकी बघू पुढच्यापुढे ....


     आणि असे अगदी स्पष्टपणे, इतक्या ठाम आत्मविश्वासाने सतीश कसा सांगू शकतो ? या मला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर त्याच्या पुढच्या व्दिपदी मधूनच मिळाले ....


पुस्तके अभ्यासली नसली तरी 

चेहऱ्यांना वाचणे जमते मला ....

पर्वतांनो  आडवे  येऊ  नका

मार्ग माझा काढणे जमते मला ....


     संघर्षमय आयुष्य जगताना, रोज रोज समोर उभ्या ठाकणा-या नवनवीन संकटांशी दोन हात करत असताना जी शारिरीक तसेच मानसिक अवस्था तयार होते त्यातूनच सतीश बहुदा म्हणत असावा की ....


वेगळा मृत्यू कशाला मागतो देवास तू

रोजची मरमर तुझ्या तर जीवनाला लागली ....

अन्नधान्याचा घरी दुष्काळ पडल्याने गड्या 

रात्रभर कानामधे वाजत असावी ताटली ....


     पोटापाण्यासाठी आपलं गाव, आपलं घर, आपली माणसं असं सगळं काही सोडून शहरात येऊन नोकरी करु लागलेला सतीश नोकरीत आपले मन गुंतवण्याचा प्रयत्न करत असतोच पण अशी काही परिस्थिती येते की ....


समजून मी अगोदर हा वर्तमान घेतो 

नंतर तुझे भविष्या संपूर्ण ज्ञान घेतो ....

येतो मला ढगांवर संताप फार देवा 

जाणून या धरेची जेव्हा तहान घेतो ....


     शहरातही जेव्हा त्याला पावसाची वाट पाहणारे आपले शेत दिसू लागते, मन खिन्न होते आणि वेदना होवू लागतात, अशावेळी ....


वेदने तुझे नखरे काढण्यास आता मी 

घेतली मदत आहे जीवनात गझलेची ....

नेहमी दरवळावा जर सुगंध शब्दांचा 

माळली फुले जावी लेखनात गझलेची ....


     असे सतीश मोठ्या उत्साहात, आनंदात आणि अभिमानाने  सांगून जातो. गावात असताना लहान लहान कविता करणा-या सतीशची ओळख त्याच्या मित्रांमार्फत 'गझल' विधेशी होते. मात्र या वेळपर्यंत गझलेच्या मात्रा वगैरे काही असतात हे देखील ज्या सतीशला माहित नसते, तो सतीशची केवळ सुदैवी म्हणूनच डाॅ राज रणधीर, डाॅ शिवाजी काळे आणि डाॅ स्नेहलताई कुलकर्णी (दिशा) या गझल क्षेत्रातील मान्यवरांशी त्याची ओळख होते व तो गझलची बाराखडी गिरवायला शिकतो आणि केवळ काही वर्षातच ९० गझलांचा समावेश असलेला हा "एक पक्षी" नावाचा त्याचा दर्जेदार 'गझल संग्रह' मोठ्या दिमाखात वाचकांच्या हातात पडतो, हे पण एक वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. 'एक पक्षी' या गझल संग्रहात सतीशने राधा, साशंक, आनंदकंद, मेनका, वियदगंगा,अनलज्वाला, वंशमणी, भुजंगप्रयात, पादाकुलक, लज्जिता, रंगराग, प्रमद्वारा, विरलक्ष्मी, विद्युल्लता, वनहरणी, कालगंगा,मंजुघोषा, पिनाकी, मंदाकिनी, सौदामिनी, मृगाशी,  प्रसूनांगी, मनोरमा,  लवंगलता, देवप्रिया, स्त्रग्विणी ही अक्षरगण वृत्ते व मात्रावृत्ते वापरली आहेत. संग्रहातील काही गझला मुसलसल तर काही गैरमुसलसल प्रकारातील आहेत.  

     प्रेम, विरह, सामाजिक विषयावर चिंतन, निसर्गाशी तसेच चुकीच्या समाज व्यवस्थेशी दोन हात करण्याची तयारी ठेवणारा, मैत्री जपून ठेवणारा, एक मुलगा, पती, बाप आदि विविध भूमिकांमधून संपूर्ण गझल संग्रहातून आपले अस्तित्व जाणवून देणारा आणि वास्तवाचे भान ठेवणा-या सतीशच्या गझला ह्या प्रत्यक्ष त्याला आयुष्यात आलेल्या अनुभवातून आल्याचे पदोपदी जाणवते आणि इतके असूनही आपण कंपनीत काम करणारा एक कामगार आहोत याची जाणीवही तो कायम ठेवतो हे ही एक वैशिष्ट्यच म्हणावे लागेल कारण ....


कशी  सांग  वारी  करु  पंढरीची 

तिन्ही सांज मी कारखान्यात असतो ....


     अशा शब्दांत तो आपली खंत पांडुरंगाकडे व्यक्त करताना सुध्दा दिसतो. 


     माणसाच्या हातावर बसलेल्या एका सुंदर पक्षाचे संतोष घोंगडे यांचे मुखपृष्ठ लाभलेला, गझल मंथन प्रकाशनाचे मा. जयवंतजी वानखेडे यांनी प्रकाशित केलेला, अक्षर जुळवणी व मुद्रकाची जबाबदारी प्रमोद डिजिटल, कोरपनाचे प्रशांत रामगिरवार यांनी पार पाडली असून," मिळाले पूर्वजांचे दाखले त्यांना, पिढ्यांची नोंद माझ्या ठेवल्यावर मी " अशी सतीशचे पूर्वज श्री मंगलसिंग मालवे (जोखा-या) यांना हा संग्रह अर्पण केला असल्याची अर्पण पत्रिका वाचायला मिळते. या अर्पणपत्रिकेच्या मागेच  "गावाकडून आला शहरात एक पक्षी, पडला अजून तेव्हा पेचात 'एक पक्षी' " ही व्दिपदी उद्धृत केलेली असून गझलकार डाॅ शिवाजी काळे यांच्या प्रस्तावनेनंतर सतीश मालवे यांचे मनोगत छापलेले आहे. त्यानंतर गझलकार अनंत ढवळे आणि डाॅ स्नेहलताई कुलकर्णी (दिशा) यांचे शुभेच्छा संदेश वाचायला मिळतात. 


     गझलसंग्रहाच्या मलपृष्ठावर गझलकार निलेश कवडे यांनी पाठराखण केली असून १०६ पृष्ठसंख्या असलेल्या संग्रहाचे मूल्य २००/= रुपये आहे.

     पदार्पणातच 'समरसता साहित्य पुरस्कार-२०२५' प्राप्त झालेल्या या संग्रहाची दुसरी आवृत्ती लवकरच प्रकाशित केली जाणार असून, मनाच्या फांदीवरुन आकाशात झेपावलेल्या "एक पक्षी" नावाच्या या संग्रहास मनापासून शुभेच्छा देतो व गझलकार श्री सतीश गुलाबसिंह मालवे या तरुण गझलकार मित्राच्या हातून गझलेची याहूनही भरघोस अशी सेवा भविष्यातही घडत राहो या शुभेच्छांसह माझे लांबत चाललेले हे लिखाण  थांबवतो ....!



गझलसंग्रह: एक पक्षी

गझलकार: सतीश मालवे

प्रकाशक: गझल मंथन प्रकाशन

किंमत: २०० रु.

पृष्ठसंख्या: १०६




दिवाकर चौकेकर, 

गांधीनगर (गुजरात) 

Post a Comment

0 Comments