Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

मल्टीकलर Gazalkar Divakar Chaukekar

🍀 पुस्तक परिचय 🍀



ल्टी

एक आगळावेगळा पण बहुरंगी गझलसंग्रह 


     पुस्तक परिचय व परीक्षण लेख लिहिण्यासाठी आज मी अशा एका ताज्या ताज्या गझल संग्रहाची निवड केली आहे की, संग्रहाच्या नावापासूनच हा संग्रह आगळावेगळा व बहुरंगी आहे हे वाचकांच्या लक्षात येईल. विविध वैशिष्ठ्ये घेऊन आलेला हा नवा कोरा गझलसंग्रह वाचकांच्या हाती सुपूर्द करणारा गझलकार हा एक तरुण, नम्र स्वभावाचा, उमदा कलाकार असून त्याच्या मनात आपल्या आई - वडिलांबद्दल प्रचंड आदर आहे. समाजात वावरत असतांना सर्व घटकांशी सहजपणे सुसंवाद साधण्याची कला त्याला अवगत असून कुठल्याही गोष्टीत अतिरेक न करता समतोल साधण्याची कामगिरीही तो अतिशय कुशलतेने करु शकतो. सामाजिक, राजकीय तसेच सांस्कृतिक क्षेत्रात तो अतिशय नम्रतेने वावरतो तर नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांशी, कनिष्ठांशी तसेच भेटावयास येणा-या सर्वच मान्यवरांशी देखील त्याचे संबंध नम्र, सलोख्याचे, प्रेमाचे, दृढ तसेच निरोगी असतात. बी.काॅम., एम.बी.ए. झालेला हा तरुण गझलकार एका सेवा प्रदान करणा-या संस्थेत जबाबदारीच्या पदावर नोकरीस असून निकोप साहित्य निर्मिती बरोबरच आपली नोकरी सुध्दा पूर्ण कार्यक्षमतेने पार पाडत असतो. अशा या माझ्या गझलकार मित्राचे नाव आहे श्री प्रशांत पोरे (पिंपरी-चिंचवड) पुणे आणि त्याच्या या बहुरंगी गझल संग्रहाचे नाव आहे 'मल्टीकलर .!' 


     प्रत्येकालाच प्रपंच सांभाळत असताना हजारो प्रश्न भेडसावत असतात, अनंत अडचणी येत असतात. कुणालाच अशा परिस्थितीत अडकून रहायची इच्छा नसते पण मग कुठेतरी जीव अडखळतो आणि ....


कधी बसल्या ठिकाणी लागते डुलकी अचानक अन 

कधी ओढून ताणुनही न येते झोप डोळ्यावर ....


     अशी आपली दयनीय अवस्था होऊन जाते आणि मग अशा वेळी ....


सुखाची लालसा करशील, दु:खे यायची मागे

अशी काही व्यवस्था कर, सुखे येतील मागावर ....


     असा सल्ला मिळायला सुरुवात होते. बाबा रे तू तत्वासाठी जगायला शिक, उगाच भरकटत जाऊ नकोस, आपला जन्म हा माणसाचा जन्म आहे, पाला पाचोळ्याचा नाही, असा फुकटचा सल्ला  द्यायला सुध्दा हा समाज मागे पुढे पहात नाही, पण ....


लाल,निळ्या वा भगव्या, हिरव्या कुठल्याही रंगाचा नाही, 

देव कुण्या जातीचा नाही, देव कुण्या धर्माचा नाही..

पंचेचाळीस वर्षांनंतर अजून सुध्दा मला कळेना, 

पैसा नसल्यावर मग कोणी इथे तुझ्या कामाचा नाही ....


     हे जळजळीत वास्तव, जीवनातील एक कटू सत्य इथे सगळ्यांनाच अनुभवायला मिळते, पण जेंव्हा जेंव्हा असे दु:ख, अशा अडचणी आपल्या आयुष्यात येतात तेंव्हा तेंव्हा आपल्याबद्दलची सगळी माहिती जिला असते 'ती' आपली सखीच आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते कारण पराजय कधी मानायचा याची सुध्दा तिला चांगलीच माहिती असते म्हणून ....


माझ्या अवघ्या श्वासांची लय, तिला माहिती, 

अडखळल्या शब्दांचा आशय, तिला माहिती ....

तिला माहिती आहे माझ्या इतिहासाची, 

कुणाकुणाची मज येते सय, तिला माहिती ....

दुसरे काही माहित असले, नसले तरिही, 

मानायाचा कधी पराजय, तिला माहिती ....


     असा आपल्या सखीबद्दलचा विश्वास स्पष्टपणे व्यक्त करायला सुध्दा हा तरुण गझलकार कचरतांना दिसत नाही. 


     आता ज्या गझलेवरुन या संग्रहाला 'मल्टीकलर' हे शीर्षक दिले गेले आहे ती गझल पाहूयात ....!

     आपलं जगणं,आपलं आयुष्य, त्यात येणारे संभाव्य धोके व त्यापासून स्वत:ला वाचवत वाचवत पुढे पुढे जात राहणे अशीच आपल्या जीवनाची वाटचाल चालू असते. यात कित्येक वेळा आपला स्वभाव, आपलं वागणं सुध्दा अडचणीचं ठरु शकतं. शहरातील जगणे अवघड होऊ लागले आहे म्हणून पुन्हा एकदा गावाकडे जाण्याची वेळ आली आहे हे सत्य नाकारता येणार नाही आणि ही गोष्ट समजावून सांगतांना ....


कोण नसते आपले जाणून घ्या ..!

सोबती असणार आहे फक्त घर ..!

वेचताहे सांडलेल्या अक्षता,

लेकरू जेवेल म्हणतो पोटभर ..!

ठेव सांभाळून इज्जत आपली 

जर तुला वाटे तुझी व्हावी कदर ..!

सोडता आलाच 'मी' सोडून दे 

जिंदगी होईल मग मल्टीकलर ..!


     आपल्यात सर्रास दिसून येणारा 'मी' पणा, आपला 'इगो', आपला 'गर्व' जर आपण सोडून दिला तर आपले आयुष्य नक्कीच बदलून जाईल, अधिक रंगतदार होईल व आयुष्याचे सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे. 


     ह्या गझल संग्रहाला दिलेले इंग्रजी भाषेतील नाव हे सुध्दा या संग्रहाचे एक वैशिष्ट्य आहे असे म्हणता येईल. दुस-या भाषेतील असे आशय अधिक स्पष्ट करणारे शब्द, कल्पना वापरल्याने जर आपली भाषा समृध्द होत असेल तर असे प्रयोग करण्यास हरकत नसावी असे मला वाटते. 


     या गझल संग्रहाचे वेगळेपण सांगणारी अजूनही काही वैशिष्ठ्ये आहेत ती खालील प्रमाणे आहेत .... 


१) या संग्रहातील काही गझला हिंदी भाषेत लिहिलेल्या आहेत. 

२) संग्रहातील काही गझलांमध्ये व्दिपदीची पहिली ओळ (उला मिसरा) मराठीत तर दुसरी ओळ (सानी मिसरा) हिंदी भाषेत किंवा याच्या उलट  असाही प्रयोग केल्याचे दिसून येते. 

३) एका गझलेत तर अर्धी ओळ मराठीत व उरलेली अर्धी ओळ हिंदीत घेतली आहे.

४) आपल्या मित्रांच्या आवडलेल्या गझलांची एक ओळ (उला किंवा सानी) घेऊन त्याप्रमाणे त्याच वजनात (वृत्तात) लिहिलेल्या काही 'तरही' गझलांचा समावेश देखील या संग्रहात करण्यात आला आहे. 

५) आपल्या जवळच्या मित्राचे नावच काफिया म्हणून वापरल्याचे एक उदाहरण या संग्रहात दिसून आले आहे. गझलसम्राट दादासाहेब सुरेश भट यांचे नाव अनेक जणांनी व्दिपदीमध्ये वापरल्याचे उदाहरण या आधी ब-याच गझलांमध्ये वाचायला मिळाले, पण मित्राच्या नावाचा काफिया म्हणून केलेला वापर निदान मी तरी पहिल्यांदाच वाचला आणि म्हणूनच तो शेर इथे देण्याचा मोह मला आवरता येत नाही ..


बरी नव्हे अशी अलिप्तता 

खरेय ना ? दिनेश भोसले ..


     खानापूर जि. सांगली हे मूळ गाव असलेला प्रशांत हल्ली चिंचवड, पुणे येथे रहात असून कविता, गझल लेखन, पर्यटन, क्रिकेट आणि खाद्यभ्रमंती हे त्याचे छंद आहेत. 


     अशा या प्रशांतचे प्रिया (काव्यसंग्रह), गझलप्रिया (गझलसंग्रह), 'गझल - पिंपरी-चिंचवडची' व 'दीवान-ए-प्रशांत' हा मराठी गझलेतील पहिला मुकम्मल दीवान या पूर्वीच प्रकाशित झालेला असून 'गझलास्वाद' या गझल रसग्रहण संग्रहा बरोबरच 'मल्टीकलर' या गझलसंग्रहाचा प्रकाशन सोहळा नुकतेच दिनांक १८ मे, २०२५ रोजी पुणे येथे पार पडला आहे. या दोनही संग्रहांसाठी मी गझलकार श्री प्रशांत पोरे यांचे अभिनंदन करतो व भविष्यातही असेच दर्जेदार साहित्य त्यांच्या हातून घडत राहो यासाठी त्यांना मनापासून शुभेच्छां देतो ....!


     प्रेम, विरह, व्यथा-वेदना, सुख, दु:ख, आत्मचिंतन, समाज चिंतन, भले-बुरे अनुभव आदि भावभावना व्यक्त करणारे व मला आवडलेले 'मल्टीकलर' या गझल संग्रहातील काही शेर/व्दिपदी देण्याचा मोह आवरत नसल्याने हे काही खास शेर समस्त गझल रसिकांसाठी ....


त्या क्षणास टाळ, जो तुला हवा 

होय, मोह  आवरायला  हवा ....

आपल्यात वाद व्हायला नको 

गोडवा जरा टिकायला हवा ....

○ 

घाम गाळला बापाने मग 

अमुच्या शर्टावरती अत्तर ....

प्रेम आणखी काही नसते 

जादूटोणा, जंतर मंतर ....

○ 

तुझे निमंत्रण उगाच आले 

कितीक धांदल पुन्हा उडाली ....

○ 

इतकेच फक्त चुकले, केली न वाच्चता 

सांभाळल्या उराशी, आजन्म मी खुणा ....

केल्या कुणी सुखाच्या, व्याख्या जरी किती 

पडल्यावरी निजे जो, त्याला सुखी म्हणा ....

○ 

गझल लिहा वा कादंबरी लक्षात असू द्या इतके 

अहंपणा आल्यावर प्रतिभा सोबत राहत नाही ....

○ 

जाहली आहे तुझी इतकी सवय 

भेटली नाहीस तर होईल प्रलय ....

चाल होती एवढी लोभस तुझी 

मी जरी हरलो तरी माझा विजय ....

○ 

काळ जरी अंगावर आला 

नको भ्यायला आपण त्याला ....

खूप दूरवर जाल तुम्हीही 

नाकासमोर बघून चाला ....

○ 

आठवण वाईट असते केवढी 

लागती हृदयात अश्रू पाझरू ....

○ 

किती भोके पाकिटाला ह्या 

कशी चुकवावी उधारी मी ....

○ 

वेगळेपण नेहमी जपले 

ओढली नाही कुणाची री ....

रॅली, निषेध, मोर्चे, आंदोलने करा 

जेथे गरज खरोखर तेथे दिसाल का ? 

ही खरी व्याख्या सुखाची सांगतो 

लाभले नाही, लगेचच संपते ....

○ 

चूक खरेतर त्याची नव्हती काही 

फक्त जन्मभर खरे बोलला होता  ....

○ 

जिंदगी दबती रही कर्जोंतले 

मी कसे पुरवू मनाचे चोचले ?

○ 

कळेना स्वप्न कोणाचे ? सताए रातदिन अक्सर 

गझल आहे कि तो विठ्ठल मिला दे तू फ़कत साकी ....

○ 

गर खुदा का तू न बंदा खास होता 

आज वेड्या तू यमाचा घास होता ....

○ 

चंद लम्हों ने सिखायी शायरी 

यह मुहब्बत का हमे लगता असर ...

मराठी, हिंदी तसेच मराठी हिंदी मिश्र अशा एकूण ८० गझलांचा समावेश या संग्रहात करण्यात आला असून त्यात एक गझल ही प्रशांत पोरे यांच्या  सांगली - कोल्हापूर भागातील बोलीभाषेतली देखील आहे. 


प्रकाशक श्री संजय शिंदे यांच्या अष्टगंध प्रकाशन, ठाणे व्दारा प्रकाशित करण्यात आलेल्या या गझल संग्रहाचे बहुरंगी मुखपृष्ठ सुनीति लिमये यांचे असून 

प्रत्येक गझलकाराच्या 'ती' ला हा संग्रह सविनय अर्पण करण्यात आला आहे. 


ज्येष्ठ गझलकार श्री धनंजय तडवळकर, पुणे यांच्या सुंदर, विस्तृत, सविस्तर व प्रभावी अशा प्रस्तावनेनंतर गझलकार श्री प्रशांत पोरे यांचे संयमित पण सच्चे मनोगत असून एकूण पृष्ठसंख्या १०४ एवढी आहे. संग्रहाच्या मलपृष्ठावर गझलकार श्री प्रशांत पोरे यांचे एक रुबाबदार छायाचित्र असून त्याखाली 'सोडता आलाच मी सोडून दे, जिंदगी होईल मग मल्टीकलर' ही शीर्षक व्दिपदी जाड अक्षरात छापण्यात आली आहे. 


गझलकार श्री प्रशांत पोरे यांना या गझल संग्रहासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो व माझा हा परिचय व परीक्षणाचा लेख इथेच थांबवतो ....!



--------------------------


पुस्तकाचे नाव :  मल्टीकलर 

गझलकार       :  श्री प्रशांत पोरे 

प्रकाशक        : अष्टगंध प्रकाशन, ठाणे 

मुद्रण             : श्री आर्ट्स 

अक्षर जुळणी  : प्रदीप मधुसूदन गावडे 

मुखपृष्ठ          : सुनीति लिमये 

पृष्ठसंख्या       : १०४ पृष्ठे 

संग्रहाचे मूल्य  : २०० रुपये .




दिवाकर चौकेकर

गांधीनगर (गुजरात) 

choukekar.divakar@gmail.com 

Post a Comment

0 Comments