Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

गुंतले तुझ्यात मी Gazalkara Manisha Naik

 🟣 नवरात्र विशेष 🟣

🌸 दुसरी माळ 🌸

🌼 आजचा रंग:- लाल 🌼



 🌷गुंतले तुझ्यात मी🌷


कळू नये कधी कुणास गुंतले तुझ्यात मी

म्हणून ठेवते तुला मनातल्या मनात मी...


मिळायला हवी तिथे अखंड सावली तुला 

म्हणून राहते उभी दुपारच्या उन्हात मी...


चुकून अंगणात जर दिलास एक कोपरा 

फुलून ओघळेनही बनून पारिजात मी... 


कधीच वेदना व्यथा तुला नको कळायला 

म्हणून सांगते हसून "आजही सुखात मी" 


जसा उन्हात गारवा तसाच भेट तू मला

लपेट मग धुके जरा भिजेन त्या दवात मी...


मिळेल का तुला कधी निरोप फक्त एवढा 

जपून एक ठेवला गुलाब पुस्तकात मी... 


जसा फुलून मोगरा तसाच भासतोस तू 

मिठीत दरवळेन की बुडेन अत्तरात मी...


चुकून शोधलेस तर लगेच सापडेल घर 

म्हणून आजही इथेच राहते पुण्यात मी... 


बनून राधिका कधी इथेच जन्म घेतला  

पुन्हा तुलाच भेटले किती युगा युगात मी 


मनिषा नाईक



=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments