🍀 पुस्तक परिचय 🍀
🌷गझलयात्री-४🌷
गझलयात्री 4 हा प्रातिनिधिक गझल संग्रह मराठवाडा विभागातील गझलकारांचा आहे. गझल मंथन साहित्य संस्थेचे सचिव मा. जयवंत वानखडे यांनी संपादन केलेले असून अनंत देशपांडे यांच्या अथक परिश्रमातून ही कलाकृती कॉपी टेबल स्टाईलमध्ये वेळेत उपलब्ध झाली आहे. पुस्तक हातात घेतल्याबरोबर आपली नजर खिळते ती त्यावरील दोन्ही हात आकाशात उंच धरणाऱ्या माणसावर जो पाखरांसारखी मुक्त भरारी घेत आहे. हे अवघे आकाश जणू आपल्या कवेत घेत आहे. पाय पृथ्वीवर आणि कवेत आकाश घेणारे सुंदर मुखपृष्ठ बासरी कलावंत, चित्र कलावंत, कवी, गझलकार साईनाथ फुसे यांनी बहारदार केलेले आहे. संतोष कुलकर्णी सरांची दाद खरच मनाला साद घालते. ते म्हणतात, मराठी साहित्य क्षेत्रात दखलपात्र असा एक अतिशय बहुचर्चित आणि आकर्षक असा प्रवाह म्हणजे गझल आहे. प्रस्तुत संग्रहातील अनेक गझलांतून नव्या काळाचा , नव्या जाणिवांचा, नव्या विचारांचा आणि अभिव्यक्तीचा काही लोकप्रिय गझलकारांनीही अंगिकार केल्याचे जाणवले. मुशायरे, मैफली यासोबतच कार्यशाळा आणि प्रकाशने सातत्यपूर्ण घडव त गझलकारांचे एक सक्रीय व्यासपीठ गझल मंथन ने आव्हाने पेलत उभारले आहे. यात मुरलेल्या गझलकारांच्या व नवखेपणाच्या गझलाही आहेत. असे ते म्हणतात. डॉ. स्नेहल कुलकर्णी यांचा शुभेच्छा संदेश निव्वळ संदेश नाही. त्या म्हणतात की, गझलमंथनचे अध्यक्ष अनिलदादा कांबळे आणि त्यांच्या कार्यकारिणी टीमन पाहिलेले स्वप्न पूर्णत्वास जात आहे. हे गझलमंथनचे नेत्रदीपक यश आहे. उत्कृष्ठ शेर रसिकाच्या , माणसाच्या मनाच्या पातळीवर , खोलवर जाऊन संवाद साधतो. त्याच्या मनाची पकड घेतो. त्याच्यात खोलवर रुजतो. असे त्या म्हणतात. मानवी आस्था जोपासणारे काही शेर हे गझलयात्रीचे बलस्थान आहे. गझलकाराच्या मनात अशा वैश्विक जाणिवांचा बिनधास्त वावर सुरु होतो. जो शेरातून खयालाच्या स्वरुपात अवतरतो आणि तो वाचून गझलेत दुःखाला आधार देण्याची क्षमता असल्याची जाणीव वाचकाला होते. गझलयात्रीत दुःखाचा आधारवड बनून सुखाच्या पारंब्या झुलावणारे बरेचशे शेर आहेत. हे गझलयात्रीचे बीज आहे. अशा शुभेच्छा त्यांनी दिलेल्या आहेत.
गझलकारा अनिता पडवळ यांच्यासाठी त्यांचा बाबा न थकणारा भक्कम पाया असतो. त्या आपल्या मक्त्याच्या शेरातून म्हणतात की,
मी थकतांना त्यांना नाही चुकून सुद्धा कधी पाहिले
कसे थकावे अनिताने जर भक्कम पाया असतो बाबा
स्वतःच्या अडचणींशी भक्कम लढा देणारी खंबीर स्त्री त्यांनी आपल्या गझलेतून उभी केलेली आहे.
सर्व जगाला तिने हसविले पण तिच्या वाट्याला काटेच आले. नशीब सुद्धा फसवे निघाले. गुलाबी ऋतुंची अपेक्षा केली पण वैशाखाचे छळणे सरले नाही. लव्हाळे नदी किनारे तरले नाही. अडचणीतूनच जीवन फुलते म्हणून गझलकारा अनुराधा वायकोस आपल्या एका शेरात म्हणतात की,
तुझ्या प्रितीचे मुके खुलासे कळले नाही
मनात होते तसे कधीही घडले नाही
असा सहजसुंदर शेर त्या लिहून जातात. संकटे झेलण्याची ताकद त्यांच्यात असल्यामुळे त्या चल नवा मज घाव दे असे धीराने म्हणू शकतात.
अनिता कानिंदे मुनेश्वर यांना वाटते की,
कुणी लक्तर व्हावे पुन्हा एकदा
कुणी अस्तर व्हावे पुन्हा एकदा ….
मौन वेदनांची झालीय सलगी
शब्द ईश्वर व्हावे पुन्हा एकदा
अशा सहजसुंदर शेरातून त्या व्यक्त होतात खऱ्या मैत्रीची ओळख करुन घ्यायची असेल तर त्यांची गझल नक्की वाचा.
जीवनी जस जसा ढासळत राहिलो
मी स्वतःला तसा आढळत राहिलो
असा सार्वकालिक अप्रतिम शेर लिहिणारे अविनाश कासांडे न्याहाळत राहतो, काजळत राहतो माणसांच्या कडून बाटळत राहतो असे आपल्या गझलेतून म्हणतात. त्यांची अनामिका ही गझल ही मनात घर करुन राहते.
सावलीतलं झुडुप आणि उन्हातली उर्मी, विरह वेदना चंद्र, सूर्य, पहिला पाऊस, गळणारे छप्पर, रस्त्यावरचे रक्त, सोशल मिडियावरील गर्दी आणि आईचे दुःखाला दळणे या प्रतिमानांतून गझल फुलविणारे आत्माराम जाधव बघता बघता मनावर गारूड करतात. एका शेरात ते म्हणतात की,
चटके बसले म्हणून भाकर फुगून बसते
आणि तव्याच्या खाली सरपण गुपचुप जळते
मी तुमची काठी आहे असे म्हटल्यावर बापाच्या घामाचे अत्तर होते. या अर्थाच्या अप्रतिम शेरामुळे अनंत देशपांडे सरांची गझल मनाचा ठाव घेते. त्यांचा एक अप्रतिम शेर असा आहे की,
इतकेच म्हणालो केवळ मी काठी आहे तुमची
अन् क्षणार्धात बापाच्या घामाचे अत्तर झाले
असे अप्रतिम शब्दातीत शेर हे गझलयात्री ला खरं म्हणजे गझल अमृत बनून टाकतात.
दुःख, यातना, व्याधी, अर्धपोटी झोपणारे करोडो बांधव बघून कदाचित कुणाचे मन द्रवते आणि त्यातून सुंदर गझलकृती जन्माला येते. डॉ. इक्बाल मिन्ने सरांचा एक अप्रतिम शेर पहा-
माणसाला माणसाचे दुःख कळले पाहिजे
माणसाने माणसासाठीच जगले पाहिजे
डोक्यातुनी कुणाच्या नाहीच जात गेली असा सुंदर मिसरा कपिल सावळेश्वरकर लिहून जातात. आणि आपल्या एका अप्रतिम शेरात ते म्हणतात की,
केव्हा मनाप्रमाणे शमलीच भूक नाही
शोधात भाकरीच्या माझी हयात गेली
कांचनगंगा मोरे यांचा एक शेर पहा. त्या म्हणतात-
जरी कोरड्या अन ओल्याही दुष्काळाशी नाते
पण घामाच्या थेंबामधूनी रान बहरले होते.
अशी बोलकी व्यथा आपल्या गझलेतून त्या व्यक्त करतात.
सहा गज जमीन, बुरूज- हिरकणी, दवबिंदू- पान, माती आणि सोने, कुपोषित आणि अंधभक्त, झाड आणि हिरवळ भरले चित्र अशा परस्पर विरोधी चमत्कृतीतून किरण देशमाने यांनी आपली गझल घडवली आहे.
गणेश नरवटे यांची लेखणी ही सुंदर गझल आहे. ही लेखणी बंड करते, सरकार पाडते, गुड अपराधी झोडते, तलवार होते प्राण होते आणि मोरपिसासारखी अलवार होते, ईश्वरी अवतार सुद्धा होते. आणि ते सांगून टाकतात की,
नवे नाते पुन्हा जोडू शकत नाही
जुना संसार हा मोडू शकत नाही
गझल क्लीष्ट नाही तर सरळ, साधी आणि सोपी असू शकते याचा हा उत्तम नमूना आहे.
भोवताली अवघे विश्व असताना निवारा राहिला नाही अशी खंत आपल्या शेरातून व्यक्त करतात आणि बालपणीच्या काळ सुखाचा किती साजरा होता असे गोवर्धन मुळक आपल्या गझलेतून म्हणतात.
खेळात कुणाच्या मामाचे पत्र हरवले आहे
इथे आमच्या तर बापाचे छत्र हरवले आहे
माणूसकी झाली इथे विधवा दिसत आहे
जो तो मला हिरवा निळा भगवा दिसत आहे
असे अप्रतिम मतले लिहिणारे चंद्रकांत कदम यांची गझल माणसाला अंतर्मुख करते.
वेदना, पैसा, जाच, भावनांचे व्यवहार, काळजावरील वर, आजार आणि भांडणे कुणाला चुकली नाहीत.ही व्यथा व्यक्त करत करत प्रेम भावनेचा हळवा शेर जना घुले लिहून जातात त्या म्हणतात की,
डोळ्यात शोध माझ्या तू वाट काळजाची
भेटेल मग नव्याने ती ओढ सेम येथे
आपला भोवताल उघड्या डोळ्यांनी पाहून गझलकार शब्दांत व्यक्त होतो. जयराम धोंगडे हे एक आश्वासक नाव. हतबल परिस्थितीपुढे माणूस हात टेकतो पण गझलकार हातात लेखणी घेतो आणि व्यक्त होतो. आपल्या एका सुंदर शेरात ते लिहितात की,
येत आहे वीट मलाही या साऱ्यांचा
मिटून डोळे जे घडते ते बघतो आहे
समाजाच्या धार्मिक, सांस्कृतिक, कौटुंबिक, सामाजिक परिस्थितीचे आकलन आणि त्यावरील मार्मिक लेखन डोळस गझलकाराच्या लेखणीतून सुटू शकत नाही. आई, नवलाई, शाई, वनराई आणि मुक्ताई सुंदर काफियांमधून आपली गझल साकारणारे दिनेश कांबळे आपल्या एका अप्रतिम शेरात म्हणतात की,
धर्माच्या नावाचा कट्टर डोस पाजला जातो
धर्मासाठी रोज इथे माणूस मारला जातो
भूक आणि लालसा, प्रेम आणि वेदना, गुन्हा आणि चूक, गंज आणि संदूक अशा रुपकातून आपले शेर उजळून काढतात आपल्या लेखणीविषयी ते म्हणतात की,
मी खुबीने म्यान केले लेखणीला
व्हायचे होते तिला बंदूक माझी
एखाद्या शेरात अनेकार्थता काय असू शकते याचा अप्रतिम दाखला म्हणजे हा दिवाकर जोशी यांचा सहजसुंदर शेर होय. त्यांची शोधत राहिलो या रदिफची दुसरी गझलही अप्रतिम आहे.
आयुष्य म्हणजे या रदिफ ची दीपाली कुलकर्णी यांची सुंदर गझलही गझलयात्रीमध्ये समाविष्ट आहे. त्यांच्या गझलेतला एक शेर थेट रामायणातल्या सीतेची आठवण करुन देतो पण नव्या आशयाने गझलकारा आपला शेर खुलवितात त्या म्हणतात की,
रेषेस ओलांडून मी आले तुला भेटायला
तू कुंपणाबाहेर ये..दाखव तुझा मग कळवळा
अर्थाची अनेक वलये हा शेर निर्माण करतो ते एकट्या गझलकाराचे प्रेम राहत नाही तर त्याचे साधारणीकरण होते. प्रत्येकाला ती भावना आपली आहे. असा प्रत्यय येतो. म्हणून शेर ह्रदयाचा ठाव घेतो.
प्रेमाबरोबर चिंतनगर्भ विचारांचे शेरही गझलकाराच्या लेखणीतून सुटले नाहीत. पक्षी, पिंजरा, ग्रीष्म ऋतू, चाफा, परिमळ, चिमणी अशा शब्द संभारातून निशा चौसाळकर आपले शेर खुलवतात. एका चिंतनगर्भ शेरातून त्या म्हणतात की,
वाळूवरती एक बंगला बांधत होता वेडा
लाटेवरती तोच बंगला शोधत फिरतो आहे
वारकरी परंपरेतले अस्सल शेतकरी पंडित वराडे आपल्या सहजसुंदर गझलामधून रसिक वाचकांना मंत्रमुग्ध करुन टाकतात. कधी काळी प्रेमात तुडुंब भिजलेल्या गझलाही त्यानी लिहिल्या पण त्यांची भावपूर्ण गझल म्हणजे पांडुरंगा त्यांच्या गझलेतील एक सुंदर मतला पहा ते म्हणतात
डोळे मिटून कुठवर बसणार पांडुरंगा
केव्हा तुझ्या मुलांना बघणार पांडुरंगा
राज्ञी या टोपण नावाने लेखण करणारे गझलेतील मराठवाड्यातील एक आश्वासक नाव म्हणजे प्रज्ञा कुलकर्णी रंगांची दुनिया जड देह, दुपटे आणि पदर, इंद्रियांचे खेळ- आयुष्याची फरफट, मूर्छा- अबोलभाषा फळाफुलाचे ओझे आणि दानशुरता, पाखरांचे उडणे आणि आईची दृष्टी अशा सौंदर्यातून आपल्या गझलेला त्या मूर्त रुप देतात. त्या हाडाच्या शिक्षिका असल्यामुळे परीक्षा परिक्षक आणि क्रमांक मिळविणे या चक्रातून त्या पंढरीच्या विठ्ठलालाही सोडत नाही. त्यांचा एक सार्वकालिक अप्रतिम शेर पहा. त्या म्हणतात की
युगांचे पेलुनी ओझे कली वादात आहे
मनुष्या पिंड तर स्वार्थी तुझ्या माझ्यात आहे
आजच्या गझल संमेलनाचे उद्घाटक प्रफुल्ल कुलकर्णी यांची कलेश आणि कुरबुरी ही अल्पाक्षर रमणियत्व असणारी सुंदर गझलही गझलयात्री मध्ये समाविष्ठ झालेली आहे. फुल आणि काटा, अमंगल आणि सुमंगल, ग्रीष्म आणि सावली, भरती-ओहोटी आणि वादळे- लाटा यातूनही गझलकार आपल्या प्रेमाची वाट शोधून काढतोच आणि आपल्या भावना अभिव्यक्त करुन तो म्हणतो की,
भांडतो, चिडतो, कधी संतापतो, रुसतो जरी
होउदे माझा- तुझाही गोड बोभाटा कधी
आपल्या मराठवाड्यात एक बिंधास्त गझलकार आहे. बालाजी मुंडे हे त्यांचे नाव आहे. रदिफ विरहित असली तरी अप्रतीम शेरांमधून आपली गझल एका विशिष्ट उंचीवर गझलकाराने नेऊन ठेवलेली आहे. एका पेक्षा एक अप्रतिम शेर त्यांचे आहेत. वाणगीदाखल मला आवडलेले दोन शेर येथे ठेवतो. ते म्हणतात-
तू कष्टाचे घास खाय अन्, चल नेकीच्या वाटेवर
मला सांगुनी गेला माझा बाप भाबडा मरताना
आणि
कष्टावरती ठेवत निष्ठा जगणाऱ्यांना
मेहनतीचा कसा लागतो घास विचारा
उरात धग घेऊन जगणारे गझलकार मराठवाड्यात कमी नाहीत. त्यातीलच एक नाव म्हणजे बालाप्रसाद चव्हाण होय. आपले स्वयंभूपण त्यांनी आपल्या गझलेतून जपलेले आहे. संताच्या विचारांचा वारसा त्यांच्या शेरातून दिसतो ते आपल्या एका सहजसुंदर शेरात म्हणतात की,
नको मोह, सायास धन संचयाचे
भले होत नाही तिथे माणसाचे
उमाग्रज या टोपण नावाने लेखन करणाऱ्या गझलकाराला कोण ओळखत नाही. आपल्या नाविण्यपूर्ण खयालांतून फुलविलेल्या अनेक गझलकृती त्यांनी साकार केलेल्या आहेत. बापू दासरी हे नाव घेतल्याशिवाय मराठी गझल परिपूर्ण होणार नाही. डोळे ही त्यांची अजरामर गझल. त्यातील प्रत्येक शेर एकापेक्षा एक सरस पण वाणगीदाखल एक शेर जो आपल्याला अंतर्मुख करायला लावतो. तो आपल्यापुढे ठेवतो ते म्हणतात की,
बापाचा अर्थ कळाया जन्माचे थिजले डोळे
त्यागाचा देह चितेवर सरणाचे रडले डोळे
महेश होनमाने सारखा नवा उभरता गझलकार गझलयात्रीमध्ये आपल्याला भेटतो. सहजसुंदर अवखळ, निर्व्याज प्रेमाचे एकापेक्षा एक शेर त्यांच्या गझलेतून गुलाब होऊन दरवळतात. वेळप्रसंगी हासायलाही लावतात असाच त्यांचा एक जो सहजसुंदर शब्दांतून सुंदर खयालात रुपांतरित होतो. ते म्हणतात की,
जुन्या प्रेयसीचे समोरीच सासर
अशी वेळ येऊ नये दुष्मनावर
आपल्या सोज्वळ विचारांशी असलेली गझलकारा मीना महामुनी यांची घट्ट नाळ त्यांच्या अनेक शेरांमधून व्यक्त होते. त्याही माणसातून माणूस हरपल्यावर विठ्ठलाची वाट धरतात. हेच संत विचाराचं संचित त्यांच्याही शेरातून इथे अभिव्यक्त होताना दिसते. आपल्या एका सुंदर शेरात त्यांनी रूढच पण साधा अप्रतिम खयाल समोर ठेवला आहे त्या म्हणतात की,
नियतीपुढे कुणाचे चालत कधीच नाही
हा काळ थांबतो का मी घट्ट बांधल्याने
शिवरायाने चेतविलेल्या विचारवाटेवरून ज्यांची गझल फुलते, सत्व हरवलेला माणूस हा ज्यांच्या गझलेचा विषय आहे, अंजेड्यातली जात जाऊन सर्वधर्म समभावाची रुजवण ज्यांच्या विचारात आहे. तो मराठवाड्यातील आश्वासक गझलकार म्हणजे मोहन राठोड होय. आपल्या एका शेरात ते काय म्हणतात ते पहा-
फटतील का पुन्हा ते शब्दास या धुमारे
जाळून लेखणी अन केलेत पान कोरे
गंगाखेडच्या मातीमधून फुलणारा असाच एक मराठवाड्यातील आश्वासक गझलकार म्हणजे यशवंत मस्के. आपल्या मूल्यात्मक विचारांतून रसिकमनावर गारुड करतो आणि आपल्या गझलेतील वेगळेपण आपल्या शेरातून उभे करतो. विविधता, भारतीय, शासकीय, माननीय, चिंतनीय, रक्षनीय, प्रेक्षणीय, पूजनीय, वंदनीय निंदनीय असे एका मागून एक काफिये त्यांचे शेर खुलवत नेतात. त्यांच्या वाचन या गझलेतील वाणगीदाखल मक्त्याचा शेर आपण पाहू. या शेरात ते म्हणतात की,
हो स्वार तू श्रमावर यशवंत हो मुला तू
सिंहासनावरीही बसवेल फक्त वाचन
जितका सहज मिसरा तितका शेर रसिकाच्या जिभेवर खेळत राहतो. असाच एक सुंदर मतला आपण पाहू उन्हा शिवाय सावलीला किंमत नाही आणि वेदनेच्या गावातूनच सुखाचा मार्ग जातो. त्यामुळे या आशयाचा शेर मांडतांना रघु देशपांडे
म्हणतात की,
सावलीला ही उन्हाचा शाप घ्यावा लागतो
अन् सुखाला वेदनेचा घोट प्यावा लागतो
रत्नाकर जोशी यांच्या गझला संवादी आहेत. प्रेमही ते याच पद्धतीने व्यक्त करतात आपल्या एका शेरात ते म्हणतात की,
हो म्हण अथवा नकार दे पण..सोड अबोला
तुझ्या मनाची बेचैनी मज..बघवत नाही
राज रणधीर यांची अडगळीची खोली ही एक अप्रतिम सार्वकालिक गझल आहे. त्यांच्या गझलामधून त्यांच्या बालपणीच्या कष्टप्रद आयुष्याची, गरीबीचे चटके सहन करीत व्यतीत केलेल्या जीवनामुळे त्यांची गझल रसिक मनाचा ठाव घेताना दिसते. गतकाळातील आठवणींना ते सुंदर रुप देतात. आपल्या एकेका शेरातून आशयसंपन्न खयाल असे मांडतात की, रसिक मनाची पकड घेऊन शेर अभिव्यक्त होतात. अशाच एका शेरातून त्यांनी खंत व्यक्त केली आहे-
सत्य हे उशिरा कळाले आपले नाही कुणीही
मी स्वतःचा राहिलो का आरसा निरखून बघतो
कधी थांबायचं आणि कधी निघायचं याचं गणित त्यांना बरोबर जमतं म्हणून भिन्न भिन्न खयालांच्या त्यांच्या गझलकृती रसिक मनाचा ठाव घेतात. जे कधी विसरत नाही ते सदा आठवतात. ज्यांचे खयाल विविधतेच्या आणि परिवर्तनाच्या झोतभट्टीतून शेकून निघतात ते आर. के. आठवले आहेत. जे कधी विसरलेच नाहीत त्यांना आठवले कसे म्हणायचे. संविधान-उतरंड, लोकशाही- विषमता, उपासी घरे-महाल अशा प्रतिमानांच्या खयालांतून त्यांची गझल फुलत जाते एका शेरात ते म्हणतात की,
मला घेर आता तिमीरा कितीही
उभा मी स्वतःच्या प्रकाशात आहे
जगण्याची जिद्ध, खुमारी, संकटांना धीराने तोंड देण्याचे सामर्थ्य त्यांच्या लेखणीत ओतप्रोत भरलेले आहे. प्रेम व्यक्त करणारे त्यांचे खयाल गझलेत विविधता निर्माण करतात. अनेकार्थता हा तर त्यांच्या शेराचा गुणधर्मच जणू. त्यांच्या एका गझलेचा मक्ता बघा-
केवढे ती खाचखळगे पार करते
सागराची ओढ सरिता फार करते
राना दौड यांची गझल बदलत्या गावगाड्याचची व्यथा आणि बदलत्या काळाचे बदल टिपते. जातीभेदाच्या भिंती त्यांनाही इतर गझलकारांप्रमाणेच अस्वस्थ करुन टाकतात. त्यातल्या एका शेरात ते म्हणतात की,
जात चोरी जात आहे जर उजेडा मधे
त्याच साठी रात्रभऱ जागायला पाहिजे
स्त्रीयांच्या वाट्याला येणारा भोगवटा रेणुका जोशी यांच्या अनुभवातूनही सुटला नाही. या स्त्रीत्वाच्या व्यथा त्याच्या गझलेचा विषय बनतात. कुटुंबातील माय लेकीचं दुःख संवादी पद्धतीने शेरातून गझलकार व्यक्त करते आहे. पशु पक्षी, भोवतालचा निसर्गही त्यांना आकर्षित करतो आणि भूक हा तर त्यांच्या शेराचा स्थायीभाव वाटतो त्या लिहितात-
चित्र काढले कुणी घराचे कुणी फुलाचे
उपासपोटी रेखत बसले भाकर कोणी
मानसांचे मन कितीही जाणिवा नेणिवांच्या पलिकडे गेले तरी माणसांचा स्वार्थ सुटत नाही हे दाहक सत्य रोहिणी पांडे यांनी आपल्या गझलेतून मांडले आहे स्त्री ही दास्यातून सुटली नसून ती अधिकच गुंतत जाते आपल्या एका शेरातून त्यानी वर्तमान समाजाची मानवी भावना व्यक्त केलेली आहे. आपल्या एका शेरात त्या म्हणतात की,
जाणिवांना नेणिवांनी जाणल्यावर शेवटी
एक इच्छा का नव्याने मग फळाया लागली
प्रेम आणि आई हे कवितेप्रमाणेच गझलेतील अनंत विषय आहेत. प्रेमात त्या जीवनाच्या या घडीवर उभ्या आहेत की, राग आणि अनुराग त्यांना सारखा वाटतो आहे. गझलकारा लता मुकुंद जोशी यांनी माझी आई ही एक भावपूर्ण गझल लिहिलेली आहे. आईचे कुशीत वावरणे, साखरेगत विरघळणे, दुःखातून सावरणे यातून सशक्त खयाल त्या उभे करतात. या गझलेतील सुंदर मतल्यात त्या म्हणतात की,
आई झाल्यावरती मजला कळली माझी आई
कळल्यावरती आईला गहिवरली माझी आई
जीवनातील अनेत चढ उतार वंदना केंद्रे बांगर आपल्या गझलेतून मुखर करतात. कदाचित भोगलेल्या कडुगोड अनुभवांची शिदोरी त्या रसिकांसमोर उघडी करतात . बाबा, दिंडी, माय, भूक या प्रतिमांतून त्यांचे शेर फुलतात. त्यांचा मतल्याचा एक अप्रतिम शेर पहा- त्या म्हणतात-
मनाच्या बंद दारावर किती आले किती गेले
तुझ्याआधी तुझ्यानंतर किती आले किती गेले
काटे आणि मराठवाडा या दोन ठळक गझला ज्यांच्या आहेत ते साहिल या टोपणनावाने लेखन करणारे मराठवाड्यातील एक गझलकार विजय वाठोरे हे आहेत. काट्यांची इतकी हळुवार आणि विविध रुपे जाणून घ्यायची असेल तर त्यांची गझल नक्की वाचा. मराठवाड्यातील माणसाची व्यथा आणि कथा विविध खयालांमधून अप्रतिम त्यांनी साकारलेली आहे. लढणे आणि संघर्ष करीत जगणे हा मराठवाड्यातील माणसाचा स्वभाव आहे हेच त्यांनी मतल्यातून अधोरेखित केलेले आहे. ते म्हणतात की,
लाखो विवंचनांशी लढतो मराठवाडा
जोशामध्ये तरीही जगतो मराठवाडा
गझलेचा स्थायीभाव प्रेम हा आहे आणि तोच स्थायीभाव आपल्या वैविध्यपूर्ण प्रेमाचा विषय विजय धोबे व्यक्त करतात. गझलकाराने प्रेमाची केलेली चूक मान्य करुन कशी कशी चूक केली हे शेरांमधून साकार केले आहे. प्रेमातून ते गंभीर होतात आणि दोन ओळीत जीवनाचा सारांश मांडतात. आपल्या एका अप्रतिम शेरात ते म्हणतात की,
मातापित्यात मित्रा आहेत धाम चारी
दाही दिशा उगाचच धुंडाळतो कशाला
परिस्थितीशी समर्थपणे तोंड देत वस्तुस्थितीचे सजग भान प्रा. विद्या देशमुख आपल्या गझलेतून देताना दिसतात जगात सुखाबरोबर दुःख असणारच त्याच बरोबर आपल्या अडचणींवर मात करुन आपल्या पायावर भक्कमपणे उभी राहणारी सबला स्त्री इथे उभी राहताना दिसते आहे. आपल्या एका शेरात त्या म्हणतात की,
जर देव मान्य केला वसतो जगात आहे
अस्तित्व ही भूतांचे असणार त्यात आहे
मराठवाड्यातील आणखी एक मराठी गझलेतील आश्वासक नाव म्हणजे शंकर माने हे होत. गझलेतील शेराचा उला मिसरा आणि सानी मिसरा कसा असावा याचा उत्कृष्ठ नमुना म्हणजे त्यांची गझल आहे. उल्यातल्या प्रस्तावनेनंतर सानीतला विस्तार लक्षणीय मांडलेला आपल्याला दिसेल. सावली- ढगाने दिली, पर्वणी-ईश्वराने दिली, योग्यता- शिक्षणाने दिली, झुंजण्याची कला- सागराने दिली, शंकराला मती सद्गुणाने दिली असे ते म्हणतात. दिवाळी ही दुसरी गझलही वैविध्यपूर्ण खयालांनी भरलेली आहे. त्यांचा मला आवडलेला एक शेर आपल्या पुढे ठेवतो. बघा-
गर्भामधल्या त्या पणतीची नकोच हत्या
अज्ञानाचा तिमिर सारुनी करू दिवाळी
गझलकार शंकर बावणे यांचे अवघे जीवनच व्यथा वेदनांनी पोळलेले आहे. माणसाला धड नेटकी चाकरी सुद्धा मिळत नाही. सर्व शैक्षणिक अर्हता मिळवूनही ही व्यवस्था त्याला पक्की नोकरी देऊ शकत नाही. शेतकऱ्यांच्या गरीब कुटुंबात जन्मलेला हा गझलकार व्यवस्थेविरुद्ध खवळून उठतो. आपल्या एका शेरात तो म्हणतो की,
आम्हांस ना मिळाली कुठलीच योजना
त्यांनी मिळून सारे अनुदान लाटले
गझलेतील छोटा बहर जसा सर्वांना नीट हाताळता येत नाही तसाच मोठा बहरही नीट जमेलच याची शास्वती नसते मात्र इथे डॉ. शुभांगी कुलकर्णी यांनी गझलेतील मोठा बहर आपल्या समर्थ बाहूंनी यशस्वी रित्या पेलला आहे. भावना, कल्पना आणि विचार या त्रिसूत्रीतून त्यांची गझल फुललेली दिसते. कल्पनेच्या जगातून भावनांना वाट करुन देत फुलणारा विचार हा त्यांच्या गझलेचा गाभा आहे. आपल्या एका अप्रतिम शेरातून हा चिंतनगर्भ खयाल त्यांनी माडलेला आहे. त्या म्हणतात-
जरुर पेटवा जातीसाठी दंगल पण ध्यानात असू द्या
रंगबिरंगी रक्त तुम्हाला बँक कधीही पुरवत नाही
दुःख कुणाच्या वाट्याला येत नाही. पण त्या दुःखाचा सामना कोणी करतो कोणी हतबल होऊन हरतो पण इथे मराठवाड्यातील प्रथितयश गझलकार शेखर गिरी दुःखही खुशीत गात राहतात. घर, माणसे, निवारा काही नाही मिळाले तरी सुखात राहण्याची अवस्था गझलकाराने प्राप्त केलेली आहे. हे मतलबी जग आहे. गोड बोलून पोखरतात, फुले दाखवून काटे अंथरतात, पंचासोबत हातमिळवणी करतात, चांगली कामे करणाऱ्यांना गुन्ह्यात अडकवतात, पद्धतशीर माणसे वापरले जातात असे बदलत्या काळाचे समाजवास्तव आपल्या नाविण्यपूर्ण खयालातून गझलकार साकारताना दिसतात. आपल्या एका शेरात ते म्हणतात की,
कुणी न ओळके मला न मी कुणास जाणतो
तरी गझलमुळेच मी मनामनात राहिलो
जगात कितीही फिरुन आले तरी आपली विसाव्याची हक्काची जागा म्हणजे आपली सहधर्मिणी, सखी, प्रिया वगैरै वगैरै.हलक्या फुलक्या नितळ प्रेमातून सुप्रसिद्ध गझलकार संजय तिडके यांची फुलत जाते .हो दोघातील संवाद खोलवर चालत राहतो. शेतकरी हा देखील त्यांचा आस्थेचा विषय. त्याचे दैन्य त्यांनी मांडले. प्रेमाची मांडणी करता करता समग्र स्त्रीचे समाजातील स्थान, तिचे दैन्य, वर्तमानातील तिची असुरक्षितता गझलकाराच्या नजरेतून सुटत नाही. आपल्या एका सुंदर शेरातून ते लिहितात की,
गोड करूया मिळून दोघे दिवस आजचा
नकोस काढू उगीच आता विषय कालचा
भूतकाळाच्या दुःखाबद्दल हळहळ व्यक्त न करता आणि भविष्यकाळाची व्यर्थ चिंता न करता हातात असलेला वर्तमानाच क्षण सुखाने जगून गोड करूया इतकं साधं पण जगण्याचं शास्वत आणि वैश्विक मूल्य गझलकाराला गवसलेलं आहे.
जीवनातलं दुःख हलकं करण्याचा उपाय म्हणजे गझल, हे मर्म सय्यद चाँद तरोडकर यांना सापडलेलं आहे.
मानसाने फळाची अपेक्षा न करता कर्म करीत रहावे हे गीतेचे सारतत्व जणू सय्यदच्या लेखणीत अलगत उतरले आहे असे वाटते. व्यर्थ अपेक्षा आणि आशा न करणे, द्वेष काळजी ईर्षा चिंता सोडणे, गुपचूप मनातल्या मनात अश्रू ढाळणे, हे सय्यद च्या गझलेचे विषय आहेत. त्यांचा एक अप्रतिम शेर असा की,
विझला नसेल बहुदा वणवा मनातला
ठिणगी हळूच असते पाळत कधीतरी
कालीदासाच्या कलात्मक सौंदर्यमूल्यांना जोपासत आपली नवी मळवाट शोधणारा मराठवाड्यातील प्रसिद्ध बासरीवादक, चित्रकलावंत, कवी आणि मूल्यात्मक शेर लिहिणारा गझलकार म्हणजे साईनाथ फुसे होय. सौंदर्याची कलात्मक परिमाणे, चित्रमय शैली आणि निसर्गावर निस्सीम प्रेम करणारे शेर लिहिणारा गझलकार आहे हा. आकाश, चांदणे, ऋतू, वसंत, आसमंत, जातीवंत, मूर्तीमंत शब्दांना त्यांनी हाताळलेले आहे. त्यांचा एक प्रेम सागरात ओतप्रोत आकंठ भिजलेला एक शेर पहा-
नकोस देऊ बहर मनाचा कहर गुलाबी ओठांचा
दोष निलामी स्वप्नांचा बघ येईल काजळावरती
समाजात वावरताना माणसांचे वर्तन कसे असेल हे कुणीच कयास बांधू शकत नाही. हाही गझलेचा एक सुंदर विषय होऊ शकतो . हे सिद्धेश्वर इंगोले यांची गझल वाचली की लक्षात येईल. मुखवटे आणि चेहरे, कासव आणि ससा पाऊस आणि चातक, अंधार आणि कवडसा, कर्णाचे दानशुरत्व हे विविध विषय आपल्या शेरातून ते लिलया पेरतात. काटे, शेत, तळे हे ही त्यांच्या गझलेचे विषय आहेत. मानवाच्या अनिश्चित स्वभावाविषयीचा त्यांचा बोलका मतला पहा. ते लिहीतात की,
आजही मी असा काला होतो जसा
देत नाही उद्याचा तुला भरवसा
ज्यांचे वास्तव्य प्रामुख्याने महाविद्यालयाच्या ग्रंथासमवेत असते, ज्यांचे मन प्रामुख्याने कवितेत आणि अधिक प्रमाणात कथेत रमते त्या नव्या पिढीच्या आश्वाशक गझलकारा प्रा. सुनीता गुंजाळ- कवडे. शेरातील विविधता हा त्यांच्या गझलेचा स्थायीभाव. प्रामाणिकपणा हा त्यांच्या लेखणीतही पाझरलेला दिसून येतो. मुलींची शाळा- ह्रदयातली गर्दी, शेरातली जादू आणि मैफिल, कुंकु आणि बुक्का, सभोवताले भयान वास्तव , अस्वस्थता, माणसांचे दुभंगलेपण, स्त्री जीवनाची व्यथा त्या साकार करतात. एका वास्तव शेरातून त्या म्हणतात की,
पाझर फुटला प्रेमाला ती गेल्यानंतर
मेल्यानंतर ताज बांधला कोण पाहते ?
प्रेम हा चिंतनाचा, चिंतेचा, गझलेचा विषय कुणासही वर्ज्य नाही. मग तो असो की ती असो. इथे हेच विविध विषयावरील शेर सुवर्णा मुळजकर यांनी आपल्या अलवार लेखणीतून साकारलेले आहेत. माझ्या लेखणीतून कोवळी ओळ अंकुरावी अशी माफक अपेक्षा त्या येथे करतात. वेदना ही त्यांची एक सुंदर गझल आहे. जीवनभर या वेदना त्या सहन करीत आहे. सहनशीलता हा स्त्रीचा गुणधर्मच जणु. वेदना वाढून इतक्या होतात की, जेव्हा पाऊस थैमान घालतो तेव्हा या वेदना शेतात रुजून येतात. असे त्या आपल्या शेरातून व्यक्त होतात. पुढे त्या म्हणतात की,
सोडून साथ जाती स्वार्थात माणसे
हातात हात तेंव्हा देतात वेदना
सोपान डोके हा शेतीमातीशी नाळ असलेला अस्सल वेदनाकार आहे. साधेपणा हे त्याच्या गझलेचे वैशिष्ट्य आहे. ईश्वरापाशी सर्व समान असल्याची प्रांजळ निखळ भावना. माणूस मुळात सर्व दुःखाचे, भेदभावाचे मूळ असून वर्तमान जीवनाचे भयान वास्तव नम्रभावाने गझलकार आपल्या लेखनीतून व्यक्त करीत आहे. प्रश्नात्मकता हाही एक त्यांच्या गझलेचा विशेष आहे. आपल्या अशाच एका शेरातून ते म्हणतात की,
पेरलेल्या या पिकाला भाव आहे का ?
शेत कसणे हा जुगारी डाव आहे का ?
ज्यांच्या गझलेतून स्नेह पाझरतो, वैविध्यपूर्ण खयालातून ज्यांच्या लता, वेली फुलतात, पूर्वार्धातील प्रस्तावनेला उत्तरार्धात अफलातून कलाटणी देतात, दृष्टीपलीकडची दृष्टी असेल तर गझलकार स्वतःची रुढ वाटेऐवजी नवी वाट निर्माण करतो आणि आपल्या लेखणीचे अमृतकण वाटत जातो. इथेही नेमका हा अनुभव स्नेहलता झरकर- अंदुरे यांच्या गझल वाचताना येतो. आपल्या एका वैविध्यपूर्ण खयालाच्या मतल्यातून त्या लिहितात की,
येत नाही पूर आता पापणीला
बांधल्या आहेत इच्छा दावणीला
समकालीन नात्याचे दुभंगलेपण त्या व्यक्त करतात. जेष्ठ माता पित्याचे शेवटी काय हाल होतात याचे भयान वास्तव त्यांनी आपल्या शेरातून उद्धृत केलेले आहे. त्या म्हणतात –
पाडले हिस्से धनाचे वारसांनी
माय आली लाडकीच्या वाटणीला
डोळ्यांना आणि प्रेमात गुंतले मी या दोन गझला ज्यांच्या आहेत त्या डॉ. स्वाती भद्रे आकुसकर . अलवार प्रेमाच्या हळुवार भावगझला लिहिणे हा ज्यांचा स्थायीभाव वाटतो. त्या गझलकारा उन्हाच्या, काजव्याच्या, दवाच्या, मुलाच्या, फुलाच्या आणि सागराच्या प्रेमात गुंतताना दिसतात. प्रेम म्हटले की डोळे आले आणि डोळ्यावर कितीही कविता आणि गझला आल्या तरी त्याचे नित्यनुतनत्व कमी होताना दिसत नाही मात्र त्यात सकसपणा पाहिजे. ती ताकद डॉ. स्वाती यांच्या शेरामध्ये आहे. असा एक अलवार आशयाचा प्रेमरसात चिंब भिजून निघालेला शेर पहा-
स्पर्श ओठांचा हवा अलवार डोळ्यांना
वेगळा कुठला नको श्रृंगार डोळ्यांना
गझलयात्री 4 चा प्रवास जिथून सुरु झाला ती ‘दाद’ लिहिणारे मराठवाडा विभागीय गझल संमेलन जालनाचे संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी त्यांच्या गझलानेच शेवटी हे गझलयात्रीच्या प्रवासाचे वर्तूळ पूर्ण झालेले आहे. आपल्या एका समकालीन वास्तवात तग धरून आपल्या पायावर भक्कमपणे उभ्या असलेल्या एका जिद्दी, आत्मविश्वासू मनाची अथांगता आपल्या शेरातून पेरतात. त्यांचा असाच एक सहजसुदर शेर पहा-
जमिनीवरीच माझ्या आहेत पाय माझे
करणार वाकडेही आभाळ काय माझे
ही वेळ येण्यासाठी पुलाखालून बरंच पाणी जावं लागतं असंख्य उन्हाळे पावसाळे झेलावे लागतात. गझलेची अविरत साधना करावी लागते अनेक वाटावळणांचे खडतर अडथळे पार केल्यानंतर त्यानंतर कुठे अशा भावनेचा एखादा शेर जन्माला येतो. तो रसिक मनाला व्वा क्या बात है…असे गुणगुणायला लावतोच…
आयुष्यातील ताणतणाव, चढऊतार ते आपल्या शेरातून मुखरित करतात. नाविण्यपू्र्ण खयाल, साधेपणा हे त्यांच्या गझलेचे वैशिष्ट्य आहे. शारिरीक वाद संवादापेक्षा माणसिक अंगाने त्यांची गझल अवतरताना दिसते भव्यता, शालीनता, सोज्वळता आणि वैश्विकता ही काही वैशिष्ट्ये त्यांच्या गझलेची सांगता येतील. आपल्या एका शेरातून ते म्हणतात की,
तू दिवसाच्या चैतन्याची सुंदरता
मावळतीच्या सौंदर्याची जाग जणू.
या शेराने या गझलयात्रीची या अंकापुरती यात्रा थांबलेली आहे.
गोवर्धन मुळक



0 Comments