Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

दसरा विशेष Gazal Manthan

🌿🍂☘️🍁🌿🌾🌼🍁🍀🍂☘️🌴🌲

🟣 दसरा विशेष 🟣

🌿🍂☘️🍁🌿🌾🌼🍁🍀🍂☘️🌴🌲



🌿🍂☘️🍁🌿🌾🌼🍁🍀🍂☘️🌴

 

🌷कथा आसवांच्या🌷


कहाण्या किनारी किती भावनांच्या

तळी सागराच्या कथा आसवांच्या


इथे एकटी काय बोलू मनाशी

कुणाला कळेना व्यथा वेदनांच्या


सखा दूर माझा कशी भेट घ्यावी

उसळतात लाटा मनी आठवांच्या


उभा जन्म गेलाय वाळूत माझा

जिथे माय रचते विटा त्या घरांच्या


किती साचलेले असावेत अश्रू 

पहा ओल भिंतीत वृद्धाश्रमांच्या


दिखाव्यात तर व्यस्त असतात नेते

कधी मोडल्या का घड्या कापडांच्या


नका बोल लावू कुणी लाडकीला

निखळल्या सरीं जर तिच्या लोचनांच्या


मृणाल सुनिल गिते


 🌷कुणीच नसते गेल्यानंतर🌷


भेटी अपुल्या घडू लागल्या ठरल्यानंतर

शपथा खोट्या ठरू लागल्या लग्नानंतर 


दुःख मनाचे लपले आता हसल्यानंतर 

नकळत आले अश्रू ,डोळे मिटल्यानंतर

 

तुझाच आहे  जन्मोजन्मी वचन द्यायचा

येशील पुन्हा मागे... बघ तू फिरल्यानंतर


गेलास पुढे कशी एकटी, मागे उरले 

आठवणी का छळू लागल्या ठसल्यानंतर


तुझ्याचसाठी सांधत होते हृदय सदा मी

झाल्या जखमा उगा मोजते तुटल्यानंतर


पिल्लांसाठी जगते आणिक उभी राहते

पुन्हा पुन्हा ती जिंकत असते हरल्यानंतर


कुठे जायचे मला कळेना रडल्यानंतर

वाट पाहते तिथेच अजुनी फसल्यानंतर


आस मनाची संपत जाते तुटता तुटता

 घर कोसळते पाया त्याचा खचल्यानंतर


सगे सोयरे कुणीच नसते गेल्यानंतर

उडून जाते राख चितेची, विझल्यानंतर 


सौ मृणाल सुनिल गिते



🌿🍂☘️🍁🌿🌾🌼🍁🍀🍂☘️🌴🌲


 🌷सोडून जा🌷


आता वसंतातील हा सारा बहर सोडून जा

ग्रीष्मातला चटका नको तर हे शहर सोडून जा


उध्वस्त होताना घरे केलेस बाळा पोरके 

झोळीतल्या बाळाकडे हळवी नजर सोडून जा


घायाळ झालो कैकदा विष पचवले प्रेमातले

आता प्रिये दंशातले उरले जहर सोडून जा 


वाडा महालातील गेली शान  उरली झुंबरे

थांबू नका रे पाखरांनो ही सदर सोडून जा 


वेशीवरी डोळे कधीचे वाट बघती सैनिका

येतोय मी या बातमीचीही लहर सोडून जा


डॉ. तरुजा भोसले- वळसंगकर


🌿🍂☘️🍁🌿🌾🌼🍁🍀🍂☘️🌴🌲


🌷 नवा अवतार 🌷


तिला छळले समाजाने घराला भार झाली ती

जिवाचे रान करताना कधी आधार झाली ती


भुईची तापता माती जलाची धार होते ती

मनाच्या उंच आकाशी उडाली घार झाली ती


व्यथांना घेत खांद्यावर किती झुंजार बनली ती

जगावर राज्य करणारी अता तलवार झाली ती


धुराने जन्म गुदमरला कळांनी श्वास थांबवला

कुणाला दिव्य ते दिसले? परंतू पार झाली ती


विचाराने किती भक्कम तिने केले स्वतःहाला

घराच्या मंदिराला बघ नवा अवतार झाली ती


मीना अ. महामुनी

धाराशिव




🌿🍂☘️🍁🌿🌾🌼🍁🍀🍂☘️🌴🌲


 🌷फुलासारखी फुलतेस बाई🌷


सुगंधात घरटे सजवतेस बाई

फुलासारखी रोज फुलतेस बाई


कथा होत मोठी प्रगटतेस बाई

नवे बीज पोटी रुजवतेस बाई


व्यथा सोसण्याची लपवतेस बाई

स्वतःला जगाला फसवतेस बाई


किती भूमिका तू वठवतेस बाई

खरी तारका तू झळकतेस बाई


विजेच्या प्रमाणे चमकतेस बाई

दिवा होत अंधार गिळतेस बाई


सौ.अर्चना मुरुगकर

तळेगाव दाभाडे




🌿🍂☘️🍁🌿🌾🌼🍁🍀🍂☘️🌴🌲


 🌷खुशाल ती🌷

      

परंपरेच्या तोडत बेड्या  पळते आहे खुशाल ती 

नव्याजुन्याचा संगम सांधत जगते आहे खुशाल ती


सौदर्यावर भिकारणीच्या नजर वाकडी  भिरभिरते

अंगावरती शेण थापुनी फिरते आहे खुशाल ती 


आकाशाला एक गवसनी  घालावी का म्हणते ती

दुबळी नाही धाडस मोठे करते आहे खुशाल ती  


दारिद्र्याचा शाप झेलते करुनी  मांडा कोंड्याचा 

कोसत नाही आयुष्याला हसते आहे खुशाल ती 


तारेवरची कसरत नुसती प्रश्न खुबीने सोडवते

तहात असते, शर्त चुकीची हरते आहे खुशाल ती 


सौ. किरण संजय देशमाने



🌿🍂☘️🍁🌿🌾🌼🍁🍀🍂☘️🌴🌲


🌷 ती 🌷


कधी आधार झालेली

कधी ती भार झालेली


उन्हाच्या तापत्या प्रहरी 

मृगाची धार झालेली


कडी कुलुपात मावेना

नभीची घार झालेली


जिवाची निर्मिती केली

पदाच्या पार झालेली


व्यथा जिंकून हिमतीने 

जगी झुंजार झालेली


सौ. सुवर्णा व्यंकट मुळजकर



🌿🍂☘️🍁🌿🌾🌼🍁🍀🍂☘️🌴🌲


 🌷 ना कुणा सांगायचे 🌷


स्वप्न सारे भंगणारे, ना कुणा सांगायचे ?

भाव सारे दाटणारे ना कुणा सांगायचे...!


वेदनेचे भास हृदयी, घेत का मिरवायचे

दु:ख सारे साठणारे , ना कुणा सांगायचे...?


सांगुनी शल्ये कुठेही, का कुणा रडवायचे...,

अंतरीचे टोचणारे, ना कुणा सांगायचे...!


तारण्याची,  मारण्याची, पद्धती आली अता

राजकारण भोवणारे, ना कुणा सांगायचे...?


कष्टणाऱ्या बांधवांच्या, दाबलेल्या वेदना

शब्द वाचा फोडणारे, ना कुणा सांगायचे...!


रोज मिळतो मार त्याचा, पोसते संसार का/ती

नशिब झाले कोंडणारे, ना कुणा सांगायचे...!


लाभला गाता गळा मज का कुणा ना साहवे

सूर उंची गाठणारे ना कुणा सांगायचे 


डॉ. तेजस्विनी अनिल कदम

"रत्नप्रभा" नाशिक





🌿🍂☘️🍁🌿🌾🌼🍁🍀🍂☘️🌴🌲


 🌷सुखांना छळतात वेदना🌷


का भळभळून इतक्या येतात वेदना

पडल्यात काय माझ्या प्रेमात वेदना


मी मारल्या तरीही वेताळ भूत त्या

माझ्या बरोबरीने जगतात वेदना


माझ्याच पाचवीला का पूजल्या सटीने

जन्मास सात माझ्या पुरतात वेदना


मी हिंडते स्वतःला शोधत चहूकडे

दारासमोर माझ्या गातात वेदना


मी सोयरीक जपते हसुनी तिच्यासवे 

म्हणुनीच घट्ट रुळते माझ्यात वेदना


दारात ओळखीचे येतात चेहरे अन्

ताज्या पुन्हा नव्याने होतात वेदना


इतक्यात जाणिवांनी केला मला खुलासा

स्वप्नातही सुखांना छळतात वेदना


आशा साळुंखे जळगाव





🌿🍂☘️🍁🌿🌾🌼🍁🍀🍂☘️🌴🌲


 🌷मागे सोडला मी🌷


भोगलेल्या  वेदनांचा गाव मागे सोडला मी

जीवघेणा वार होता  घाव मागे सोडला मी


चेहऱ्यावरची निराशा हारताना पाहिली अन्

त्याचसाठी जिंकलेला डाव मागे सोडला मी


मुखवटे चढवून येथे चोर विकतो रोज विषही

अमृताला  तारणारा  साव मागे सोडला मी


कोंडलेल्या भावनांना मुक्त मी केले जरा अन्

पूर अश्रूंचा इथे भरधाव मागे सोडला मी


मीच माझ्या वेदनेला घेतले कवटाळुनी अन्

ठाव घेण्याचा सुखाचा आव मागे सोडला मी


डॉ सौ. मानसी पाटील



🌿🍂☘️🍁🌿🌾🌼🍁🍀🍂☘️🌴🌲


🌷आद्यरूपी गौतमी🌷


भेटते सारे कुणाला जे हवे ते नेहमी

ठेवणे असते मनाला शांत अगदी संयमी


केवढी दिसतात नाट्यातील पात्रे बोलकी

पण खऱ्या जगण्यात असते प्रेमभावाची कमी 


आत आहे गाज मोठी आर्त सागर बोलला 

संथ त्याने राहण्याची द्यायची का मग हमी? 


घट्ट कर तू मूळ वृक्षा हो जरा कणखर उभा 

ध्वस्त करते सर्व काही धूर्त वारे मोसमी 


घेत जाते श्वास माती तृप्त होते काहिली

रानभर पाऊस फिरतो गोड देते बातमी


पिंजऱ्याला तोडणे नाही तुला जमणार या

जन्मभर कवटाळणे खोट्या सुखाची बेगमी


गर्द काळोखास भेदत मार्ग दाखवते पुढे

आदिमाया आदिशक्ती आद्यरूपी गौतमी


सौ. सोनल मनोज गादेवार

यवतमाळ



🌿🍂☘️🍁🌿🌾🌼🍁🍀🍂☘️🌴🌲


 🌷उपभोग श्रावण एकदा

🌷


आनंद नाही जीवनी पण विसर ते क्षण एकदा 

वेचून घे सौख्यास तू,  उपभोग श्रावण एकदा


कायम कसे हृदयास या काटे मिळाले बोचरे

सलत्या मनाचा कोपरा, तो बंद कर खण एकदा


आहे किती आयुष्य हे, झेलून घे झोळीत तू 

फेकून दे जे होत आहे भार, दडपण एकदा


जे पाहिले होतेस तू, ते स्वप्न गेले भंगुनी

आघात अन् त्या वेदनांशी मांड भांडण एकदा


सुनसानशा मोठ्या घराचे एकलेपण साचते

कुंडीत सुद्धा फूल फुलते मान्य कर पण एकदा


रागावणे, धुसफुसणे, अन् सोसणे आहे तरी

जे जे मिळाले जे तुला ते आपले म्हण एकदा


वैजयंती आपटे




🌿🍂☘️🍁🌿🌾🌼🍁🍀🍂☘️🌴🌲


 🌷संपन्न व्हावा एक सुंदर सोहळा🌷


संपन्न व्हावा आत माझ्या एक सुंदर सोहळा

प्रत्येक इच्छेच्या नव्या सोसेन मी प्रसुतीकळा


जगले कुणासाठी कळेना आजवर माझे मला

माझा म्हणाले ज्यास तो गेला कुठे गोतावळा ?


कोठून आले ? अन् कुठे जाणार हे कळते कुणा ?

आयुष्य म्हणजे फक्त नियतीचा असावा सापळा


लाथाडले होते तिला मी पण तरी गेली कुठे

हट्टी व्यथेचा लागला का आपल्यालाही लळा ?


वेडेपणाचा तर कळस झाला म्हणाले जग मला

प्रेमात जेव्हा सोसल्या मी फक्त रणरणत्या झळा


माधुरी डोंगळीकर

पुणे


🌿🍂☘️🍁🌿🌾🌼🍁🍀🍂☘️🌴🌲


 🌷आरशाला विचारून बघ तू🌷



खऱ्या चेहऱ्याला तपासून बघ तू

पुन्हा आरशाला विचारून बघ तू


दिली आसवे पोटच्या लेकरांनी

तिच्या वेदनांना सुखावून बघ तू


मलाही भिजूदे तुझ्या सोबतीने

जरा पावसाला पुकारून बघ तू


दिमाखात दिसणार आभाळ सारे

कधी चांदण्यांवर विसावून बघ तू


दिखावा कशाला हवा भावनांचा

उरातील जखमा हिरावून बघ तू


प्रणाली म्हात्रे

मुंबई



🌿🍂☘️🍁🌿🌾🌼🍁🍀🍂☘️🌴🌲


 🌷खंत पानगळीची कशाला🌷


खात्रीने जर वसंत येतो बहरायाला

खंत उगा मी पानगळीची करू कशाला 


झोपडीत या मला भेटला स्वर्ग सुखाचा 

हवेलीत त्या कशास शोधू आनंदाला 


गरीबाघरची लेक जरी ती घरपण जपते 

नको दिखावा श्रीमंतीचा संसाराला 


आत्मज्योत ही संस्कारांची तेवत असता 

नको घाबरू अज्ञानाच्या अंधाराला 


प्राजक्ताची क्षणभंगुरता मी अनुभवली 

अन जगण्याचा अर्थ नव्याने मला कळाला

 



कांचनगंगा मोरे

काक्रंबा ता. तुळजापूर


🌿🍂☘️🍁🌿🌾🌼🍁🍀🍂☘️🌴🌲


🌷 कैकदा 🌷


ओचकारे कैक उठले या मनावर कैकदा

अन् उमटले वळ निळे या काळजावर कैकदा


जाळली होती दुकाने अंधश्रद्धेची जरी

घातला त्यांनीच घाला माणसांवर कैकदा


हात माझा सोडताना कंठ होता दाटला

अन् उशी ही चिंब झाली आठवावर कैकदा


काळजाच्या आत सुंदर विठ्ठलाची पंढरी

नाचले आहे विठूच्या किर्तनावर  कैकदा


घार फिरते उंच पण का लक्ष खाली सारखे

जीव ओवाळून जाते ती पिलांवर कैकदा


मेहमूदा शेख 

'गुलपरी' श्रीक्षेत्र देहूगाव पुणे



🌿🍂☘️🍁🌿🌾🌼🍁🍀🍂☘️🌴🌲


🌷चकाकते ते सोने नसते🌷


छंद आपला जपण्यासाठी तिला मोकळी दुपार आहे 

वाट पाहते आतुरतेने कोपऱ्यातली सतार आहे 


आता माझी शंका नाही तुझ्या कोणत्या प्रश्नासाठी 

मतभेदाला नाही थारा केला आपण करार आहे 


डोंबाऱ्याची चाले कसरत तोल साधुनी दोरीवरती 

अस्थिरतेच्या संसाराचा किती अनोखा थरार आहे 


आपमतलबी जग हे झाले शेजारीही माहित नाही 

जो तो जगतो स्वतःचसाठी किती बदलला विचार आहे


चकाकते ते सोने नसते असली नकली कळतच नाही 

खऱ्या गुणांना पारखणारा कोण एवढा हुशार आहे 


सौ माधुरी बर्वे



🌿🍂☘️🍁🌿🌾🌼🍁🍀🍂☘️🌴🌲



     🌷मानवतेला जपण्यासाठी🌷    


आहे शक्ती माझ्यामध्ये अन्यायाशी लढण्यासाठी 

जगा जगू द्या तत्व मानते मानवतेला जपण्यासाठी


पेलत असतो इतरांचे तर खांद्यावरती ओझे आपण

वरचढ झाल्यावरती जोखड धडपड करतो सुटण्यासाठी.


संस्काराचे कुंपण सद्या झुगारले तू प्रगतीसाठी 

कुणी कुणाचे उरले नाही जगात सांत्वन करण्यासाठी


मोह टाळणे कठिण तरीही संयम ठेवू अता मनावर

जंकफूड टाळूया आपण आरोग्य अता जपण्यासाठी 


गावाकडचा पार रिकामा वृध्द एकटे घरी राहिले 

तरुणाईने शहर गाठले पोट आपले भरण्यासाठी




प्रा. मानसी मोहन जोशी

ठाणे प.




🌿🍂☘️🍁🌿🌾🌼🍁🍀🍂☘️🌴🌲



🌷 साधीच अक्षरे 🌷


खोटे नकोच आहे, बोलायचे खरे
पाहू नको मुखवटे, तू वाच चेहरे

पाषाण काळजाचा, असतो बघा कुणी
त्याला कसे कळावे , ह्दयातले झरे

शब्दांमधील ताकद, समजून घे जरा
बुजणे कठीण आहे, ते बोचरे चरे

मोरावळ्याप्रमाणे, मुरल्यावरी मने
मी तू पणा जराही, नसतो तिथे बरे

बाणासमान जावी , भेदून अंतरे
रेखा तशी लिही तू , साधीच अक्षरे


डॉ. रेखा ढगे.



=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=



Post a Comment

0 Comments