अध्यक्षीय भाषण
मराठवाडा विभागीय गझल संमेलन जालना
गझल ही काव्यप्रणाली अतिशय लोभस आहे. फारसीतून अरबीतून उर्दूतून इतर भाषांमध्ये तिचा प्रवेश आणि मुक्त संचार होत गेला आहे. हिंदी, गुजराथी, मराठी अगदी कोकणी, भोजपुरी भाषांतही तिने आपला ठसा उमटवला आहे आणि प्रत्येक भाषेने तिला आपला आपला बाज, साज आणि गाज दिला आहे. गझेलेनेही त्या त्या भाषेला स्वतःच्या स्वरुपात एक नवीन परिमाण, एक नवा अलंकार दिला आहे. एका बाजूला गझल सोपी असते. पण दुसऱ्या बाजूला ती बहुरंगी, बहुढंगी - ज्याला कॅलिडोस्कोपिक म्हणता येईल अशी असते. तिच्या अनुभवाचे विश्व अधिक सूक्ष्म आहे. तीव्रही आहे आणि प्रत्यक्ष वेदनेच्या लवकर जवळ जाणारे आहे. म्हणून कविता जर नाजूक फुलाची पाकळी असेल, तर गझल ही त्या पाकळीवर पडलेल्या उन्हाचे किंवा दवाच्या थेंबाचे मनोगत आहे.
गझलेत आयुष्यातले रोजचेच विषय पण अतिशय समर्पक शब्दांत आणि दुःख, वेदनाही सुंदर शब्दांत मांडलेल्या दिसतील. शब्द वरवर पाहता साधेच, रोजच्या वापरातलेच असतात. पण मांडणीचा असा काही बाज असतो कि त्यावर जेवढा खोल विचार करावा तेवढे तिचे पदर, तिचे संदर्भ, अर्थ निर्माण होवू लागतात आणि सोप्याच शब्दांचा एक विशिष्ट आकृतिबंध एखाद्या अनुभवाचा, अनुभूतीचा असा काही आविष्कार घडवून जातो कि, रसिकाशी एक भावनिक जवळीकीचं नातं गझलकाराच्या त्या अनुभूतीच्या अभिव्यक्तीपुरतं जोडलं जातं. अशी साध्यासुध्या, नेहमीच्या शब्दांत व्यक्त झालेली गझल जेंव्हा रसिकाला आपलीशी वाटते तेव्हा ती यशस्वी होते. कारण त्यावेळी भक्कम शाश्वत आशयामुळे आकृतीबंधाचा अभिनिवेश ती विसरायला लावते.
वास्तविक पाहता, गझल रचनेच्या अनुषंगाने पाहू जाता सहज नसते. तिच्या वरवर पाहता साध्या वाटणाऱ्या रचनेला एक क्लिष्ट कलाकुसर असते. वृत्त असते. अलंकारांचे कोंदण असते. व्याकरण असते. गझलेतल्या आशयाला रचनाबद्धतेची एक शिस्त असते. या अर्थाने ती वरवर साधी वाटत असली तरी तेवढीच नखरेल असते. तिचा आकृतिबंध म्हणूनच भुरळ घालतो आणि बरेचदा चकवतोदेखील. त्याचे रदीफ, काफिया, अलामत, मात्रा तसेच गणवृत्तांनी युक्त झालेले लयबद्ध, छंदोबद्ध रूप तिला अभिजात उंची देतो. तसा तो सांभाळताना तिच्यातली सहजता जपण्याचे आव्हान देतो.
काहींना हे बंधन कृत्रिम वाटते. पण हा दृष्टिकोनाचा प्रश्न आहे. ज्याला त्याला त्याचे बंधन पाळण्याचे स्वातंत्र्य द्यावे.
गझल कुठल्याही अनुभूतीचा नेमका अर्थ सांगणारी कविता असते. आपले सर्व अलंकार सांभाळून, अगदी प्रच्छन्न आणि सूक्ष्म पातळीवर काटेकोर अनुभूती व्यक्त करण्याची कुवत ज्या कवितेत असते, तिला गझल म्हणतात. कवितेच्या कवितेला गझल म्हणतात. जे दिसते आहे त्यातीलही अदृश्य मर्म शोधणारी कविता म्हणजे गझल असते. म्हणूनच पु. ल. देशपांडेनी ती एक वृत्ती असते, त्यापलीकडे जावून तिच्यात एक सूक्ष्म निवृत्तीही असते असे म्हणलेले आहे. कारण, ती जेव्हा एखादी गोष्ट सांगते तेव्हा ती मुळातच इतकी उत्कट आणि परिपूर्ण असते कि, ती एका अर्थान निःशेष होत असते. म्हणून निवृत्त असते.
सर्वच भाषांमध्ये गझलेला सुरुवातीला विरोध झाला. अगदी उर्दूतही तिला सहजपणे स्थिरावता आले नाही. तथापि, हा विरोध रसिकांनी केला नाही. हे नमूद करणे आवश्यक वाटते. गझलेचे अभ्यासक डॉ. राम पंडित यांनी तर लिहूनच ठेवलंय कि गझलेच्या टीकाकारांत सर्व फसलेले गझलकारच होते. काहीवेळा लोक असंही म्हणतात कि उर्दूची नजाकत मराठीत नाही, पण मराठीचा बाजच आव्हानात्मक आणि आवाहनात्मक आहे. सुरेश भट आपल्या गझलेत म्हणतात-
जगाची झोकुनी दुःखे सुखांशी भांडतो आम्ही
स्वतःच्या झाकुनी भेगा मनुष्ये सांधतो आम्ही
कुण्याही चंद्रभागेचा किनारा प्यार आम्हाला
तिथे नाचे विठू झेंडा जिथे हा रोवतो आम्ही
फुकाचे काय शब्दांना मिळे दिव्यत्व सत्याचे ?
घराची राखरांगोळी कपाळी लावतो आम्ही
-तेव्हा हेच प्रतीत होत असते.
खरे तर नजाकत शोधावी लागते व ती शोधण्याची नजर ठेवावी लागते.
मालवून टाक दीप चेतवून अंगअंग
राजसा किती दिसांत लाभला निवांत संग
किंवा
ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची
तापलेल्या अधीर पाण्याची
राग नाही तुझ्या नकाराचा
चीड आली तुझ्या बहाण्याची
-या गझलांतून सलणारी आणि सळसळणारी नजाकत वेधणारं मन जिवंत ठेवावं लागतं.
मुळात एवढ्या सुंदर काव्यप्रकारापासून मराठी भाषा आणि मराठी रसिक वंचित राहिला नाही हे मराठी गझलेचं श्रेय आहे. अर्थात काही मराठी जाणकार मात्र स्वेच्छेने वंचित राहू इच्छितात.
वास्तविक पाहता, एवढ्या साध्या काव्यप्रकाराची वाटचाल मात्र कुठल्याच भाषेत सहज, साधी राहिली नाही. संघर्षाचा फार मोठा इतिहास तिला सहन करावा लागला आणि मराठीच्या बाबतीत तर तो अजून पुरता संपलेला नाही. मात्र, दुसऱ्या बाजूला तिला मायमराठीच्या रसिकाने मनात जागा करून दिली आहे.
गझल या शब्दानेच मन तरल बनते. त्याचं. कारण तिचा अर्थच व्याकूळ करणारा आहे. व्याकुळतेची हतबल परिसीमा आणि हतबलतेची उत्कट अभिव्यक्ती घेवून गझल व्यक्त होत असते. सुरेश भट जेव्हा म्हणतात
मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते
कुठे तरी मी उभाच होतो कुठे तरी देव नेत होते.
-तेव्हा हीच हतबलता व्यक्त होत असते.
केवळ प्रेम आणि विरह किंवा प्रेमभंग हाच एक विषय असणे गझलेच्या दृष्टीने पौराणिक झाले. त्यापुढे जावून गझलेने आपले सर्वस्पशी स्वरूप सिद्ध केलेले आहे. हे प्रेमही निव्वळ प्रियकर आणि प्रेयसी यापुरतं असण्यापेक्षाही ईश्वरावरच नव्हे, तर एकूणच जीवनावरच्या अलौकिक भक्तीचं भाष्य अधिक आहे. सूफीनी जेव्हा गझला लिहिल्या, तेव्हा ईश्वराला कधी प्रेयसीच्या, तर कधी प्रियकराच्या स्थानी मानून लिहिलं.
नशा म्हणजे भक्ती अशा पातळ्यांवर गझल व्यक्त होत गेलेली आहे. प्रतीकं आणि परिमाणे गझलेत संस्कृतीनुसार बदलत गेली, तरी संवेदना आणि वेदना व्यक्त करताना एकाच पातळीवर उत्कटतेचा स्थायीभाव गझलेत आविष्कृत होत असतो. त्यामुळे मराठीत ती येते तेव्हा मराठी बाज तिला येतोच. गझलेमुळे मराठीलाही एक परिमाण मिळाले. एका नव्या काव्यप्रकाराशी जुळवून घेवून सलोखा करण्याची तिची कुवत किती मोठी आहे, हे सिद्ध झाले. मुक्तछंदाच्या सत्याग्रहानंतर अत्याग्रहाने जेव्हा कमालीची मर्यादा ओलांडली, तेव्हा कविता म्हणजे केवळ वाकडे, अनर्गळ भाष्य होवू लागली होती आणि भाष्यकारांना मराठीची चिंता वाटू लागली तेव्हा गझल मात्र मराठी व्याकरणाला पुनर्जन्म देत होती. तरुण कवींना ऱ्हस्वदीर्घ उकार, वेलांट्यांचे, व्याकरणाचे, वृत्त, मात्रा, अलंकार यांचे नियम घालून देत होती.
भालचंद्र नेमाडेंनीही हा स्पष्ट इशारा देऊन मराठी कवींनी गझलेकडे वळण्याची सूचना केली होती.
माधव ज्युलियन यांच्या प्रयत्नानंतर मराठीत गझल सर्वार्थाने यशस्वी करणाऱ्या सुरेश भटांनी गझल मराठीत तंत्रशुद्ध तर केलीच, पण तंत्रशरण होवू दिली नाही. मुख्य म्हणजे तिच्यातला आशय अधिक स्पष्ट, गोटीबंद आणि परिपूर्ण केला. त्यामुळे त्यांना मराठी गझलचे खरे उद्गाते म्हणावे लागते. सुरेश भटांच्या पावलांवर पावलं टाकत, पण आपले वेगळे ठसे उमटवत गझलकारांच्या अक्षरशः पिढ्या घडत आहेत. हे मराठीचे वैभवच आहे.
आजची नवी पिढी नवे विषय घेवून पुढे आली आहे. नव्या जाणिवा, नवा बाज आणि नवा शब्दसाज घेवून आलेली आहे. यांनी मराठी गझलेचे सुवर्णयुग आणले आहे. या सर्वाच्या शैलीत, भूमिकांत, विचारांत कमालीचे वैविध्य आहे. काटेकोर व्याकरणाला अनुसरून देखील आशय न हरवू देता परिपूर्ण अनुभूती प्रभावीपणे व्यक्त करण्याचा वस्तुपाठ त्यांनी पाळला आहे. जीवनानुभूतीला न्याय देत राजकीय, सामाजिक, निसर्गाभ्यासी अशा सर्वच विषयांना गवसणी हे तरुण घालत आहेत. प्रामाणिक, उत्कट, अस्सल जीवनानुभव व्यक्त करणाऱ्या विविधरंगी अनुभवाची स्वानुभूति आणि सहानुभूती दोन्हींचा परिचय आणि आस्वाद देणाऱ्या गझलेचे
रंग महाराष्ट्रभर रसिक घेत आहेत.
मराठी गझल ही पुढे येत आहे
मराठीसही ती पुढे नेत आहे
व्यथांनी करावी मशागत मनाची
अशा आशयाचे तिचे शेत आहे
निराकार निर्गुण अशा वेदनेचा
तिचा शब्द एकेक संकेत आहे
दिली देणगी ही मराठीस ज्याने
'सुरेशा'स त्या ती दुवा देत आहे
अर्थात असं असलं तरीसुद्धा मराठी गझलकारांसोबतच मराठी गझल रसिक देखील घडणं आवश्यक आहे आणि त्यामध्ये गझल मंथन साहित्य संस्थेचा पुढाकार खूप साहाय्यभूत ठरतो आहे आजपर्यंत ५० हून अधिक मराठी गझल संमेलनही या संस्थेने घेतलेली आहेत. या संमेलनांमधूनच गझलकारांसोबत मराठी गझल रसिक देखील घडेल अशी निश्चित खात्री आहे. त्याचबरोबर अनेक मराठी प्राध्यापक, संशोधक, विद्यापीठातील विविध भाषा विभाग यांनी आपल्या विद्यार्थ्यांना गझल विषयक संशोधन प्रकल्प देऊन हे मराठी गझल वैभव वाढवलं, तर मराठी भाषा ही तितकीच अलंकृत होईल आणि तिचाही विकास होत राहील.
प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी,
संमेलनाध्यक्ष, मराठवाडा विभागीय गझल संमेलन जालना
गझलमंथन साहित्य संस्था, जालना.


0 Comments