Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

विदर्भ विभागीय गझल संमेलन Pusad Gazal Sammelan


पुसद येथे विदर्भ विभागीय

एक दिवसीय गझल संमेलन



     17 ऑगस्ट 2025 रविवार रोजी गझल मंथन साहित्य संस्था ,कोरपना आयोजित विदर्भ विभागीय एक दिवसीय गझल संमेलन, राजे उदाराम मंगल कार्यालय, पुसद जि.यवतमाळ येथे अतिशय उत्साहात पार पडले.

      दि.16 ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीने पुसदच्या पूस नदीला तसेच आसपासच्या सर्व नदी,नाल्यांना पूर आला.पावसाने सर्वत्र हाहाकार माजवला.त्यामुळे आमची सर्व कार्यकारिणी चिंताग्रस्त झाली.कारण मागील एक- दिड महिन्यांपासून आपण केलेली तयारी वाया जाणार का ? असा विचार मनात डोकावून गेला.आम्ही सर्वजण मनात ईश्वराची प्रार्थना करत होतो आणि आमची प्रार्थना ईश्वराने ऐकली आणि फक्त 17 ऑगस्टला एक दिवसासाठी पावसाने उसंत घेतली व दिवसभर चक्क ऊन पडले . पाऊस व पूरामुळे संमेलनात येऊ न शकणारे गझलकार / गझलकारा उशिराने पुसदकडे यायला सुरूवात झाली.हळूहळू सभागृह लोकांनी गजबजू लागले आणि आम्ही सुटकेचा निश्वास टाकला.' मनात आंतरिक इच्छा असेल तर नक्कीच कार्य सिध्दीस जाते 'ह्याचा प्रत्यय आला.

          संमेलनाध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध गझलकार आदरणीय श्रीकृष्ण राऊत,उद्घाटक जेष्ठ गझलकार मा.शिवाजी जवरे प्रमुख अतिथी गझलकार मा.अमोल शिरसाट, संस्थेचे सचिव गझलकार आ.जयवंत वानखडे ,जीवनगौरव पुरस्कारार्थी सुप्रसिद्ध गझलकार मा.गंगाधर मुटे यांनी आपापले स्थान भूषवले .ह्याच उद्घाटन सत्रात आ.श्रीकृष्ण राऊत सरांच्या 'गझलेचे उपयोजित छंदःशास्त्र ' या पुस्तकाचे प्रकाशन मा.प्रा.रामप्रसाद तौर ह्यांच्या हस्ते तर प्रसिद्ध गझलकारा सौ आरती पद्मावार यांच्या 'इच्छा घार होतांना ' ह्या गझलसंग्रहाचे प्रकाशन जेष्ठ साहित्यिक दिपकभाऊ आसेगावकर यांच्या हस्ते झाले.

         दुस-या सत्रात निमंत्रितांचे दोन गझल मुशायरे संपन्न झाले गझलरसिकांनी त्याला भरभरून दाद दिली.भोजन अवकाशानंतर राहिलेल्या सर्व मुशाय-यांचा आस्वाद रसिकांनी घेतला.टाळ्यांच्या कडकडाटाने सभागृह दणाणून गेले होते.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पुसदपर्यंत पोहोचलेले सर्व गझलकार/गझलकारा तसेच गझल रसिकांनी सभागृह तुडुंब भरले होते.

         गझल संमेलनाला उपस्थित असलेली सर्व मान्यवर मंडळी,निमंत्रित गझलकार/गझलकारा,सहभागी सर्व गझलकार / गझलकारा व गझल रसिक प्रेक्षक यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत.

         गझल मंथन साहित्य संस्था कोरपना (चंद्रपूर) यांनी यवतमाळ कार्यकारिणीला आयोजनाची संधी देऊन आमच्यावर विश्वास दाखवला .ग.मं.सचिव गझलकार आ.जयवंत वानखडे सर,गझलकार सुनिल बावणे सर ,संस्थेचे कोषाध्यक्ष प्रशांत रामगिरवार सर ,गझलकार राजेंद्र घोटकर सर 4 तास माहूरजवळ  पूरात अडकून पडले  होते पण एवढ्या कठिण नैसर्गिक आपत्तीवर मात करून ते सर्वजण उशीराने सभागृहात पोहोचले व सर्व मुशायरे संपेपर्यंत थांबले. त्या सर्वांच्या गझलप्रेमाला Hat's Off.🙏🙏

         गझल मंथन साहित्य संस्थेचे  अध्यक्ष मा.अनिलजी कांबळे,उपाध्यक्ष मा.देवकुमार सर ,सचिव मा.जयवंत वानखडे ,सहसचिव मा.उमा पाटील मॅडम,संमेलन समिती अध्यक्ष मा.अॅड.मुकुंदराव जाधव, समन्वयक मा.प्रदिपदा तळेकर,संस्थेचे

 मार्गदर्शक आ.शिवाजीभाऊ काळे, आ.स्नेहलताई कुलकर्णी यांनी वेळोवेळी अमूल्य मार्गदर्शन केले, काही सुचना दिल्या. अनमोल सहकार्य करुन यवतमाळ कार्यकारिणीचा उत्साह द्विगुणित केला त्याबद्दल यवतमाळ कार्यकारिणी अध्यक्ष या नात्याने सर्वांचे मनापासून आभार मानते.

           तसेच यवतमाळ जिल्हा कार्यकारिणीने अत्यंत परिश्रम घेऊन संमेलन यशस्वी होण्यासाठी अथक प्रयत्न केले.त्याबद्दल त्यांचे आभार न मानता त्यांच्या ऋणातच राहू इच्छिते.


सौ स्नेहा संतोष शेवाळकर,

पुसद 

यवतमाळ जिल्हाध्यक्ष, गझल मंथन



______________________

     

The show must go on.........


हे महत्वाचं होतं. नैसर्गिक आपत्तीचा दिवस होता. सतत 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस, नद्यांना महापूर जिकडे तिकडे रस्ते ब्लॉक झालेले असताना सर्व मान्यवर, सहभागी गझलकार, गझलरसिक, गझलप्रेमी, साहित्यिक मंडळी व रसिक प्रेक्षक मोठया संख्येने उपस्थित राहिलात........

जीवाची रिस्क घेऊन आलात...... 

काय बोलू यावर??????,

रात्रीपासून पावसाने रौद्र रूप धारण केले होते. पहाटे 5 वाजेपर्यंत सतत फोन खणकत होते आम्ही येऊ शकत नाही. सर्व ठिकाणचे सहभागी दिलगिरी व्यक्त करू लागले आणि आम्ही म्हणत होते सगळं ठीक होईल. सकाळी 8 वाजता आम्ही सर्वांनाच फोन केले उशीर झाला तरीही चालेल पण या करू वेळेवर ऍडजस्टमेंट


सर्वजण आले भर पावसात गझल मंथन विदर्भ विभागीय मराठी गझल संमेलन यशस्वी झाले. ते केवळ सर्वांमुळे!


ऐनवेळी नियोजित रुपरेषेत अनेक बदल करावे लागले. बरीच धावपळ झाली पण सर्वांनी वेळोवेळी बदलणारे निर्णय आनंदाने स्वीकारले. खूप उत्साहाने सहभागी झाले. रसिक प्रेक्षकांनीही सर्व मुशायऱ्यांना भरभरून दाद दिली. रात्री 8 वाजेपर्यंत ही सभागृहात प्रेक्षक थांबून होते याचा आनंद आहे. सर्व अडचणींवर मात करून हसत खेळत गझल संमेलन पार पडले. 


      संमेलनाचे उद्घाटक जेष्ठ गझलकार मा. शिवाजी जवरे यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून गझलकार अमोल शिरसाट, गझलकार निलेश कवडे तर स्वागताध्यक्ष मा. दिपकभाऊ आसेगावकर स्थान स्वीकारले. ज्येष्ठ गझलकार मा. श्रीकृष्ण राऊत सर यांनी गझल मंथन संस्थेच्या विनंतीस मान देऊन संमेलनाध्यक्ष पद स्वीकारले. आपल्या अध्यक्षीय भाषणात सरांनी गझलेविषयी छान मार्गदर्शन केले. सरांच्या 'गझलेचे उपयोजित छंद' तसेच गझलकारा आरती पद्मावार यांच्या इच्छा घार होताना या पुस्तकाचा प्रकाशन पहिल्या सत्रात झाले. त्यानंतर बहारदार मुशायऱ्यांचा आस्वाद सर्वांनी घेतला.


सर्व मान्यवर, निमंत्रित, सहभागी गझलकार, गझलकारा आणि रसिक प्रेक्षक यांचे केवळ आभार मानू शकत नाही. आम्ही तुमच्या ऋणात कायम राहू इच्छितो! 🙏🏻🌹


गझल मंथन साहित्य संस्था, कोरपना (चंद्रपूर) ने यवतमाळ  जिल्हा कार्यकारिणीवर विश्वास ठेवून आम्हाला आयोजनाची संधी दिली. वेळोवेळी योग्य मार्गदर्शन केले, सूचना दिल्यात, सर्वोतोपरी सहकार्य केले. सतत आमचा उत्साह वाढवला. त्यामुळे आम्ही करू शकलो. गझल मंथन संस्थेचे अध्यक्ष मा. अनिल कांबळे सर, उपाध्यक्ष मा. वसुदेव घुमटकर, सचिव जयवंत वानखडे, सहसचिव उमा पाटील, मार्गदर्शक आदरणीय डॉ शिवाजी काळे, डॉ स्नेहलताई कुलकर्णी यांचे हृदयातून आभार! 🙏🏻🌹


यवतमाळ जिल्हा कार्यकारिणीने एकजुटीने आणि प्रेम जिव्हाळ्याने गझल संमेलनाची अफाट मेहनत घेतली त्यासाठी सर्वांचे खूप खूप आभार!💐💐


निशा डांगे



_________________________


    १७ ऑगस्ट २०२५ गझलमंथन साहित्य संस्था, कोरपना आयोजित  विदर्भ विभागीय एक दिवसीय यवतमाळ जिल्हा कार्यकारिणी द्वारे आयोजित संमेलनास जाण्याचा योग आला .

अतिशय कमी कार्यकारिणी असून त्यातही महिलांची संख्या जास्त असून म्हणजे त्या तुलनेत manpower कमी असताना सुद्धा संपूर्ण कार्यक्रम अगदी व्यवस्थित पार पडला .

नैसर्गिक आपत्तीत सुद्धा सर्व कार्यक्रम,मुशायरे , व्यवस्थित पार पडलेत.

यामागे असणारे  जिल्हाध्यक्ष *सौ.स्नेहा शेवाळकर* व *टीमचे संपूर्ण नियोजन दिसत होते* ,मेहनत दिसत होती .

पावसामुळे पाहुण्यांची येण्याची ,वेळेची अनिश्चितता असताना..व वेळेवर भरपूर फेरबदल होऊन  देखिल  *सौ.सोनल गादेवार* व * *सौ.स्मिता पांडे* यांनी अगदी प्रसंगावधान राखून उत्कृष्ट सुत्र संचालन केले.


सर्व मान्यवर , आमंत्रित गझलकार पाऊसपाणी,नदी- नाले ,पूर ओलांडून  संमेलनास हजर होते.


एकूणचं संपूर्ण कार्यक्रम अतिशय सुव्यवस्थित संपन्न झाला.


सर्व यवतमाळ जिल्हा कार्यकारीणी चे खूप खूप अभिनंदन!!!🌹🌹🌹


दिपाली सुशांत 

कारंजा (लाड)

जि.वाशिम



______________________


 *गझल मंथन साहित्य संस्था, कोरपना, जि. चंद्रपुर द्वारा आयोजित यवतमाळ विभाग जिल्हा कार्यकारिणी तर्फे रविवार दि. १७ आॕगष्ट रोजी नवीन पुसद येथील राजे उदाराम मंगल कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झालेल्या एकाहून एक वैशिष्ट्यांनी नटलेल्या व सुसज्ज अशा बहारदार व रंगतदार गझलमुशाय-याची मी केलेली मुशाफिरी!* 


*गझल मंथन साहित्य संस्थेशी संलग्न महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या आसपासच्या प्रांतातील माझ्या समस्त गझलप्रेमी गझलकार बंधू-भगिनींनो आपणांस शिवाजी साळुंके, 'किरण' (चाळीसगाव, जि. जळगाव)   चा साष्टांग नमस्कार, जयभीम, जयहिंद व जयश्रीराम जवळच नांदेड असल्यामुळे सतश्री अकाल!🙏*


चेतना शिक्षण संस्था, वरोरा जि. चंद्रपूर या संस्थेचा उपाध्यक्ष या नात्याने मी चाळीसगावहून दि. १३ आॕगष्टलाच निघालो व  दि. १५ आॕगष्टचा आमच्या विद्यालयातील स्वातंत्र्यदिनाचा सोहळा आटोपून दि. १६ रोजी भर पावसात पुसदकडे जायला निघालो असता मुसळधार पावसाने थैमान घातलेले दिसले. रात्री नऊ वाजता दिग्रसला माझे नातलग मा. संजय पंजाबराव चिंते सरांकडे मुक्कामाला राहून रविवार दि. १७ आॕगष्टला सकाळी साडेअकरा वाजता राजे उदाराम मंगल कार्यालय गाठले.

एव्हाना कार्यक्रमाला सुरुवात झालेली होती. संमेलनाध्यक्ष सुप्रसिद्ध गझलकार मा. श्रीकृष्ण राऊत आपल्या प्रकृतीस्वास्थ्याची पर्वा न करता व्हीलचेअरवर सबंध वैद्यकीय संसाधनांसह अगदी प्रसन्नमुद्रेत विराजमान होते, या एकदिवसीय मुशाय-याचे उद्घाटक सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार व नामवंत गझलकार मा. शिवाजी जवारेसाहेब तसेच आयोजन समितिचे अध्यक्ष मा. काशिनाथ गवळी व ईतर मान्यवर मंचकावर विराजमान झालेले होते. गझल मंथन साहित्यसंस्थेचे सचिव मा. जयवंत वानखेडे व झाडीबोलीत कविता व गझला लिहिणारे सुप्रसिद्ध गझलकार 'स्याडा कोटसा भरते' या झाडीबोली काव्यसंग्रहाचे ख्यातनाम कवी मा. सुनिल बावणेसर हे ही पावसाने रोखून धरलेल्या व काही ठिकाणी बंद पडलेल्या रहदारिशी टोंगळाभर चिखलमिश्रित पाण्यातून मार्गक्रमण करीत संमेलनस्थळी कसेबसे पोचले!

प्रमुख पाहुण्यांची भाषणे आटोपल्यावर संमेलनाध्यक्ष मा. श्रीकृष्ण राऊत साहेबांच्या अगदी संथगतिने केलेल्या अभ्यासपूर्ण अध्यक्षिय भाषणाने श्रोते अक्षरशः भाराऊन गेले.

या प्रसंगी त्यांच्या 'उपयोजित गझलेचे छंद शास्त्र' या पुस्तकाचे व आरती पद्मावार यांच्या 'ईच्छा घार होतांना' या गझलसंग्रहांचे विमोचन करण्यात आले.


माझ्या गझलकार बंधू-भगिनींनो व सन्मित्रांनो मी स्वतः आज पावेतो तीन राज्यस्तरिय संमेलनांचे व एका घझल मुशाय-याचे आयोजन स्वखर्चाने केलेले असून राज्य व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांमध्ये चार वेळा हजेरी लावलेली आहे, परंतु काल पुसद येथे संपन्न झालेल्या मझल मुशाय-यातील एकानंतर एक अशा एकूण सहा गझल मुशाय-यांचा परमानंद दुपारी दोन वाजेपासून तर रात्री नऊ वाजेपर्यंत रंगलेल्या कालच्या गझल मुशाय-याने आजपर्यंत झालेल्या सर्वच्या सर्वच मुशाय-यांना मागे टाकले हे सांगताना या एकदिवसीय गझलमुशाय-याचे मला भरभरून कौतुक करावेसे वाटते. अगदी अखंड व अविरतपणे सतत सात तास चाललेल्या या बहारदार सोहळ्याने श्रोत्यांची मने जिंकली.

प्रत्येक मुशाय-याचे अध्यक्ष व सूत्रसंचालक हे एकाहून एक सरस, अभ्यासू व गझलतंत्राचे चांगले जाणकर देखील होते.

दिग्रस येथील अरुणाताई दुद्दलवार, हिंगणघाटचे नरेंद्र गंधारे, चंद्रपूरचे सुनिल बावणे, गझल मंथन साहित्यसंस्थेचे सचिव मा. जयवंतराव वानखेडे व ईतर सन्मित्रांच्या भेटीगाठींचा दुग्धशर्करायोग हे आणखी एक अहोभाग्य लाभले!

चला ठेवतो आता!


*सन्मित्रांनो! तसेच माझ्या प्रीय गझलकार बंधू-भगिनींनो! नमस्कार!*🙏

 

काल जर मा. मुकुंदराव जाधव सर आणि ईतर मान्यवर सन्मित्रांच्या भेटी गाठी झाल्या असत्या तर या कार्यक्रमाला आणखी रंगत आली असती!

हा मुशायरा यवतमाळ जिल्हा कार्यकारिणीच्या सर्वच पदाधिका-यांनी व कार्यकर्त्यांनी विशेषतः महिलांनी अत्यंत सुनियोजित पद्धतीने यशस्वीरित्या पार पाडला. त्यांच्या घरून चार पाचदा कॉल येऊन गेले तरी देखील शेवटचा मुशायरा रात्री नऊ वाजता आटोपल्याशिवाय त्यांनी जराही उसंत घेतली नाही.

संस्थेचे सचिव मा. जयवंतराव वानखेडे सर व कवी, गायक तथा गझलकार सुनिलदादा बावणे हे दोघे कार्यक्रम संपल्यावर भर पावसातच परतीच्या प्रवासाला निघाले व रात्री दोन वाजता कोरपन्याला सुखरुपपणे पोचले. अशीच जवाबदारी ईतर पदाधिका-यांनी पार पाडायला हवी होती, असे मला वाटते.

आपण संस्थेद्वारा कार्यक्रमांचे आयोजन करतो व स्वतः मात्र गैरहजर राहतो हे सयुक्तिक वाटत नाही. मी संस्थेचा आजीव सदस्य या नात्याने जिथे मला जाणे शक्य असते तिथे नवोदितांना प्रोत्साहन देण्यासाठी मी उपस्थित राहतो. पुसद येथील आपले ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नामांकित गझलकार आदरणीय मा. श्रीकृष्ण राऊत साहेबांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यायची सुवर्ण संधि मला लाभली हे माझे अहोभाग्य होय! त्यांची सर्व पुस्तके मी विकत घेतली!

काही स्थानिक व ईतर गावाहून आलेले गझलकार/गझलकारा आपापल्या गझला सादर करुन लगेच निघून (पळून) गेले हे तर मला खूपच खटकले! हे असभ्य वर्तन आहे व ते थांबणे अत्यंत गरजेचे आहे!


असो!

एकंदरीत हा गझल मुशायरा अप्रतिम झाला तो केवळ माझ्या माय मावल्यांमुळे, हे मी परत एकदा नमूद करतो व थांबतो!


*Last but not the least!मला रात्री लगेसच नांदेड येथे पोचायचे होते पण ते जवळजवळ अशक्य असल्यामुळे एका सहृदय कार्यकर्त्याने पांडेताई व्यस्त असल्याचे पाहून माझी मुक्कामाची सोय भक्ति लॉज* मध्ये करून दिली! मी त्यांचा मनःपूर्वक व शतशः ऋणी आहे!


शिवाजी साळुंके, 'किरण'

हल्ली मुक्काम- नांदेड.



______________________



पावसाच्या लहरीपणाने जे काही सावट आलं होतं त्याला किंचितही न जुमानता कालचं एक दिवसीय गझल संमेलन प्रचंड यशस्वी झालं.

सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि उत्तुंग मनोबल काय करू शकते याची प्रचिती आली.

विदर्भ विभागीय कार्यकारिणी आणि यवतमाळ जिल्हा कार्यकारणी यांचे गेल्या दोन तीन महिन्यांपासून सुरू असलेले कष्ट आणि आत्मीयता या आनंद सोहळ्याच्या यशाला कारणीभूत ठरले.

सर्वांचे मनापासून अभिनंदन.

गझलमंथन संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला.

सर्व मान्यवर,सर्व निमंत्रित गझलकार आणि सर्व सहभागी गझलकार यांचेही अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद.

हॅट्स ऑफ टू ऑल ऑफ यू.

👍👍🌹🌹💐💐🎩🎩


अवेळी विळखा घालणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करत...कालचे गझल मंथन साहित्य संस्था, यवतमाळ आणि विदर्भ विभागीय कार्यकारिणी आयोजित एक दिवसीय गझल संमेलन प्रचंड उत्साहात पार पडलं... ही अत्यंत कौतुकास्पद आणि मनोबल उंचावणारी बाब आहे.

यवतमाळ आणि विदर्भ जिल्हा कार्यकारणी सदस्यांचे कष्ट, त्यांची इतक्या दिवसांची धावपळ सत्कारणी लागली.  गझल मंथन संस्थेसाठी ही प्रचंड अभिमानास्पद गोष्ट आहे.

  तुम्हा सर्वांचे कौतुक... करावे तितके कमीच आहे.

सर्वांचे मनापासून अभिनंदन.🌹🌹🌹

       या संमेलनासाठी उपस्थित..

सर्व मान्यवर,सर्व निमंत्रित गझलकार,सर्व सहभागी गझलकार, सर्व मुशायरा अध्यक्ष, सर्व सूत्रसंचालक, पडद्यामागचे मदतीचे हात... सर्वांचे मनापासून अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद.🌹


गझल मंथन साहित्य संस्था तुम्हा सर्वांची सदैव.. स्नेहांकित आहे 😊🌹🙏🏼


स्नेहल कुलकर्णी


______________________

*गझल मंथनचे आठवणितील गझल संमेलन ; पुसद , जिल्हा यवतमाळ*


गझल मंथन साहित्य संस्था कोरपना, जिल्हा चंद्रपूर द्वारा आयोजित १७ ऑगस्ट २०२५ रविवारला पुसद, जिल्हा यवतमाळ येथे संपन्न झालेले गझल मंथन साहित्य संमेलन एक साहित्यासाठी धडपडणारे साहित्यिक आणि गझलकार यांनी नैसर्गिक आपत्ती आणि पूर परिस्थिती याच्यावर मात करून अतिशय चिकाटीने धडाडीने  साहित्य संमेलन पार पाडले आणि त्यामध्ये प्रत्येकांच्या आपुलकीच्या प्रयत्नांचा  वाटा होता असे म्हणले तरी अतिशयोक्ती  ठरणार नाही. 

भर पाण्याचा दिवस, श्रावण महिन्याचे प्रवासासाठी आल्हादकारक वातावरण हा एक वेगळा अनुभव घेऊन गझलकार मंडळी गझल साहित्य संमेलनाच्या सोहळ्यात आवर्जून उपस्थित राहण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करीत काही अगदी वेळेवर पोहोचले,,,काही उशिरा पोहोचले,,  काही पूर परिस्थितीमुळे येऊ शकले नाही पण त्यांची धडपड आणि गझल प्रति असलेली एक आपुलकीची भावना या साहित्य संमेलनातून दिसून आली. दिनांक १७/०८/२०२५ ला गझल मंथन साहित्य संस्था पुसदची संपूर्ण कार्यकारीणी तन मन धनाने परिपूर्ण ठरली.  मुख्यत्वे गझलकारा भगिनी आणि त्यांच्या पाठबळ गझलकार साहित्यिक तसेच यांचे परिवार सदस्य सुध्दा गझल संमेलन कार्यात राबतांना दिसले आणि या सर्वांनी अतिशय प्रामाणिकपणे केलेले प्रयत्न यशस्वी  झाले हे निश्चितपणे सांगतो.

💐 उद्घाटन 

💐 मान सन्मान 

💐 मार्गदर्शन 

💐 गझल संग्रह प्रकाशन 

💐 अतिथी पुरस्कार वितरण 

💐 अतिथी गझल मुशायरा 

💐 सस्नेह भोजन 

💐 निमंत्रित गझल मुशायऱ्यांचे 

       नियोजन 

असे हे अतिशय नियोजनबद्ध आठवणितील गझल संमेलन. 

     सुरुवातीला आम्हाला पण असे वाटले की आम्ही गझल मंथनच्या या संमेलन सोहळ्याला पोहोचणार की नाही परंतु पूर परिस्थिती, येण्या जाण्याच्या मार्गाची बिकट परिस्थितीवर  मात करून आम्ही उशिरा का होईना गझल मंथन पुसदच्या प्रेमापोटी तिथे पोहोचलो.  अर्थातच यासाठी वाहतूक सुरळीत करण्यासाठी आम्हाला स्वतःही काही प्रयत्न करावे लागले तरी पण गझलच्या प्रेमापोटी ते अतिशय थोडके ठरले आणि सोहळ्याला हजर झालो. सुरुवातीला दोन सत्र अतिशय हर्षोल्लासात अतिशय चांगले पार पडले. तिसऱ्या सत्रापासून आम्ही तिथे उपस्थित झालो. गझल मंथनचा गोडवा आपुलकीने चौकशी, फार लांबून आलेले गझलकार, गझलकारा यांनी गझलच्या वातावरणात तिसऱ्या  सत्रापासून आम्हाला सामावून घेतलं. आपुलकीचं बोलणं, विचारपूस, भेटीगाठी स्नेह भोजन आणि त्यानंतर सादर झालेले अतिशय उत्तम तीन गझल मुशायरे या सर्वांनी आमचा थकवा दूर केला. सकळी १०:३० ला उपस्थित झालेली काही साहित्यिक व श्रोते मंडळी रात्री ८:३० वाजेपर्यंत उपस्थित होतीच. ऐकलेले सर्वच मुशायरे उत्तम ठरले हे विशेष. वेळेवर सयमसुचकतेचे आयोजन यामुळे प्रत्येकांना संधी मिळाली हे विशेष. एकूणच १७ ऑगस्ट २०२५ चा एक दिवस गझल मंथनच्या सानिध्यात आठवणीत राहणारा ठरला हे मात्र निश्चित सांगतो.  आणि गझल मंथनच्या या आठवणीत राहणाऱ्या सोहळ्यामध्ये उपस्थित सर्व गझलकार साहित्यिक व श्रोतेगण यांचे मनःपूर्वक आभार मानतो आणि यापुढेही गझल मंथनच्या प्रत्येक गझल साहित्यिक संमेलनामध्ये आपण नक्कीच उपस्थित राहावे ही आपुलकीची अपेक्षा तर आहेच...


सुनील बावणे - निल

  बल्लारपूर, चंद्रपूर

______________________


प्रिय स्नेहा शेवाळकर ,

आपले कौतुक करावे तेवढे कमी ! आपण गझल मंथन यवतमाळ जिल्हा कार्यकारिणी च्या अध्यक्ष आहात ! १७ तारखेला झालेल्या एकदिवसीय गझल संमेलनाची धुरा आपण व आपल्या टिम ने उत्तमरीत्या पेलली .

स्री प्रसंगी चंडीकेचे रूप धारण करते याचा प्रत्यय त्यादिवशी आला .आपले मनोधैर्य व धडपड  बघून निसर्गानेही हार मानली .धो धो पाऊस सुरू असतांना ,पुराचे संकट डोक्यावर घिरट्या घालत‌ असतांना सुध्दा संमेलनास हजर राहण्याची धडपड आम्हा सर्वांची होती .परंतु जे पुर पार करून धडपडत आपल्या संमेलन स्थळी पोहोचले ते केवळ गझलेच्या प्रेमापोटी आणि आपली संमेलन यशस्वी करण्यासाठीची धडपड बघून !

तुम्ही सर्वांनी हे संमेलन यशस्वी करण्यासाठी जीवाचे रान केले .

सर्व कार्यकारिणी ला माझा मानाचा मुजरा ! स्मिता पांडे व सोनल गादेवार ,मिनाक्षी गोरंटीवार यांनी केलेले उत्कृष्ट सुत्रसंचलन मनाला भावले तसेच इतरही माझ्या छोट्या मैत्रीणींनी आपली जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडली .

                स्नेहा ताई...एक मनातलं बोलावंसं वाटतयं... बोलुनच टाकते..... तुम्ही यवतमाळ जिल्ह्याच्या अध्यक्ष असूनही स्टेजवर‌ वा इतर ठिकाणी कुठेही तुम्ही आपल्या अध्यक्षपदाचा तोरा मिरवला नाही .आठ दिवसांपासून प्रत्येक गोष्टीची काटेकोरपणे तयारी करून आपण संमेलनाच्या दिवसी ही आपली जबाबदारी पार पाडण्यातच गर्क होत्या . असे शालीन व्यक्तिमत्व आमच्या यवतमाळ जिल्ह्यातील गझल‌मंथन ला लाभले हे आम्ही आमचे भाग्य समजतो .आपली अध्यक्ष म्हणून झालेली निवडी योग्य होती .... विश्वासार्ह होती .

       स्त्रीयांनी मिळून विदर्भ स्तरीय संमेलन‌ यशस्वीपणे पार पाडले याबद्दल आपले व आपल्या टिमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन!

        पुढिल वाटचालीस शुभेच्छा !


               आपली

         वैशाली गावंडे-कोल्हे



Post a Comment

0 Comments