● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷आज शिष्टाचार येथे शील सोडू पाहतो🌷
आज शिष्टाचार येथे शील सोडू पाहतो
घेउनी धन इच्छुकाला रात्र देऊ पाहतो
वेगळे आहेच अमुच्या मेंदुचे परिमाणही
रोज अण्वस्त्रे बनवुनी युद्ध टाळू पाहतो
घर जळत असताच परके तो किती आनंदला
घर जळत असताच सख्खे आग विझवू पाहतो
थांबली शिवराळ भाषा कोण मी कळताच मग
मोजक्या शब्दात तोही तोंड उघडू पाहतो
लोकशाहीच्या दुधाने धावला सत्तेमधे
लोकशाहीच्या उरी तो लाथ ठेऊ पाहतो
वादळाशी झुंजताना नावही रक्ताळली
लागली गळती गड्या मी भोक बुजवू पाहतो
राख स्वप्नांची स्मशानी मी तरी रडलोच ना
त्याच राखेचे कपाळी भस्म फासू पाहतो
शेत ज्याचे कोरडे तो पावसाला आळवे
अन सुखी माणूस अंगी कोट घालू पाहतो
पिकवुनी कापूस ज्याने झाकली अब्रू तुझी
तो स्वत: घालून चिंधी शेत राखू पाहतो
संकटी ज्याने स्वत:ची पाठ दाखवली मला
यश मला मिळताच तो तर हात मिळवू पाहतो
गोर गरिबांनाच लुटुनी आपला भरला खिसा
हाय! आता मंदिरी तो दान देऊ पाहतो
चेहऱ्यावर चेहरे मी लावल्यावर एवढे
कोणता माझा खरा तो मीच शोधू पाहतो?
डॉ. पवन कोरडे
गझलकार डॉ. पवनजी कोरडे यांना
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..
🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments