मुंबई येथे होणाऱ्या पहिल्या युवा एकदिवसीय गझल संमेलनाच्या अध्यक्षपदी युवा गझलकार गोपाल मापारी यांची निवड
मुंबई, (प्रतिनिधी) गझल मंथन साहित्य संस्थेच्या वतीने येत्या ७ जून रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात येत असलेल्या पहिल्या युवा एकदिवसीय गझल संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध युवा गझलकार गोपाल तुळशीराम मापारी यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल साहित्य क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मूळ बुलढाणा येथील असलेले गोपाल मापारी हे सध्या अकोला येथे वास्तव्यास असून पाटबंधारे विभाग, अकोला येथे कार्यरत आहेत. त्यांनी B.Sc., D.Ed. तसेच M.A. (English) पर्यंत शिक्षण घेतले आहे. कवी, व्याख्याते, गझलकार आणि निवेदक अशी त्यांची बहुआयामी ओळख आहे.
महाराष्ट्रासह महाराष्ट्राबाहेरील विविध साहित्य संमेलने, कविसंमेलने तसेच उर्दू-मराठी मुशायऱ्यांमध्ये त्यांनी प्रभावी सहभाग नोंदवला आहे. अनेक साहित्यिक मैफलींचे निवेदनही त्यांनी केले आहे. त्यांच्या गझल लेखनाची दखल घेत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बी.ए. भाग-२ च्या अभ्यासक्रमात त्यांच्या एका गझलेचा समावेश करण्यात आला आहे.
‘एक शहाणी ओळ’ हा त्यांचा गझलसंग्रह लवकरच प्रकाशित होत असून महाराष्ट्रातील विविध वर्तमानपत्रे, नियतकालिके आणि दिवाळी अंकांमधून त्यांच्या कविता सातत्याने प्रसिद्ध होत असतात. आधुनिक समाजमाध्यमांवरही त्यांच्या शेरांना मोठी पसंती मिळत आहे.
गोपाल मापारी यांना ‘लक्ष्मण जेवणे स्मृती गझल पुरस्कार’, ‘लोकसाहित्य गौरव पुरस्कार २०२४’ तसेच ‘सतीश दराडे स्मृती गझल पुरस्कार २०२४’ यांसारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
त्यांचे वडील तुळशीराम मापारी हे देखील शेतीमातीच्या कविता लिहिणारे अस्सल कवी असल्याने कवितेचा वारसा दोन पिढ्यांपासून जपला जात आहे. याच भावनेतून गोपाल मापारी आपल्या एका शेरात म्हणतात —
“आईकडून आली, बाबांकडून आली
रक्तात गझल, कविता दोघांकडून आली.”
गझल मंथन साहित्य संस्थेच्या वतीने त्यांच्या निवडीबद्दल हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे.

0 Comments