Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

गझल ब्रह्म Gazalkar Divakar Chaukekar

पुस्तक परिचय 



 आत्मानुभूतिची अभिव्यक्ती करणारा गझल संग्रह-  "गझल ब्रह्म"


     रेणुका गझल मंचचे संस्थापक, ज्येष्ठ गझलकार, सामाजिक बांधिलकीची भावना जपणारे, संतकृपा सेवा प्रतिष्ठानचा २०२५ चा "मराठवाडा भूषण" हा मानाचा पुरस्कार मिळवणारे, जल व भूमी व्यवस्थापन तज्ञ डॉ. रे. भ. भारस्वाडकर सर हे छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे राहतात. त्यांच्या " गझल ब्रह्म " या गझलसंग्रहाचे प्रकाशन नुकतेच छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या रेणुका गझल मंचच्या तिसऱ्या राज्यस्तरीय गझल संमेलनात करण्यात आले. संग्रहाला हेमंत आर्ट यांचे अतिशय सुंदर,आकर्षक व देखणे असे ब्रह्मांडाचे मुखपृष्ठ लाभले असून हा संग्रह डाॅ भारस्वाडकर सरांनी आपले अध्यात्मिक गुरू गुरुबाबा ह भ प शंकर महाराज परटोले, अंबर्जे, ता शहापूर जि ठाणे यांना आदरपूर्वक अर्पण केला आहे. डाॅ भारस्वाडकर सर यांच्या छोटेखानी मनोगतानंतर माझे एक जुने मित्र, ज्येष्ठ गझलकार श्री बदिउज्जमा बिराजदार (साबीर सोलापुरी) यांनी विस्तृत, साजेशी प्रस्तावना दिली आहे, नंतरच्या पानावर गझलच्या नांव, वृत्त व पृष्ठ क्रमांकासह अनुक्रमणिका बघावयास मिळते तर बाजीगर प्रकाशन, सिराज करीम सिकलगार, आंधळी ता पलूस जि. सांगली हे प्रकाशक आहेत. 


     डॉ. रे भ भारस्वाडकर सर हे गेल्या पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ गझल लेखन करत आहेत. परभणी येथील पै. डॉ. गुलाम रसूल आणि गझलसम्राट दादासाहेब सुरेश भट यांच्याकडून त्यांनी गझल हा काव्यप्रकार जाणून घेतला. याबद्दलची अधिक माहिती देतांना ते सांगतात की, १९७२ साली जपानच्या 'नॅशनल' कंपनीचा डबल कॅसेटचा डेक विकत घेतला होता. त्यावर गुलाम अली व मेहदी हसन यांच्या गझलच्या कॅसेट्स ऐकण्याचा नाद लागला. प्रत्येक शेरच्या दुसऱ्या ओळीच्या शेवटच्या भागावर तोंडातून आपोआप 'व्वाह' अशी दाद निघायची, तेव्हा खूप मजा यायची पण हे असे दाद देण्याचे कारण समजत नव्हते, ऐकण्याची ओढ मात्र वाढत गेली. दरम्यान परभणी रेल्वे स्टेशन वरील पुस्तके-मासिके-वृत्तपत्रे विकण्याच्या दुकानात, "दिवान-ए-ग़ालीब" हे पुस्तक दिसले, ते विकत घेतले. पण त्यातल्या फ़ारसी शब्दांचा अर्थ मात्र कळत नव्हता. पुढे एका पुस्तक प्रदर्शनात महाराष्ट्र शासनाचा फ़ारसी-मराठी शब्दकोष  दिसला, तो विकत घेतला व नंतरचे सहा महिने ग़ालिबच्या गझलांचा अभ्यास केला. यात परभणीच्या बड्या मस्जिद समोर रहाणा-या सलीम नावाचा तरूण शायरची त्यांना खूपच मदत झाली. 


     शास्त्रीय संगीत शिकवणारे, ललित कला भवन, परभणीचे डाॅ. ग़ुलाम रसेल, यांच्या घरी जाऊन, गझल कशी लिहायची हे शिकवाल का? असे त्यांना विचारले असता त्यांनीही मोठ्या मनाने होकार दिला व 'साप्ताहिक धर्मयुग'चा एक गझल विशेषांक त्यांच्या हातात देऊन, हे वाचून मग या असे सांगितले. त्यात पु. ल. देशपांडे यांनी बेगम अख्तर यांच्यावर लिहिलेला लेख खूपच आवडला. नंतर बेगम अख्तर यांनी गायलेल्या गझलांच्या कॅसेट्स ऐकण्याचे वेड त्यांना लागले. त्याच वेळी, "बेग़म अख्तर सिंग्स ग़ालिब" ही एल.पी. रेकाॅर्ड मिळाली, तिची कॅसेट करून घेतली व ही कॅसेट अनेक अनेक वेळा ऐकली. साधारणपणे १९७३ पासून ते गझला लिहायला लागले. १९७७ ला त्यांचा पहिला कविता संग्रह "धून " प्रकाशित झाला ज्यात काही गझला देखील होत्या. १९८२ साली जिल्हाधिकारी, परभणी यांच्या अध्यक्षते खाली त्रैभाषिक मुशायरा (मराठी, हिंदी, उर्दू) चे आयोजन करण्यात आले होते. मराठीसाठी जी आयोजन समिती होती त्यावर भारस्वाडकर सरांची सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली. सदस्यांना कामांचे वाटप करताना त्यांच्याकडे गझलसम्राट दादासाहेब सुरेश भट यांची व्यवस्था पाहण्याचे महत्वाचे काम सोपवण्यात आले होते. परभणीच्या "हाॅटेल निरज इंटरनॅशनल" मध्ये दादासाहेब सुरेश भट यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यावेळी तीन-चार दिवस भारस्वाडकर सर हे सुरेश भट यांच्या सोबतच होते. दरम्यान बोलत असतांना भट साहेबांनी त्यांना सहजच विचारले की, 'तू गझला लिहितोस का? यावर ते 'हो' म्हणाले व डाॅ. ग़ुलाम रसूल यांचा उल्लेख केला. तेंव्हा दादासाहेब भट यांनी 'आत्ता लगेच त्यांना भेटायचे आहे, त्यांच्या कडे घेऊन चल ...!' असे सांगितले. कलेक्टरच्या जीपची वाट न पहाता दोघेही सायकल रिक्शाने डाॅ. ग़ुलाम रसूल यांचे घरी गेले. तेथे त्यांची दोन-तीन तास चर्चा झाली. तिथून परत येतांना दादासाहेबांनी भारस्वाडकर सरांना सांगितले की, तुला अतिशय विव्दान व गझलेचा जाणकार माणूस भेटला आहे. नंतर भारस्वाडकर सरांनी सुरेश भट साहेबांना विनंती केली की, मला तुमचे मार्गदर्शन देखील मिळावे, ती विनंती भट साहेबांनी त्वरित मान्य केली. तेव्हापासून पासून सुरू झालेला गझलेचा हा प्रवास दादासाहेब सुरेश भटांशी कौटुंबिक जवळिकता निर्माण करणारा ठरला. "काफला" या प्रातिनिधिक गझल संग्रहा खेरीज भारस्वाडकर सरांच्या धून (१९७७) आणि संवेदना (१९९४) या काव्यसंग्रहामध्ये काही गझल रचनांचा समावेश करण्यात आला आहे. 


     "गझल ब्रम्ह" या गझल संग्रहात अनुक्रमणिकेनुसार ८१ गझलांचा समावेश दिसत असला तरी एक गझल ही दोन वेळा छापली गेली असल्यामुळे एकूण गझल संख्या ही ८० आहे. या सर्व ८० गझला आनंदकंद , व्योमगंगा, देवप्रिया, मंदाकिनी, राधा, स्त्रग्विणी, मेनका, मंजुघोषा, विद्युल्लता, सूरनिन्मगा, वियदगंगा, मरीचिका, शिखि, रंगराग, लयग्राहि, देवराज, सिंहपुच्छ, साशंक, कंदुक, श्राद्धरांता, कल्पना, वतंसिनी, तरंगिणी, सर्वगामी, रागिणी,  मत्तमातंग दंडक, आख्यानकी, सौदामिनी, दया, जलौघवेगा, पुष्प+महामाया, कलिंदनंदिनी, आभार भुजंगप्रयात, हिरण्यकेशी, नितंबिनी, भ्रांत, कलावती, वागीश्वरी, स्वानंद सम्राट, महानाग, सतईश, शार्दुलविक्रीडीत आदि वृत्तामध्ये लिहिलेल्या आहेत. हिंदू तत्त्वज्ञानानुसार, ब्रह्म म्हणजे या संपूर्ण विश्वाचा उगम, मूळ आधार आणि सर्वोच्च अंतिम सत्य होय. हे विश्वातील अमर्याद, सर्वव्यापी, निराकार आणि शाश्वत असे चैतन्य आहे. ज्या प्रमाणे सर्व दागिने हे शेवटी सोनेच असतात, त्याचप्रमाणे हे संपूर्ण विश्व 'ब्रह्म' या एकाच मूळ तत्त्वातून निर्माण झाले आहे आणि त्यातच विलीन होणार आहे. डाॅ भारस्वाडकर सरांना अध्यात्मात विशेष रुची आहे आणि त्यांच्या या पहिल्या संग्रहाचे नावच "गझल ब्रह्म" असल्याने हे "ब्रम्ह" तत्वज्ञान या  संग्रहाच्या पानापानांतून प्रतिबिंबित होत आहे असे दिसून येते. अध्यात्माशिवाय या संग्रहातील गझला ह्या सामाजिक,भौतिक, इहवादी विषयक विचारही समर्थपणे मांडतात असे दिसून येते. डॉ. भारस्वाडकर सर हे गेली चाळीस-पंचेचाळीस  वर्षे अध्यापन क्षेत्रात कार्यरत आहेत. या दीर्घ अशा काळात  जगभरातील विविध देशात फिरून त्यांनी सिंचनतंत्र आत्मसात केले असून ते त्या क्षेत्रातील एक मान्यवर तज्ञ तसेच व्याख्याते देखील आहेत, शिवाय हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे या दृष्टीने ते देशातील शेतक-यांना प्रशिक्षण देण्याचे कार्य आजही पार पाडत आहेत. गझल, जल, भूमी व्यवस्थापन कामांखेरीज डाॅ रेणुकादास भारस्वाडकर सर हे सिद्ध समाधी योग, विपश्यना तसेच रेकीतज्ञही आहेत. महत्वाचे म्हणजे डाॅ रे भ भारस्वाडकर सरांनी आत्तापर्यंत ५२ मराठी गझल लेखन ऑनलाईन कार्यशाळा घेतल्या असून त्या सर्व कार्यशाळा विनामूल्य घेतलेल्या आहेत आणि त्यांच्या या कार्यातून सरांची मराठी गझलेप्रती असलेली निष्ठा दिसून येते. त्यांची ५३ वी गझल कार्यशाळा नुकतीच सुरु झाली असून सहभागी कवींची संख्या देखील लक्षणीय आहे. आता गझल संग्रह पुस्तक परिचय/परीक्षण लेखात गझलकारांबद्दल इतकी विस्तृत माहिती का दिली असेल ? असा विचार सगळ्यांच्याच मनात आला असेल असे मला वाटते, एक तर त्या काळात आजच्यासारखे गझलगुरु उपलब्ध नव्हते. गझलचा संग्रह सुध्दा मिळत नसे, गझल शिकणारांना उर्दू भाषेतील पुस्तकांवरच अभ्यास करावा लागत असे किंवा आपल्या गावात किंवा जवळच्या गावात एखादे पुस्तक प्रदर्शन आले असेल तर तिथेच अशी पुस्तके उपलब्ध होत असत. या संग्रहात गझलेच्या वर लगावलीसह वृत्ताचे नाव दिलेले असल्यामुळे गझल शिकणारांबरोबरच सर्वांनाच हा संग्रह उपयुक्त ठरणार आहे. या पुस्तकातील अनेक शेर मला आवडले आहेत.

त्यातील काही शेर पुढीलप्रमाणे ....

पुस्तकातील पहिल्याच गझलेत गझलकार श्री भारस्वाडकर सर श्री गणेशाचे स्तवन करतात, आजच्या या मतलबी जगात सुध्दा ते सगळे काही दुस-यांसाठीच मागतांना दिसतात ....

मागणे श्री च्या पुढे मी मागतो 

आटलेल्या निर्झराला पूर दे ....

आपल्या संस्कृतीत संतांच्या कार्याची माहिती विस्तृत प्रमाणात वाचायला मिळते. परमार्थाची वाट जोपासली तर आपला गर्व गळून पडतो व आपल्या मनात दया, माया, प्रेम, करुणा, वात्सल्य तसेच भक्ती वाढत जाते असे सांगतांना ....

वाकून रोज नमतो हा 'दास' ही समोरी 

तो हाच ज्ञानदेवा संतात संत दोस्ता ....

शेतीत कितीही नवनवीन तंत्रज्ञान, बियाणे, मशिनरी इत्यादि उपलब्ध होत असले तरी आपल्या देशातील शेती ही मुख्यत: मान्सूनवरच अवलंबून आहे हे एक वास्तव तसेच कटू सत्य आहे. जल व भूमी व्यवस्थापन तज्ञ तसेच अभ्यासक असलेले श्री भारस्वाडकर सर या बद्दलची खंत व्यक्त करतांना, आपला याबाबतचा अनुभव व शेतक-याचे दु:ख व्यक्त मांडतांना म्हणतात की ....

नव्हता कधीच तेव्हा पाऊस थांबलेला 

लोळून जात होता का ऊस बांधलेला ....

जीवन जगत असतांना माणसाला अनेक अडचणी, अडथळे येत असतात, त्रास सहन करावे लागतात, नशीबात असलेले भोग भोगावे लागतात हे सांगत असतांना डाॅ भारस्वाडकर सर म्हणतात की ....

दाटला अंधार सारा भोवताली 

प्राक्तनाचे भोग माझे टळत नाही ....

डाॅ भारस्वाडकर सरांचे या देशावर, इथे राहणा-या माणसांवर, देशाच्या संस्कृतीवर, देशाच्या प्रगतीवर प्रचंड प्रेम आहे. देशात बोलल्या जाणा-या अनेक भाषा, एकमेकांशी प्रेमभावाने वागणारे अनेक धर्माचे लोक गंगा-जमनी संस्कृती जपतात याचा अभिमान असलेल्या डाॅ भारस्वाडकर सरांचे म्हणणे असे आहे की, जिथे व्याकरण संपते तिथे गझल सुरु होते. एकंदरीत भारतीय तत्त्वज्ञानाची झलकच या संग्रहात पदोपदी बघावयास मिळते आणि म्हणूनच  ....

आत्मज्ञानाचे धुमारे सळसळावे या पुढे 

पंचकोषाच्या पल्याडी वळवळावे या पुढे ....

मागतो वैराग्य येथे धारणा करण्यास मी 

भेटण्या परब्रह्म येथे तळमळावे लागते ....

असे आपले स्पष्ट मत ते एका गझलेतून सांगतात पव आपले मनोगतही व्यक्त करून जातात. 


हे आणि असेच अनेक शेर "गझल ब्रह्म" या गझल संग्रहात वाचायला मिळतील. डॉ.भारस्वाडकर सर यांना त्यांच्या या पहिल्यावहिल्या गझलसंग्रहाच्या निमित्ताने माझ्या अनंत अनंत शुभेच्छा ....!


दिवाकर चौकेकर

गांधीनगर (गुजरात)

------------- ------------- -------------

गझल संग्रहाचे नाव : "गझल ब्रह्म" 

गझलकार : डॉ. रे. भ. भारस्वाडकर, छ. संभाजीनगर 

प्रकाशक : सिराज करीम शिकलगार, बाजीगर प्रकाशन, आंधळी ता. पलूस जि. सांगली 

पृष्ठे: ९२,  

किंमत: तीनशे रुपये

---------------------

Post a Comment

0 Comments