🌷पुस्तक परिचय🌷
गझलयात्री - भाग ४ (मराठवाडा विभाग)
प्रातिनिधिक गझल संग्रह
रसिकहो नमस्कार,
आज ज्या गझल संग्रहावर मी लिहिणार आहे, तो आहे एक प्रातिनिधिक गझल संग्रह आणि हा संग्रह निव्वळ एका योगायोगानेच माझ्यापर्यंत येऊन पोहोचला असेच म्हणावे लागेल, शिवाय तो माझ्या मनाच्या एका अगदी हळव्या कोपऱ्यात असलेल्या भूभागातून, म्हणजेच मराठवाड्यातून आला असल्यामुळे या प्रातिनिधिक गझल संग्रहाबद्दल मला जरा जास्तच जवळीक वाटू लागली होती.
गझल मंथन साहित्य संस्था, कोरपना ह्या संस्थेव्दारे प्रकाशित करण्यात आलेल्या ह्या संग्रहाचे 'संकल्पना आणि संपादन मंडळाचे प्रमुख' आणि "गझल मंथन साहित्य संस्था, कोरपना, जि: चंद्रपूरच्या मराठवाडा विभागीय कार्यकारिणीत सचिव पदाची जबाबदारी समर्थपणे पार पाडत असलेले प्रा डाॅ अनंत देशपांडे, बीड यांनी संग्रहाची ही प्रत मराठवाड्यातील ज्येष्ठ गझलकार, रेणुका गझल मंचचे संस्थापक प्रा डाॅ रेणुकादास भारस्वाडकर सर, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) यांना दिली होती. ती मी आदरणीय भारस्वाडकर सर यांचेकडून, प्रा डाॅ अनंत देशपांडे सर यांची परवानगी घेऊन मागून घेतली आणि हाच संग्रह माझ्यापर्यंत येऊन पोहोचण्याचा हाच तो योगायोग ....!
ह्या प्रातिनिधिक गझल संग्रहाचे अगदी पाहताक्षणी मला जाणवलेले वेगळेपण आणि मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे पुस्तक 'काॅफी टेबल बुक' आकारातील असून या पुस्तकाची बांधणी 'हार्ड केस बाईंडिंग' प्रकारातील आहे. या संग्रहाचे आणखी एक वैशिष्ट्य सांगावयाचे झाल्यास सर्व सहभागी गझलकार मंडळींचे कृष्णधवल रंगातील रेखाचित्र पुस्तकात छापले गेले आहे हे होय ....!
निळसर आकाशात उंच भरारी घेत असलेल्या पक्षांकडे हात उंचावून, तशीच जिद्द मनात बाळगणारी व मोठ्या आशेने त्या पक्षाकडे पाहणारी एक व्यक्ति अशा स्वरुपाचे, एका नयनरम्य व देखण्या चित्राचे लाभलेले मुखपृष्ठ श्री साईनाथ फुसे यांचे असून ते पाहणाराचे चित्त वेधून घेते तर मलपृष्ठावर गझल मंथन साहित्य संस्थेचे मार्गदर्शक युवा गझलकार डाॅ शिवाजी काळे यांनी संग्रहाला शुभेच्छा दिलेल्या आहेत, ज्यात गझल मंथन साहित्य संस्थेतर्फे विभागवार गझलयात्री प्रातिनिधिक गझल संग्रह प्रकाशित करण्याच्या उपक्रमामुळे संस्थेचे अध्यक्ष श्री अनिल जी कांबळे यांची कल्पना प्रत्यक्षात उतरत असल्याबद्दल आनंद व्यक्त करुन सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
गझलसम्राट दादासाहेब सुरेश भट यांना विनम्र अभिवादन करुन मराठी गझलेच्या प्रचार, प्रसारासाठी झटणा-या महाराष्ट्रातील सर्व संस्थांचे प्रतिनिधी, गझलकार, गझलकारा व मराठी गझल रसिकांना सादर समर्पित अशा शब्दांत लिहिलेली अर्पण पत्रिका वाचली आणि लक्षात आले की, "हा संग्रह नक्कीच काही तरी वेगळा आहे ....!"
यानंतर 'दाद' या शीर्षकाखाली मराठवाड्यातील ज्येष्ठ गझलकार, पशुवैद्यकीय क्षेत्रात काम करणारे माझे मित्र प्रा डाॅ संतोष कुलकर्णी (लातूर) यांनी आपल्या प्रस्तावनेत मराठवाड्यातील मराठी गझलेचा एकंदरीत आढावा अतिशय सुंदर पध्दतीने घेतला असून येथील गझलकारांनी नव्या जाणिवांचा, नव्या विचारांचा व अभिव्यक्तीचा केलेला अंगिकार स्वागतार्ह आहे असे मत नोंदविलेले आहे आणि म्हणूनच मला इथे असे म्हणावेसे वाटते की ....
जुने जाणते जिथे भेटले नवीन सुध्दा दिसले
गझलेची ही बघुन भरारी मन माझेही हसले ....
या प्रातिनिधिक गझल संग्रहात फक्त मराठवाडा विभागातील ५४ गझलकारांच्या प्रत्येकी दोन प्रमाणे १०८ व प्रा डाॅ संतोष कुलकर्णी (लातूर) यांच्या २ सदिच्छा गझल अशा एकूण ११० गझलांचा समावेश करण्यात आला आहे.
या ५५ गझलकारांमध्ये जसे पुरुष गझलकार आहेत तसेच स्त्री गझलकारासुध्दा आहेत. तरुण गझलकार आहेत तसेच जुने-जाणते गझलकारही आहेत. विविध जाती धर्माच्या या सर्व गझलकार मंडळींनी एकत्रपणे आपल्या ऐतिहासिक, अध्यात्मिक तसेच साहित्यिक वारसा लाभलेल्या "मराठवाडा विभागाचा" सन्मानच या प्रातिनिधिक गझल संग्रहाव्दारे केला आहे असेही मला वाटते. अशा प्रकारचा एका विभागाचा प्रातिनिधिक गझल संग्रह प्रकाशित केल्याबद्दल "गझल मंथन साहित्य संस्थेचे" मी अभिनंदन, कौतुक व आभार व्यक्त करतो.
संग्रहातील या ११० गझलांचा विचार करता अक्षरगण वृत्तातील गझलांबरोबरच मात्रावृत्तातील गझला सुध्दा आहेत, तसेच गझलेचे तंत्र सांभाळलेल्या गझलाच यात आहेत असे दिसून आले. सर्वच गझलकारांनी विविध विषयांवर तसेच अनुभवांवर आपल्या गझला लिहिल्या आहेत.
संग्रहातील मला आवडलेल्या व्दिपदींबद्दल तर मी लिहिणार आहेच पण संग्रहात समाविष्ट नांदेड येथील तरुण गझलकार श्री विजय नारायण वाठोरे (साहिल) यांच्या मला विशेष भावलेल्या गझलेचा उल्लेख इथे न करणे हा माझ्या मराठवाड्यावर अन्याय केल्यासारखे होईल असे मला वाटले म्हणून मराठवाड्यावर लिहिलेली ही गझल ....
लाखो विवंचनांशी लढतो मराठवाडा
जोशामधे तरीही जगतो मराठवाडा ....
आहेच मनमिळावू भोळा स्वभाव त्याचा
प्रत्येक माणसाचा असतो मराठवाडा ....
स्वार्थांध संधीसाधू नेत्यांमुळेच इथल्या
झुरतो क्षणाक्षणाला मरतो मराठवाडा ....
तेंव्हा निजाम होता आता लगाम नाही
बेभान रे व्यवस्था बघतो मराठवाडा ....
होतात आत्महत्या येथे उगाच नाही
कर्जात बाप रुतता कन्हतो मराठवाडा ....
पदरात रोज त्यांच्या आश्वासनेच पोकळ
घे ना बळी व्यवस्थे म्हणतो मराठवाडा ....
वाटत कधीच परका नाही कधी कुणाला
बघ काळजात ज्याच्या वसतो मराठवाडा ....
अशा माझ्या काळजात वसलेल्या मराठवाड्याच्या भूमीला, मराठवाडा मुक्ती संग्रामात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना वंदन करून लेखाचा हा पहिला इथेच थांबवतो व लेखाचे उर्वरित लेखन पुढील भागात सादर करण्याचे आश्वासन देऊन लेखणीला तूर्तास अर्धविराम देतो ....! (क्रमश:)
संग्रहाची माहिती ....
पुस्तक: "गझलयात्री" प्रातिनिधिक गझल संग्रह भाग ४ मराठवाडा विभाग
संपादक: श्री जयवंत भा वानखडे, सचिव, गझल मंथन साहित्य संस्था, कोरपना जि: चंद्रपूर
प्रकाशक: श्री जयवंत भा वानखडे, गझल मंथन प्रकाशन, कोरपना (भ्रमणध्वनी: ९८२३६४५६५५
अक्षर जुळणी व मांडणी: श्री अनंत देशपांडे
मुद्रक: रचना ऑफसेट प्रिंटर्स, पुणे
मुखपृष्ठ: श्री साईनाथ फुसे
संग्रहाचे मूल्य: ३५० रुपये
दिवाकर चौकेकर
गांधीनगर (गुजरात)
मोबाईल: 9723717047
------------ ------------ -----------



0 Comments